सिरिन्धोर्न, महाचक्री : (२ एप्रिल १९५५– ). थायलंडच्या राजकन्या. थोर सामाजिक कार्यकर्त्या. त्यांचे पूर्ण नाव आणि राजेशाही हुद्दा ‘सोमदेताक्रा थेफ्फरत रत्‌चासुदा चाओफा महाचक्री सिरिन्धोर्न रत्‌थसीमा कुनकोन’ असा आहे. त्यांचा जन्म थायलंडमध्ये, त्या देशाच्या चक्री राजवंशात राजे भूमिबोल आणि राणी सिरिकीत ह्या शाही दांपत्यापोटी झाला. ह्या दांपत्याचे हे दुसरे अपत्य. आरंभीचे काही शिक्षण खाजगी रीत्या तसेच चित्रलाद विद्यालयात घेतल्यानंतर चुललाँगकॉर्न विद्यापीठातून त्या इतिहास विषयात सुवर्णपदक मिळवून बी. ए. झाल्या (१९७६). याच विद्यापीठातून एम्.ए. ही पदवी त्यांनी दोनदा मिळविली. श्री नरवीरविरोत विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. ही पदवीही संपादन केली (१९८६). इंग्रजी, फ्रेच, लॅटिन आणि चिनी ह्या भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत असून संगीतशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे.

सुविद्यता प्राप्त केल्यानंतर आपल्या देशवासीयांच्या विकासाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक साहाय्य मिळविले. थायलंडमधील शाळांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक सुधारणा केल्या. विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले.

त्या राजकन्या असल्या, तरी देशाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या समाजसेविका म्हणून त्यांची ओळख अधिक मोठी आहे. त्यांना त्यांच्या सार्वजनिक सेवेबद्दल विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. थम्मसात विद्यापीठाने सन्माननीय ‘डॉक्टरेट’ देऊन त्यांना गौरविले (१९९१). मुलांवर थाई संस्कृतीचे संस्कार घडविण्याबद्दल त्यांना ‘स्कोची गुडविल अँबॅसेडर’ हा किताब देण्यात आला. शिवाय चायनीज लँग्वेज अँड कल्चर फ्रेंडशिप ॲवॉर्ड (२०००), अंडरस्टँडिंग अँड फ्रेंडशिप इंटरनॅशनल लिटरेचर ॲवॉर्ड (२००१), मागसायसाय पुरस्कार (२००१), शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास ह्यांसाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार (२००४) ह्यांचाही त्यात समावेश होतो.

थायलंडमधील अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांपैकी ‘सिरिन्धोर्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

देशपांडे, सु. र.