सिंक्लेअर, अप्टन बील : (२० सप्टेंबर १८७८–२५ नोव्हेंबर १९६८). अमेरिकन कादंबरीकार. जन्म बॉल्टिमोर, मेरिलंड येथे. तो दहा वर्षांचा असताना त्याचे वडील न्यूयॉर्क शहरात राहावयास आले. कॉलेज ऑफ द सिटी ऑफ न्यूयॉर्कमधून पदवीधर झाल्यानंतर (१८९७) तो कोलंबिया विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी दाखल झाला. ह्या शिक्षणाच्या काळात त्याने नियतकालिकांसाठी लेखन करुन स्वतःचा चरितार्थ चालविला. सिंक्लेअरची मानसिकता समाजवादी विचारांना अनुकूल होती त्यामुळे १९०२ मध्ये त्याने समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्याआधीच, स्प्रिंगटाइम अँड हार्व्हिस्ट (१९०१) ही त्याची कादंबरी प्रसिद्घ झाली होती पण तिला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर त्याने चार कादंबऱ्या लिहिल्या परंतु सर्जनशील लेखनावरच जगावयाचे, ह्या भूमिकेतून धडपडणाऱ्या सिंक्लेअरला ह्या कांदबऱ्यांतून जेते जगण्याइतकीही प्राप्ती झाली नाही तथापि १९०६ मध्ये प्रसिद्घ झालेल्या द जंगल ह्या त्याच्या कादंबरीने मोठी खळबळ निर्माण केली. शिकागो शहरातील मांसआवेष्टन (पॅकिंग) उद्योगातील कामगारांना देण्यात येणारी अन्याय्य वागणूक, तेथील अस्वच्छता ह्यांच्यावर ह्या कादंबरीने विदारक प्रकाश टाकला होता मात्र ह्या उद्योगातील कामगारांच्या दरिद्री, लाचार जिण्याकडे लक्ष वेधण्याचा, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा सिंक्लेअरचा हेतू सफल होण्याऐवजी आपल्याला अस्वच्छ मांस मिळते, याबद्दल लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे त्याला पाहावे लागले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ⇨ फ्रँक्लिन रुझवेल्ट ह्यांनी सिंक्लेअरला भेटीला बोलावून मांसआवेष्टन उद्योगातील परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्या उद्योगाची चौकशी करविली. परिणामतः अन्नपदार्थांच्या कडक तपासणीसाठी ‘ प्युअर फूड अँड ड्रग लॉ ’ हा कायदा करण्यात आला. द जंगल ही कादंबरी अमेरिकन साहित्यात ‘ मक्रेकर’ म्हणून निर्देशिल्या गेलेल्या साहित्यिकांच्या लेखनात विशेष लौकिक प्राप्त झालेली साहित्यकृती होय. ज्यांना काहीच चांगले दिसत नाही आणि जे पूर्वग्रहदूषित द्दष्टीने वाईट तेच शोधत असतात अशी माणसे, ह्या अर्थाने मुळात वापरल्या गेलेल्या ह्या संज्ञेला, ‘सामाजिक आस्था असलेले आणि अन्याय्य परिस्थिती धैर्याने उघड करणारे’ असाही अर्थ प्राप्त झाला.द जंगल नंतर सिंक्लेअरने तत्कालीन परिस्थितीशी निगडित अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. उदा., ⇨ कोलोरॅडो येथील कोळशाच्या खाणींच्या उद्योगातील कंपन्यांचे तेथील सामाजिक-राजकीय जीवनावर असलेले वर्चस्व उघड करणारी किंग कोल (१९१७) आणि अमेरिकेतल्या तेल उद्योगातले घोटाळे, लाचखोरी, कामगारांची छळवणूक ह्यांवर प्रकाश टाकणारी ऑइल ! (१९२७). तथापि द जंगल ची लोकप्रियता त्यांना मिळाली नाही.
सिंक्लेअरने विपुल लेखन केले. त्यात कादंबऱ्यांप्रमाणेच पुस्तपत्रे, सामाजिक विषयांवरील अभ्यासलेख, आरोग्य, धर्म, परचित्तज्ञान, कथा, नाटके ह्यांचाही अंतर्भाव होतो. ‘लॅनी बड सीअरिझ’ ह्या नावाने प्रसिद्घ असलेल्या त्याच्या अकरा कादंबऱ्याही उल्लेखनीय आहेत. दारुगोळा इ. युद्घसाहित्य निर्मिणाऱ्या एका उद्योजकाचा अनौरस पुत्र लॅनी बड हा ह्या कादंबऱ्यांचा नायक. हा जगभर प्रवास करतो अनेक प्रसिद्घ व्यक्तींना भेटतो अनेक आंतरराष्ट्रीय उलाढालीत भाग घेतो आणि राजकीय डावपेच खेळतो. १९१४–५३ पर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटनांचा वेध ह्या कादंबरीमालिकेने घेतला आहे. वर्ल्ड्स एंड (१९४०), बिट्वीन टू वर्ल्ड्स (१९४१), ड्रॅगन्स टीथ (१९४२), वाइड इज द गेट (१९४३), प्रेसिडेन्शल एजंट (१९४४), ड्रॅगन हार्व्हिस्ट (१९४५), ए वर्ल्ड टू विन (१९४६), प्रेसिडेन्शल मिशन (१९४७), वन क्लीअर कॉल (१९४८), ओ शेफर्ड, स्पीक ! (१९४९) आणि द रिटर्न ऑफ लॅनी बड (१९५३) ह्या त्या कादंबऱ्या होत. ह्या कादंबऱ्यांना मोठा वाचकवर्ग लाभला. ह्या कादंबऱ्यांनापैकी ड्रॅगन्स टीथ ह्या कादंबरीला पुलिट्झर पारितोषिक मिळाले.
क्रांतिपूर्व आणि क्रांत्युत्तर रशियामध्ये सिंक्लेअरच्या साहित्याला मोठी लोकप्रियता होती पण तिथल्या कम्युनिस्ट राजवटीला त्याने विरोध करताच ती ओसरु लागली. पुढे त्याच्या फॅसिस्टविरोधी भूमिकेमुळे तो तेथे पुन्हा काही काळ लोकप्रिय ठरला.
अमेरिकेचे अध्यक्ष ⇨ वुड्रो विल्सन ( कार. १९१३–२१) ह्यांच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी १९१७ मध्ये सिंक्लेअरने समाजवादी पक्ष सोडला तथापि पुढे तो पुन्हा त्या पक्षात आला. त्याची विचारसरणी नेहमीच समाजवादी राहिली. १९३४ मध्ये त्याने डेमॉक्रॅ टिक पक्षातर्फे कॅलिफोर्निया राज्याच्या गव्हर्नरपदाची अयशस्वी निवडणूक लढविली. कॅलिफोर्नियातील दारिद्य नष्ट करण्याचा कार्यक्रम त्याने दिला होता. १९२३ मध्ये त्याने कॅलिफोर्नियात ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज यूनियन’ स्थापन केली. द ऑटोबायॉग्र फी ऑफ अप्टन सिंक्लेअर (१९६२) हे त्याचे आत्मचरित्र होय.
बाउंड ब्रुक, न्यू जर्सी येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.