सायलीशिया : यूरोपातील पोलंड या देशातील एक इतिहासप्रसिद्घ प्रदेश. पोलिश शास्क. क्षेत्रफळ ४९,००० चौ. किमी. ओडर नदीच्या दोन्ही काठांवर सु. ३५५ किमी. लांब व सु. ११५ किमी. रुंद हा भूभाग पसरलेला आहे. सायलीशियात लोखंडादी खनिजे असल्यामुळे मध्ययुगापासून दुसऱ्या महायुद्घापर्यंत त्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न यूरोपीय राष्ट्रांनी–मुख्यत्वे जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड, रशिया व चेकोस्लोव्हाकियाने–केला. या प्रदेशाच्या नैर्ऋत्येस सुडेटन पर्वतराजी, दक्षिणेस बेस्किड्झ पर्वत आणि आग्नेयीस क्राकाऊ-व्ह्येल्यून्य पठार आहे. अगदी दक्षिणेस चेकोस्लोव्हाकियाचा प्रदेश आहे.

सायलीशियातील मूळ लोक स्लाव्ह वांशिक असल्यामुळे त्यांच्या नावावरून सायलीशिया हे नाव ह्या प्रदेशास पडले असावे, असा तज्ज्ञांचा कयास आहे. मूलतः सायलीशिया हा पोलिश प्रांत होता. हंगेरीच्या पहिल्या चार्ल्सने सायलीशिया बोहीमियन राजास आंदण दिला. त्यामुळे या प्रदेशावर पवित्र रोमन साम्राज्याची अधिकृत सत्ता आली. राजेशाही आधिपत्य रोमनांकडे असले, तरी तेथील लहान मोठे राजपुत्र आपापल्या स्थानिक प्रदेशात सत्ताधारी होते. त्यामुळे १४२५ आणि १४३५ मध्ये हयुसाईटांच्या विरुद्घ सायलीशिया पवित्र रोमन सम्राट सिगमंड याच्यासाठी लढला परंतु पुढे बोहीमियाने तो भूप्रदेश पुन्हा घेतला. बोहीमियन गादीवर ऑस्ट्रियन आर्चड्यूक पहिला फर्डिनँड विराजमान झाला (१५२६) आणि तो पुढे रोमन सम्राट झाला. त्यामुळे हॅप्सबर्ग घराण्याची सत्ता सायलीशियावर प्रस्थापित झाली. धर्मसुधारणा आंदोलनात सायलीशिया प्रॉटेस्टंट धर्मपंथाकडे झुकला. परिणामतः त्याने प्रॉटेस्टंटवादी बोहीमिया आणि सॅक्सनी राजे यांच्याशी संगनमत करून हॅप्सबर्गविरुद्घच्या तीस वर्षीय युद्घात (१६१८–४८) भाग घेतला. याचा प्रारंभ प्रॉटेस्टंट व रोमन कॅथलिक यांच्या संघर्षातून झाला होता. अठराव्या शतकात ऑस्ट्रिया आणि प्रशिया यांत सायलीशियावर स्वामित्व मिळविण्यासाठी १७४०– ४२, १७४४-४५ आणि १७५६–६२ अशी तीन युद्घे झाली. त्यांना ऑस्ट्रियन वारसा युद्घेही म्हणतात. तिसरे युद्घ नोव्हेंबर १७६२ मध्ये युद्घबंदी करार होऊन थांबले व हर्बट्सबर्गच्या १६ फेब्रुवारी १७६३ च्या तहाने प्रशियाचा सायलीशियावरील हक्क मान्य करण्यात आला. पहिल्या महायुद्घानंतर (१९१९) जर्मनी व पोलंड यांनी सायलीशियाचे विभाजन केले. तेव्हा दक्षिण सायलीशियाचा काही भाग चेकोस्लोव्हाकियाने व्यापला. सायलीशियात १९२१ मध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यावेळी बहुसंख्य जनतेने जर्मनीला पसंती दर्शविली तथापि तेथील पोलिश लोकांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रसंघाने सायलीशियाचा अंतर्भाव पोलंडमध्ये केला आणि जर्मन लोकांनी स्थलांतर केले. दुसऱ्या महायुद्घानंतर मित्र (दोस्त) राष्ट्रांनी १९४५ मधल्या पॉट्सडॅम परिषदेत सर्व सायलीशिया पोलंडमध्ये समाविष्ट करावा, असे मत व्यक्त केले तरीसुद्घा रशियाने काही भाग व्यापला होता. आधुनिक सायलीशियाची लोकसंख्या एकूण पोलंडच्या लोकसंख्येच्या एकचतुर्थांश एवढी असून सायलीशियाचा काही भाग आजही चे कोस्लोव्हाकिया व जर्मनीच्या अखत्यारीत आहे.

सायलीशियात दगडी कोळसा, लोहखनिज, जस्त वगैरे खनिजांच्या खाणी असल्यामुळे जड उद्योगांना चालना मिळाली आहे. धातूच्या विविध प्रकारच्या निर्मितीचे कारखाने येथील शहरांतून असून जड यंत्रे, मोटारी इत्यादींची निर्मिती होते. तसेच वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. सायलीशिया खोरे हे सुपीक जमिनीसाठी प्रसिद्घ असून तीत कडधान्ये, बटाटे, साखरबीट, तंबाखू, ऊस ही पिके मुख्यत्वे घेतली जातात.

पोलंडच्या आधिपत्याखालील व्ह्रोट्स्लाफ (लोक. ६,४०,३६७–२००२) हे जुने राजधानीचे शहर असून ते औद्योगिक दृष्ट्या एक महत्त्वाचे शहर मानले जाते. तिथे विद्यापीठ असून आर्चबिशपचे धर्मपीठ आहे. याशिवाय काटाव्हीत्से, बीटॉ, झाबर्झे, कॉर्झूहॉ, व्हाल्ब्‌झिक्, ऑपॉल ही काही मोठी औद्योगिक शहरे होत. चेकोस्लोव्हाकियातील सायलीशिया भागात कार्व्हना आणि ऑपव्हा ही शहरे महत्त्वाची होत.

देशपांडे, सु. र.