सिडनहॅम, टॉमस : (१० सप्टेंबर १६२४–२९ डिसेंबर १६८९). ब्रिटिश वैद्य. वैद्यकातील निदानीय वैद्यक आणि रोगपरिस्थितिविज्ञान या शाखांचे संस्थापक म्हणून ते ओळखले जातात. रुग्णाचे सखोल परीक्षण करुन त्याविषयी अचूक नोंदी ठेवण्यावर त्यांनी भर दिला होता. म्हणजे रुग्णाला तपासताना वैद्याने आपली अवलोकनशक्ती व अनुभव यांवरच अवलंबून राहणे अतिशय आवश्यक आहे, असे ते म्हणत असत. हिपॉक्राटीझ यांच्यानंतर सिडनहॅम यांनी असे मत व्यक्त केल्याने सिडनहॅम यांना ‘द इंग्लिश हिपॉक्राटीझ’ असे म्हटले जाऊ लागले.
सिडनहॅम यांचा जन्म इंग्लंडमधील विनफोर्ड ईगल (डॉर्सेट) येथे झाला. ऑक्सफर्डच्या मॅग्डेलन कॉलेजातून १६४२ मध्ये पदवी संपादन केल्यावर त्यांना इंग्लिश यादवी युद्घात संसदेच्या बाजूने भाग घ्यावा लागला. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय अध्ययनात खंड पडला. १६४८ मध्ये त्यांनी एम्.बी. ही पदवी संपादन केली आणि १६५६ च्या सुमारास त्यांनी लंडनला आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. तेथे त्यांनी साथींचा अगदी नेमका अभ्यास केला. या अध्ययनाच्या आधारे त्यांनी निरनिराळ्या ज्वरांविषयीचे पुस्तक १६६६ मध्ये लिहिले. नंतर या पुस्तकात भर घालून त्यांनी ऑब्झर्व्हेशनेस मेडिकी (१६७६) हे पुस्तक लिहिले. पुढील दोनशे वर्षे हे प्रमाणभूत पाठ्यपूस्तक म्हणून वापरात होते. त्यांनी १६८३ मध्ये लिहिलेला संधिवातावरील (गाऊटवरील) ट्रिटाइज ऑन गाऊट हा त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो.
हिमज्वर, संधिवात, गोवर, लोहितांग ज्वर, फुप्फुसशोथ, परिफुप्फुसशोथ, उन्माद व बालकंपवात या रोगांचे त्यांनी उत्कृष्ट वर्णन केले असून ते आदर्श मानले जाते. बालकंपवाताचे सविस्तर वर्णन त्यांनी प्रथम केले होते. म्हणून या रोगाला ‘सिडनहॅम बालकंपवात’ असे नाव पडले आहे.
लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) या विकाराचे प्रथम वर्णन करणाऱ्यांपैकी तसेच उन्माद व सेंट व्हिटसेस डान्स या विकारांचे स्वरुप प्रथम स्पष्ट करणाऱ्यापैकी सिडनहॅम हे एक वैद्य आहेत. सेंट व्हिटसेस डान्स या विकारास ‘सिडनहॅम कॉरिया’ असे देखील म्हणतात. अफूचा अल्कोहॉली अर्क वैद्यकीय व्यवसायात त्यांनी प्रथम वापरला. ते लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या पांडुरोगावर (रक्तक्षयावर) उपचारात लोहाचा वापर करणारे प्रथम वैद्य आहेत. हिवताप बरा करण्यासाठी क्विनीन वापरण्याची पद्घत लोकप्रिय होण्यास त्यांची मदत झाली होती.
सिडनहॅम यांचे लंडन येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना.