सिट्रस : (कुल-रुटेसी). हे फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका प्रजातीचे नाव असून यामध्ये सु. नऊ जातींचा समावेश होतो. एका प्राचीन आफ्रिकी व सुवासिक लाकडाचे ते मूळ नाव आहे. या जातींचे मूलस्थान उष्ण व उपोष्ण आशिया आणि मलाया द्वीपकल्प असून फार प्राचीन काळापासून त्या व त्यांच्यापासून निर्माण झालेल्या संकरज प्रजाती जगभर पसरलेल्या आहेत. इ. स. पू. सु. १००० वर्षांपासून चिनी लोक त्यांची लागवड करीत असल्याचे नमूद आहे. खाद्य फळे, सुवासिक फुले व हिरवी गर्द पाने यांमुळे त्यांचे महत्त्व वाढून त्यांची भारतातही अधिक प्रमाणात लागवड होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत फ्लॉरिडा, टेक्सस, कॅलिफोर्निया व ॲरिझोना येथे सर्वाधिक लागवड आढळते यांच्या फळांचे तेथे सर्वाधिक उत्पादनही होते. या प्रजातीतील वनस्पती सदापर्णी व लहान वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) असून त्यांची पाने तैल प्रपिंडयुक्त, चिरकालिका (सतत हिरवी राहणारी), एकदली व संयुक्त असून दल व सपक्ष देठ यांमध्ये सांधा असतो. पानांच्या बगलेत कळीशेजारी एक तीक्ष्ण काटा असतो. फुलोरे विविध फुले क्वचित एकाकी, फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुटेसी (सताप) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. पाकळ्या ४–६, बहुधा पांढऱ्या केसरदले (पुं-केसर) अनेक (१६–६०, बहुधा २०–४०), बहुसंघ (अनेक जुड्या असणारे) किंजदले (स्त्री-केसर) जुळून ८–१५ कप्प्यांचा किंजपुट बनतो व त्या प्रत्येकात १–८ बिया असतात. परागण (पराग वाहून नेण्याचे कार्य) कीटकांकडून होते त्याशिवायही फळांची निर्मिती होते. बीजकातील (अपक्व बीजातील) परिपुष्कावर (गर्भाबाहेरील अन्नावर) आगंतुक गर्भनिर्मिती होऊन बहुगर्भत्व आढळते. फळे जंबीरसम [ मृदुफळाचा एक प्रकार ⟶ फळ] असून बियांतील दलिका जाड व मांसल असतात. लिंबू, पपनस, कवला, जंबुरी, महाळुंग, ईडलिंबू , चकोतरा, संत्रा, मोसंबी इ. उपयुक्त फळांमुळे या प्रजातीला महत्त्व आहे. सेव्हिल संत्र्याच्या फांद्या, पाने व कडू फळे यांपासून ‘पेटिटग्रेन तेल’ काढतात त्याचा उपयोग साबण व त्वचेला लावावयाची मलमे यांमधील सुवासिक द्रव्यांकरिता करतात.

ठोंबरे, म. वा.

