सिंबिडियम : सुंदर फुलांबद्दल प्रसिद्घ असलेल्या वनस्पतींच्या ⇨ ऑर्किडेसी (वर्ग-एकदलिकित) कुलातील एका प्रजातीचे नाव. या प्रजातीत ३०—४० जाती असून त्यांचा प्रसार बव्हंशी आशियातील उष्ण प्रदेश व ऑस्ट्रेलिया येथे झाला आहे हिच्या काही जाती आफ्रिकेत आढळतात. बहुतेक सर्व जाती ⇨ अपिवनस्पती व काही स्थलवासी आहेत. कित्येकांचे खोड आभासी कंद असून पाने साधी, चिवट, लांबट व दीर्घस्थायी असतात. फुले सुंदर संदले व प्रदले साधारण सारखी पुष्पोष्ठ त्रिखंडी व सरळ स्तंभास तळाशी चिकटलेला परागपुंज दोन असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ऑर्किडेसी कुलात व ऑर्किडेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे असतात. तिचे अनेक संकरज प्रकार उपलब्ध आहेत.
सिंबिडियम ॲलोफोलियम ही जाती हिमाचल प्रदेश, तराई, नेपाळ, सिक्कीम, आसाम, पश्चिम व दक्षिण भारत (कोकण, उ. कारवार आणि सह्याद्री घाट), ईस्टइंडिज, अंदमान बेटे व श्रीलंका इ. ठिकाणी आढळते. ह्या अपिवनस्पतीचे खोड आखूड पाने मांसल, लांब व टोकास खाचदार असतात. एप्रिल-मेमध्ये लोंबत्या मंजरीवर पिवळसर लाल फुले येतात पुष्पोष्ठ जांभळट (फिकट निळा व त्यावर काळ्या रेषा) असतो. फळ (बोंड) लांबट (५—८ सेंमी.) व त्यावर उभे कंगोरे असतात. ही वनस्पती वांतिकारक व रेचक असून तिच्यापासून पौष्टिक व शामक असा सलेप नावाचा पिठूळ पदार्थ मिळतो.
पहा : वनस्पति, आवृतबीज उपविभाग सालंमिश्री.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, स. वि.