सिंह, शमशेरबहादुर : (१३ जानेवारी १९११–१२ मे १९९३). आधुनिक हिंदी कवी. डेहराडून येथे एका मध्यमवर्गीय कर्मठ जाट कुटुंबात जन्म. अलाहाबाद विद्यापीठातून बी. ए. (१९५३) व इंग्रजीमध्ये एम्. ए. (भाग १) केल्यानंतर त्यांनी सुमित्रा-नंदन पंतसंपादित रुपभ ह्या हिंदी मासिकात सहसंपादक म्हणून काम केले. १९४० पासून कहानी या मासिकात त्रिलोचन यांच्यासमवेत सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले. १९४८ – ५४ ह्या कालखंडात त्यांनी अलाहाबादच्या माया प्रेसमध्ये संपादकीय विभागात काम केले. १९६५– ७६ या कालावधीत ते दिल्ली विद्यापीठात उर्दू विभागात उर्दू–हिंदी शब्दकोशाचे संपादक म्हणून काम पाहात होते. उज्जैन येथील विक्रम विद्यापीठात त्यांची प्रेमचंद अध्यासनावर नेमणूक झाली होती.
त्यांची पहिली कविता १९३१ मध्ये सरस्वती या मासिकात प्रसिद्घ झाली. ⇨ अज्ञेय यांनी संपादित केलेल्या दुसरा सप्तक (१९५१) या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता निवडल्या गेल्या, त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. अग्रगण्य आधुनिक हिंदी कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली. कुछ कविताएँ (१९५९), कुछ और कविताएँ (१९६१), चुका भी हूँ नही मैं (१९७५), इतने पास अपने (१९८०), बात बोलेगी (१९८०), उदिता (१९८१) हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह होत. उदितामधील कविता ह्या १९३७ – ४७ या कालखंडाशी निगडित आहेत. त्यांचे वाङ्मयीन निबंध व समीक्षात्मक लेखही महत्त्वाचे आहेत. दोआब (१९४८) हा त्यांचा लेखसंग्रह म्हणजे हिंदी नवकाव्याचा जाहीरनामाच होय. त्यातील ‘सात आधुनिक कवी’ हा लेख हिंदी नवकाव्याच्या चळवळीला दिशा देणाऱ्या व ‘तार सप्तक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सात अग्रगण्य कवींच्या काव्यविशेषांवर प्रकाशझोत टाकतो. १९५२ मध्ये प्लॉट का मोर्चा हा त्यांचा व्यक्तिरेखांचा व लघुकथांचा संग्रह प्रकाशित झाला. यांखेरीज फैज अहमद फैज यांच्या निवडक कवितांच्या फैज (१९७९) या संकलनाचे ते सहसंपादक होते.
शमशेरबहादुर सिंह हे हिंदी नवकाव्याचे आद्य प्रवर्तक मानले जातात. त्यांच्या काव्यावर ‘निराला’- सूर्यकांत त्रिपाठी यांचा तसेच शेली, कीट्स, टी. एस्. एलियट व एझरा पाउंड या पाश्चात्त्य कवींचा प्रभाव पडला व त्यातून ते समृद्घ, बहुआयामी बनत गेले. विशेषतः एझरा पाउंडच्या काव्यात्म घाटाच्या व शैलीच्या विविधांगी प्रयोगांचा त्यांच्यावर दाट ठसा उमटलेला दिसतो. त्यांनी अनेकविध काव्यात्म घाटांचे व शैलीरुपांचे प्रयोग आपल्या काव्यातून केले. काव्याच्या रचनातंत्रावर त्यांची विलक्षण हुकूमत होती. कलात्मकतेचे जाणीवपूर्वक भान त्यांच्या काव्यात दिसते. त्यांच्या मते हिंदी व उर्दू या भाषा अभिन्न असून दोहोंचाही मुक्तहस्ते वापर त्यांनी आपल्या काव्यातून केला. त्यांची भाषा अनेकदा बोजड ग्रांथिक रुप धारण करते. ‘अमनका राग’, ‘समय साम्यवादी’ यांसारख्या त्यांच्या कवितांध्ये सामाजिक आशय आढळत असला, तरी अशा कविता अपवादात्मकच आहेत. सर्वसामान्यांच्या समस्यांध्येही त्यांची कविता फारशी रमली नाही. ते स्वच्छंदतावादी वृत्तीचे कवी होते. प्रेम आणि सौंदर्य यांची नाजुक, तरल, बहुढंगी, कल्पनाप्रचुर रुपे त्यांनी आपल्या काव्यातून जशी व्यक्त केली, तशी ती अन्य कोणाही छायावादी कवीला साधली नाहीत. प्रतिमांची सरमिसळ करुन आपल्या अनुभवांची व्यामिश्रता ते काव्यातून प्रकट करतात. त्यांची गझलरचना उर्दू परंपरेशी नाते सांगणारी आहे.
त्यांच्या चुका भी हूँ नही मैं या काव्यसंग्रहाला १९७७ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. त्याच वर्षी मध्य प्रदेश साहित्य परिषदेचा तुलसी पुरस्कारही त्यांना मिळाला. दिल्ली साहित्य कला परिषद पुरस्कार (१९७९), मैथलीशरण गुप्त पुरस्कार (१९८७), कबीर सन्मान (१९८८-८९) हे त्यांना लाभलेले अन्य महत्त्वपूर्ण पुरस्कार होत. १९७८ साली त्यांनी रशियाचा दौरा केला.
अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Saxena, Sarveshwar Dayal Malayaj Ed. Shamsher, Delhi, 1971.
सारडा, निर्मला