सिरोही : राजस्थान राज्यातील एक भूतपूर्व संस्थान, इतिहासप्रसिद्घ शहर आणि त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५·१३६ चौ. किमी. असून लोकसंख्या १०,३७,१८५ (२०११) होती. सिरोही अरवलीच्या दक्षिण भागात उदयपूरच्या वायव्येस सु. ८६ किमी. व जालोरच्या दक्षिणेस सु. ७८ किमी.वर वसले आहे. सिरोही संस्थानच्या सीमांत काही बदल होऊन सिरोही जिल्हा झाला. सिरोहीचे मूळ संस्थानिक चौहान घराण्यातील देवरा या राजपूत शाखेचे असून, देवराज हा या घराण्यातील मुख्य पुरुष होय. त्याच्या अग्रसेन या मुलाने परमारांची राजधानी चंद्रावती हस्तगत करुन (१३०२) मौंट अबूचा तट बांधला व तो किल्ला भक्कम केला पुढे त्या वंशातील राव सोभाजी याने सिरोही नगर वसविले (१४०५) परंतु ही जागा आरोग्यास प्रतिकूल वाटल्यामुळे त्याचा मुलगा राव ससमल याने नवीन सिरोही नगराची स्थापना केली (१४२५). तेच जिल्ह्याचे मुख्यालय होय. मारवाडच्या राजांनी त्यावर अनेक अयशस्वी आक्रमणे केली तथापि संस्थान अभेद्य राहिले मात्र त्यानंतरच्या शंभर वर्षांत विशेष काहीच घडले नाही. या घराण्यातील राव सर्जनसिंग (कार. १५७२–१६१०) हा कर्तबगार व प्रसिद्घ राजा होय. त्याच्या दरबारात विद्वान होते. तो युद्घशास्त्रात निपुण असून, त्याने मोगल बादशाहांचा अनेक लढायांत पराभव केला होता. त्याच्यानंतर संस्थानला अवकळा प्राप्त झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस जोधपूरचे राजे व मीना ज्ञातीच्या लोकांकडून राव उदय भानच्या कारकीर्दीत संस्थानचे अपरिमित नुकसान झाले. पुढे राव शिवसिंग (कार. १८१७–६५) याने ब्रिटिशांची मदत घेऊन कॅप्टन टॉडबरोबर तह केला (१८३३) व राज्याची विस्कटलेली घडी नीट बसविली. इंग्रजांचा पोलिटिकल एजंट संस्थानात प्रविष्ट झाला. मौंट अबू येथे इंग्रजांनी क्षयरोग्यांसाठी रुग्णालय बांधले. शिवसिंगनंतर राव उमेदसिंग (कार. १८६५–७६) गादीवर आला. त्याचा मुलगा महाराव केसरीसिंग (कार. १८७५–१९२०) ह्यास ब्रिटिश शासनाने सर्वाधिकार दिले. त्याने महाराव व महाराजाधिराज ही बिरुदे धारण केली. इंग्रजांनी त्यास के. सी. एस्. आय्. (१८९५) व जी. सी. आय्. सी. (१९०१) हे बहुमानदर्शक किताब दिले. पहिल्या जागतिक महायुद्घात केसरीसिंगाने इंग्रजांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्याला सतरा तोफांच्या सलामीचा मान होता. त्याने महाराव स्वरुप रामसिंग (कार. १९२१–४६) या आपल्या मुलासाठी राज्यत्याग केला आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारला. स्वरुप रामसिंग यास मुलगा नव्हता. त्यामुळे वारसाविषयी वाद उत्पन्न झाला. त्यावेळी केंद्र शासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. तिने एका उपशाखेतील अभय सिंग याची अधिकृत वारस म्हणून निवड केली (१९४९) आणि संस्थान प्रथम मुंबई इलाख्यात विलीन करण्यात आले व नंतर १९५० मध्ये बृहद्राजस्थानात समाविष्ट करण्यात आले. या संस्थानात ४२३ गावे होती आणि उत्पन्न नऊ लाख होते.
जिल्ह्यातून बनारस नदी व तिच्या ल्यूनी व सुक्री या उपनद्या वाहत असल्यामुळे सुपीक मृदा आढळते. तीत मका, बाजरी, मूग, कुळीथ, गहू, हरभरा व अन्य कडधान्ये पिकतात. त्यामुळे सिरोही शहर ही अन्नधान्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात परंपरागत धातूकामाचे कारखाने असून तलवारी, खंजीर, भाले, चाकू आदी वस्तू तयार होतात. हरतऱ्हेच्या व भिन्न आकाराच्या कलात्मक तलवारींसाठी सिरोही प्रसिद्घ आहे. याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणावर हस्तव्यवसाय चालतो. शहरात सर्व जिल्हा शासकीय कार्यालये असून, शासकीय रुग्णालयाव्यतिरिक्त अन्य खासगी रुग्णालये आहेत. तसेच एक शासकीय महाविद्यालय असून ते युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानला संलग्न आहे. जिल्ह्याच्या आसमंतात ग्रॅनाइट, शिस्ट, मँगॅनीज, अभ्रक, टंगस्टन ही खनिजे आढळतात. निसर्गरम्य अबू हे गिरिस्थान, दिलवाडा जैन मंदिर समूह, रामकुंड, गोमुख मंदिर, नखी सरोवर, ट्रेव्हर तलाव, बेडकाकृती ‘टोड रॉक खडक आणि दहा किमी.वरील अचलगढ व चंद्रावती ही प्राचीन जैन तीर्थक्षेत्रे ही सिरोही जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
निगडे, रेखा