सिट्रस, प्रजातीतील फळे : या प्रजातीतील बहुतेक सर्व जातींच्या फळझाडांना उबदार हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असून त्यांची लागवड उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत होते. भारतात या प्रजातीतील बहुतेक जातींची लागवड होते. या प्रजातीतील निरनिराळ्या जातींमध्ये निसर्गतः मोठ्या प्रमाणावर संकर घडून येत असल्यामुळे फळांचे वेगवेगळ्या जातींत वर्गीकरण करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे फलसंवर्धन शास्त्रज्ञांत या व्यापारी फळांच्या वर्गीकरणाबाबत एकमत नाही. स्विंगल यांच्या वर्गीकरणाच्या पद्घतीप्रमाणे सिट्रस प्रजातीतील निरनिराळ्या जाती व त्यात अंतर्भूत असलेली निरनिराळी प्रमुख व्यापारी फळे पुढीलप्रमाणे आहेत (इतर जातींची शास्त्रीय नावे व इंग्रजीमधील प्रचारातील नावे कंसात दिली आहेत) : (१) सिट्रस सायनेन्सिस (सि. ऑरँटियम स्वीट ऑरेंज) मोसंबे आणि तत्सम फळे. [⟶ मोसंबे]. (२) सि. रेटिक्युलॅटा (सि. नोबिलिस, सि. ऑरँटियम, सि. किसोकार्पा मँडॅरिन अथवा टँगेरिन ऑरेंज) संत्रा [ ⟶ संत्रे]. (३) सि. ऑरँटिफोलिया (सि. मेडिका लाइम) लिंबू [ ⟶ लिंबू]. (४) सि. लायमेटिऑइडिस (सि. मेडिका स्वीट लाइम) साखर लिंबू [ ⟶ लिंबू]. (५) सि. लिमॉन (सि. मेडिका लेमन) लेमन, ईडलिंबू, जंबुरी [ ⟶ जंबुरी लेमन]. (६) सि. मॅक्झिमा (सि. डिकुमाना, सि. ग्रँडिस पमेलो) पपनस [ ⟶ पपनस]. (७) सि. पॅरॅडिसी (ग्रेपफ्रूट) ग्रेपफ्रूट [ ⟶ चकोतरा]. (८) सि. मेडिका (सिट्रोन) महाळुंग अथवा चकोतरा [ ⟶ महाळुंग]. (९) सि. ऑरँटियम (सि. व्हल्गॅरिस, सि. करना सेव्हिल ऑरेंज) खारे नारिंग, करना (खारना अथवा खट्टे) आणि वडलापुडी या फळांचा या जातींत समावेश होतो.

खारे नारिंग : (इं. सोअर, बिटर, सेव्हिल, बिगारेड ऑरेंज लॅ. सिट्रस ऑरँटियम ). हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष असून पानांचे देठ रुंद पंखयुक्त असतात. फुले मोठी, पांढरी व सुवासिक फळ वाटोळे, काहीसे खडबडीत, नारिंगी रंगाचे व मोसंबीपेक्षा आकाराने लहान असून गर आंबट असतो. पक्व फळाचा मध्यभाग पोकळ असतो.

स्पेनमध्ये या फळाची लागवड व्यापारी प्रमाणावर होते आणि ते ग्रेट ब्रिटन व इतर देशांत मार्मालेड तयार करण्यासाठी निर्यात केले जाते. जगातील अनेक देशांत या वृक्षाचा सिट्रस प्रजातीतील इतर वृक्षांचे डोळे भरण्यासाठी खुंट म्हणून उपयोग केला जातो. हा एक अत्यंत लोकप्रिय खुंट असून त्यावर डोळे भरुन केलेल्या कलमांना उत्कृष्ट दर्जाची फळे येतात. ती उत्तम प्रकारच्या जमिनीत लागवडीस योग्य असतात व डिंक्या रोगाचा पुष्कळ अंशी प्रतिकार करतात.

करना : (खरना अथवा खट्टे हिं. खट्टा लॅ. सिट्रस ऑरँटियम, सि. करना ). खारे नारिंग आणि नारिंग यांच्या संकरापासून या फळाची उत्पत्ती झाली असावी असे मानतात. फळे सर्वसाधारणपणे खाऱ्या नारिंगासारखी असतात परंतु फुलांवर लेमनच्या फुलांप्रमाणे तांबूससर छटा असते. फळे आकाराने मोठी व गोलाकार असून त्यांचा टोकाकडील भाग बोंडासारखा असतो. साल आणि गर नारिंगी रंगाची असतात.

वडलापुडी : (इं. गुंतूर सोअर ऑरेंज लॅ. सिट्रस ऑरँटियम). या वृक्षाची लागवड आंध्र प्रदेशाच्या गुंतूर व कृष्णा जिल्ह्यांत पुष्कळ क्षेत्रात होते. वृक्षाची पाने खाऱ्या नारिंगाप्रमाणे असतात परंतु फळाची साल खडबडीत असून ती आतील गराला घट्टपणे चिकटलेली नसते. पक्व फळातील रस गोड असतो. याचा समावेश काहीजण खारे नारिंगाच्या जाती (सि. ऑरँटियम) करतात परंतु खारे नारिंगापेक्षा ते काही बाबतीत वेगळे असल्यामुळे तनाका या शास्त्रज्ञांनी त्याचा समावेश सि. मदेरा स्पताना या वेगळ्या जातीत केला आहे.

गुप्ता, पु. कि.