सिंप्सन, सर जेम्स यंग : (७ जून १८११–६ मे १८७०). स्कॉटिश प्रसूतिवैज्ञानिक. प्रसूती होताना करावयाच्या उपचारांच्या बाबतीतील ते तज्ञ होते. प्रसूतीच्या वेळी स्त्रीला होणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम क्लोरोफॉर्माचा उपयोग केला. याकरिता त्यांनी क्लोरोफॉर्माचे शुद्घिहारक गुणधर्म शोधून काढले होते. तसेच ब्रिटनमध्ये शुद्घिहरणासाठी (भूल देण्यासाठी) ईथरचा वापर करणारे ते पहिले वैद्य होत. [ ⟶ ईथर-१].
सिंप्सन यांचा जन्म बाथगेट (लोदीअन्झ प्रदेश, स्कॉटलंड) येथे झाला. त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम्. डी. पदवी १८३२ मध्ये संपादन केली व याच विद्यापीठात ते प्रसूतिविज्ञानाचे प्राध्यापक झाले. शस्त्रक्रियेत शुद्घिहारक म्हणून ईथर वापरल्याची बातमी स्कॉटलंडमध्ये १८४६ मध्ये आली. सिंप्सन यांनी जानेवारी, १८४७ मध्ये प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या प्रसूतिवेदना कमी व सौम्य करण्यासाठी ईथर वापरले. अशा प्रकारे ब्रिटनमध्ये ईथरचा वापर प्रथमच झाला. १८४७ च्या शेवटी त्यांनी याच कामासाठी ईथर ऐवजी क्लोरोफॉर्माचा वापर केला. यातूनच त्यांचे अकाउंट ऑफ ए न्यू ॲनेस्थेटिक एजंट हे अभिजात पुस्तक प्रसिद्घ झाले.
सिंप्सन यांच्या या प्रयत्नांना इतर प्रसूतिवैज्ञानिक व धर्मगुरु यांचा विरोध होत होता. परंतु या विरोधाला न जुमानता ते स्त्रीच्या प्रसूतिवेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी क्लोरोफॉर्माचा उपयोग चिकाटीने करीत राहिले. १८४७ मध्येच त्यांची ब्रिटनच्या राणीचे स्कॉटलंडमधील एक वैद्य म्हणून नेमणूक झाली. त्यांनी राणी व्हिक्टोरियाची आठवी प्रसूती क्लोरोफॉर्माचा वापर करुन केली. तेव्हा राजपुत्र लेओपोल्ड यांचा जन्म सुखरुपपणे झाला आणि सिंप्सन यांना होणारा विरोध मावळला. १८६६ मध्ये सिंप्सन उमराव (बॅरोनेट) झाले.
रक्तस्राव थांबविण्यासाठी लोखंडाच्या अगदी बारीक तारेची शिवण (टाके) व ॲक्युप्रेशर पद्घती सिंप्सन यांनी प्रथम वापरुन पाहिली. प्रसूतीच्या वेळी वापरावयाचा लांब चिमटा त्यांनी बनविला व तो त्यांच्याच नावाने ओळखला जातो. वैद्यकीय इतिहासाच्या (विशेषतः स्कॉटलंड-मधील महारोगविषयक) लेखनासाठी त्यांची ख्याती आहे. तसेच गर्भविषयक विकृतिविज्ञान व उभयलिंगता [ पुं-आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच व्यक्तीत आढळण्याची स्थिती ⟶ उभयलिंगता] यांच्यावरील लेखनाकरिताही सिंप्सन प्रसिद्घ आहेत.
सिंप्सन यांचे लंडन (इंग्लंड) येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना.