सारनाथ : भारतातील एक प्रसिद्घ प्राचीन बौद्घस्थळ. ते उत्तर प्रदेशात वाराणसीच्या (बनारस) उत्तरेस सु. ९ किमी. वर गाझीपूर रस्त्यावर वसले आहे. या स्थळाविषयीची माहिती मुख्यत्वे फाहियान (इ. स. सु. ३४०–४२२) व ह्यूएनत्संग (इ. स. ६०२–६६४) या चिनी प्रवाशांचे वृत्तांत, प्राचीन साहित्य, शिलालेख आणि उत्खनित अवशेष यांवरून मिळते. प्राचीन साहित्यात या स्थळाचा उल्लेख ऋषिपत्तन (इसिपत्तन) आणि मृगदाव (मिगदाव) असा आढळतो. या दोन्हीसंबंधी काही कथा-वदंता आढळतात. भारत सरकारने गौतम बुद्घाच्या २,५०० व्या महानिर्वाणदिनाच्या निमित्ताने येथे कृत्रिम वन निर्माण करून मृगदाव (हरिणांचे वन) या संकल्पनेस उजाळा देण्याचा प्रयत्न केला मात्र सारनाथ हे अपभ्रंश नाव सारंगनाथ या प्राचीन गुप्तकालीन शिवमंदिरावरून रूढ झाले असावे.
कोरीव लेखांत या स्थळाचा उल्लेख सद्धर्मचकप्रवर्तन विहार असा केला आहे. भगवान बुद्घांनी पहिला धर्मचकप्रवर्तन सूत्राचा उपदेश सारनाथ येथे केला आणि भिक्षुसंघ स्थापिला. यामुळे या स्थानास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. ⇨ सर अलेक्झांडर कनिंग हॅमने या स्थळाचे १८३५ मध्ये निरीक्षण केले मात्र तत्पूर्वीच १७९४ मध्ये येथील अशोकाने बांधलेल्या धर्मराजिकानामक स्तूपाच्या विटा वाराणसीचा दिवाण जगत सिंग याने बांधकामासाठी काढल्या होत्या. तेथे अश्मपेटीत ठेवलेला धातु-करंड सापडला होता. तो कुठे गेला, याचा ठावठिकाणा लागत नाही. त्यानंतर १८७१ मध्ये याचे बौद्घ अवशेषांसाठी शासकीय स्तरावर सर्वेक्षण झाले. पुढे १९०४ मध्ये उत्खननास प्रारंभ झाला. १९०७-०८च्या उत्खननांत धर्मराजिका स्तूप अशोककालीन असल्याचे सिद्घ झाले. त्यानंतर या ठिकाणी अनेक उत्खनने झाली. या उत्खननांत सम्राट अशोकाच्या कालापासून (इ. स. पू. २७३–२३२) बाराव्या शतकापर्यंतचे विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यांत स्तूप, विहार, आरसपानी अशोकस्तंभ, गुप्तकालीन बुद्घ-बोधिसत्त्वांची शिल्पे, कुशाणकालीन भव्य बोधिसत्त्वमूर्ती इ. महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले. याशिवाय गुप्तकाळात बांधलेली आणि ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशाने उल्लेखिलेली मूलगंधकुटीची वास्तू आढळली.
ह्यूएनत्संगाने या स्थळासंबंधी सविस्तर माहिती नोंदविली असून त्याच्या मते तिथे १,५०० भिक्षू-भिक्षुणी राहात असाव्यात. तसेच इथेच बसून तथागत बुद्घाने धर्मचक्रप्रवर्तन सूत्राचा उपदेश केला होता. ही वास्तू बौद्घ धर्माच्या वैभवकाळात सुरेख मूर्तींनी अलंकृत केली असावी कारण येथील उत्खननांत अनेक मूर्ती व त्यांच्या पीटिका मिळाल्या आहेत. तसेच गुप्तकालीन सारनाथचा धमेख (धर्माख्य) स्तूप वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची उंची सु. ४३ मी. होती व परिघ सु. ३० मी. आहे. हा स्तूप घन आणि उंच गोल असून त्यावरील कोरीव काम लक्षणीय आहे. सम्राट अशोकाने येथे एकसंध वालुकाश्मात घडविलेला सु. २१ मी.उंचीचा एक सिंहशीर्षस्तंभ उभारला होता. त्याचे २ मी.उंचीचे स्तंभशीर्षच फक्त सुस्थितीत आहे. या स्तंभावर बाह्मी लिपीत अशोकाची आज्ञा कोरली आहे. या स्तंभशीर्षास सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या विशेष महत्त्व असून स्वतंत्र-सार्वभौमम भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) म्हणून ते स्वीकारले आहे आणि त्याखालील चोवीस आरे असलेले ⇨ अशोकचक्र राष्ट्रध्वजावर घेतले आहे. एकूण अशोकस्तंभांमध्ये सारनाथचा स्तंभ आरसपानी, चकाकी व जोशपूर्ण प्राण्यांचे शिल्पांकन यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. (पहा : मराठी विश्वकोश : खंड १, चित्रपत्र ४३). येथील बहुतेक मूर्ती, सिंहशीर्षस्तंभ व अन्य अवशेष संग्रहालयात ठेवले आहेत. मूर्तिशिल्पांत भरदार मिशा असलेले एक मुखशिल्प आणि धर्मचक्रप्रवर्तन आविर्भावातील शांत मुद्रा धारण केलेली एक वालुकाश्मात घडविलेली अप्रतिम बुद्घमूर्ती आहे.
महमूद गझनीने १०१७ मध्ये वाराणसीबरोबर सारनाथ उद्ध्वस्त केले. त्यानंतर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात कनौजच्या गोविंदचंद्राच्या कुमारदेवी या राणीने कुशाणकालीन काही वास्तूंची पुनर्बांधणी केली आणि धर्मचक्र जिना विहार बांधला तथापि मुहम्मद घोरीच्या सैन्याने अनेक वास्तू-मूर्तींची फोडतोड केली. सांप्रत हे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले असून त्या विकासात धर्मपाल या बौद्घभिक्षूचा आणि महाबोधी सोसायटीचा मोठा वाटा आहे. येथे महाबोधी विश्वविद्यालय, अतिथिनिवास, उद्यान आणि मूलगंधकुटी विहार (महाबोधी सोसायटीने बांधलेला, १९३१) इ. भव्य वास्तू बांधल्या आहेत. या विहारात संगमरवरी धर्मचक्रमुद्रेतील सुंदर बुद्घमूर्ती असून भिंतीवर जपानी चित्रकार कोसेतू नोसू यांनी जातककथांतील चित्रे काढली आहेत.
जैनांचा तीर्थंकर श्रीश्रेयासनाथ यांचा येथे जन्म झाला असावा, या समजुतीने जैन धर्मीयही हे क्षेत्र पवित्र मानतात. (चित्रपत्र).
पहा:अशोक–२ अशोकस्तंभ.
संदर्भ: 1. Government of India, Ministry of Information and Broadcasting, Comp., Buddhist Shrines in India, Delhi, 1998.
2. Sahni, D. R. Guide to the Buddhist Remains at Sarnath, Calcutta,1933.
3. Vogel, J. Ph. Sahni, D. R. Catalogue of the Museum of Archaeology at Sarnath, Calcutta, 1914.
देव, शां. भा.
“