सिंक्यांग : शिंजिआंग. चीनच्या अखत्यारातील पश्चिमेकडील एक मोठा प्रदेश. ‘चायनीज तुर्कस्तान’ या नावाने तो पूर्वी प्रसिद्घ होता.त्याचे अधिकृत नाव सिंक्यांग-ऊईगुर स्वायत्त प्रदेश असे आहे. त्याचे क्षेत्रफळ १६,४६,७०० चौ.किमी. असून लोकसंख्या २,१८,१३,३३४ (२०१०) होती. ऊरुमची ( वूलूमूची ) हे राजधानीचे मुख्य शहर होय. हा भूभाग उजाड, तुरळक लोकसंख्येचा, वाळवंट व डोंगरांनी व्याप्त आहे. चीनचा सु. १७ टक्के भूभाग त्याने व्यापला असून देशाच्या एक टक्का लोकसंख्या यात आढळते. त्याच्या ईशान्येस मंगोलिया वायव्येस किर्गिझस्तान, ताजिकिस्तान नैर्ऋत्येस अफगाणिस्तान व पाकव्याप्त काश्मीर आग्नेयीस तिबेट आणि पूर्वेस कान्सू व सिंघाई ( चिन्झाई ) या चिनी प्रांतांनी सीमित झाला आहे. प्राकृतिकद्दष्ट्या त्याचे उत्तरेकडून दक्षिणेकडे नॉर्दर्न हायलॅन्ड्ज, झुंगेरियन खोरे, तिएनशान ( खगोलीय पर्वत ), तारीम खोरे आणि कुनलुन पर्वतश्रेणी असे पाच भाग पडतात. त्यांपैकी झुंगेरियन नदीखोरे सभोवतालच्या डोंगररांगांनी वेढलेले असून तिएनशान भूभागाचा काही प्रदेश बारमाही बर्फाच्छादित असतो. त्यातून अनेक हिमनद्या वाहतात. तारीम खोऱ्याच्या तिन्ही बाजूंस डोंगर असून मध्यभागी वाळवंट आहे आणि त्यात अनेक मरुद्याने आढळतात. सु. ७,००,००० चौ.किमी. भूभाग वाळवंटाने व्यापला असून कुनलुन पर्वतांचा उत्सेध ७,३०० मी. आहे. सस.पासून हा प्रदेश आत दूरवर असल्यामुळे आणि पर्वतरांगांनी व्यापलेला असल्यामुळे, येथील हवामान उष्णकटिबंधीय कोरडे आहे.

हा प्रदेश चीनच्या हान वंशाच्या आधिपत्याखाली ( इ. स. पू.२०२–इ. स. २२०) होता. त्याच्या अधःपतनानंतर स्थानिक पुढाऱ्यांनी स्वायत्तता मिळविली मात्र सातव्या शतकात थांग वंशाच्या साम्राज्याचा तो एक भाग बनला. तेराव्या शतकात चंगीझखान याने तो पादाक्रांत केला आणि त्यावर मंगोलांनी काही काळ अधिसत्ता प्रस्थापित केली. पुढे मांचू वंशाच्या राजवटीच्या काळात (१६४४–१९१२) त्यावर चीनचे नियंत्रण व अधिसत्ता होती. चीनने १८८४ मध्ये त्यास प्रांताचा दर्जा दिला. त्याच्या क्लिष्ट प्राकृतिक रचनेमुळे मध्यवर्ती शासनाच्या ढिसाळ नियंत्रणाचा फायदा उठवीत स्थानिक सरदारांनी तेथील शासनावर वर्चस्व मिळविले. चिनी कम्युनिस्ट शासनाच्या आधिपत्याखाली हा प्रदेश १९४९ मध्ये आला. त्यास १९५५ मध्ये सिंक्यांग-ऊईगुर स्वायत्त प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

सिंक्यांगमध्ये ४० विविध वांशिक गट असून त्यांपैकी ऊईगुर यांची लोकसंख्या दोन पंचमांश आहे. ते मुस्लिम असून तुर्की भाषा बोलतात. अन्य वांशिक समूहांत मंगोलियन, कझाक, उझबेग, हुई (चिनी मुस्लिम ), ताजिक, तातर, ताहूर, रशियन इत्यादींचा अंतर्भाव होतो. झुंगेरियन व तारीम खोऱ्यांत प्रामुख्याने लोकवस्ती असून त्यांपैकी ४०% शेती व अन्य पशुपालन म्हणून घोडे व मेंढ्या यांचे कळप पाळतात मात्र हा प्रदेश उष्णकटिबंधीय कोरड्या हवामानाचा असल्यामुळे शेती ही मुख्यत्वे पाण्यावर अवलंबून आहे. कापूस, मका, भात, बाजरी, गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. फलोत्पादनाच्या बाबतीत हा प्रदेश प्रसिद्घ असून येथील गोड हमी खरबुजे, बीजविरहित द्राक्षे आणि इला सफरचंदे यांना चांगली बाजारपेठ असून त्यांची निर्यात होते. कोळसा, लोह, युरेनियम, टंगस्टन, तांबे, ग्रॅफाईट इ. खनिजांचे साठे या प्रदेशात असून वूलूमूची व कोलामाई शहरांदरम्यान तसेच तारीम खोऱ्यात तेलक्षेत्रे आहेत.

या प्रदेशात वूलूमूची, कोलामाई, ई-निंग आणि कश्गर ही चार प्रमुख शहरे असून त्यांतून खनिजांवर प्रक्रिया करण्याचे कारखाने आहेत. सिंक्यांगमध्ये पद्घतशीर रस्ते तयार केले असून रेल्वेचे जाळे आहे. वूलूमूचीमध्ये विमानतळ आहे. तिथून अन्य शहरांशी हवाई वाहतूक होते.

कुंभारगावकर, य. रा.