सायरस द ग्रेट : (इ.स.पू. ५९०/५८०?–५३०). ॲकिमेनिडी साम्राज्याचा संस्थापक व एक थोर इराणी राजा. त्याच्या जन्मतारखेविषयी तसेच सालाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याचा जन्म विद्यमान इराणच्या फार्स प्रांतातील मेडिया किंवा पेर्सिस येथे झाला. ⇨ हीरॉडोटस (इ. स. पू.सु. ४८४–इ. स. पू. ४२४) या ग्रीक इतिहासकाराच्या मते तो दुसऱ्या कॅम्बायसीझचा मुलगा असून दुसऱ्या सायरसचा नातू होता. ⇨ झेनोफन (इ. स. पू. सु. ४३०–इ. स. पू. ३५५) या ग्रीक इतिहासकाराने सायरोपेडिया या त्याच्याविषयीच्या चरित्रग्रंथात त्यास आदर्श व सहिष्णू राजा म्हटले असून तत्संबंधी अनेक रंजक आख्यायिका दिल्या आहेत. तसेच इराणी लोक त्यास पितृवत मानीत. बायबलमध्ये त्याचा उल्लेख ज्यूंचा मुक्तिदाता असा केला आहे. अनेक इतिहासतज्ज्ञांच्या मते हा दुसरा सायरस (इ. स. पू. ५८५–५२९) असून क्यूनिफॉर्म लिपीतील एका अकेडियन (सुमेरियन भाषा) लेखात याविषयी माहिती मिळते.

हीरॉडोटस, झेनोफन आणि ⇨ थ्यूसिडिडीझ (इ. स. पू. सु. ४७१?–इ. स. पू. ३९९) हे तिन्ही ग्रीक इतिहासकार त्याच्या बालपणाविषयी लोककथा सांगतात. हीरॉडोटसच्या वृत्तांतात मिडीझचा राजा आणि इराणी लोकांचा सर्वेसर्वा ॲस्टायअझिस याची मुलगी मॅन्डेन ही कॅम्बायसीझला दिली होती. तिच्यापासून सायरस द ग्रेट झाला तेव्हा ॲस्टायअझिसला स्वप्न पडले की, हा मुलगा आपले राज्य बळकावणार, म्हणून त्याने तो दहा वर्षांचा असताना त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा आपल्या राजकीय सल्लगारास दिली मात्र त्याने त्याच्यातील विशेष गुण जाणून एका धनगराकडे त्यास सोपविले. तो वयात आल्यानंतर त्याने आपल्या आजोबांविरुद्घ बंड केले, तेव्हा ॲस्टायअझिसने त्याच्यावर स्वारी केली पण त्याच्याच सैन्याने त्याच्याविरुद्घ पवित्रा घेऊन सायरसला मदत केली (इ. स. पू. ५५८). त्यामुळे तो मिडीझचा राजा झाला.

प्रथम त्याने इराणी आदिम जमातींवर विजय मिळविला आणि राज्य सुस्थिर केले. त्यानंतर त्याने लिडियाचा राजा क्रिसस या आशिया मायनरमधील राजावर स्वारी केली. इ. स. पू. ५४७ मध्ये त्याने लिडियाची राजधानी जिंकली आणि क्रिससला मारले असावे किंवा क्रिससने आत्महत्या केली असावी. काही साधनांप्रमाणे त्याला तुरुंगात टाकण्यात आले. इजीअन समुद्रातील अनेक आयोनियन ग्रीक शहरे लिडियाच्या आधिपत्याखाली मांडलिक राज्ये होती. ती या विजयश्रीमुळे सायरसच्या ताब्यात आली. त्यातील काहींनी बंडे केली. ती सायरसने क्रूरपणे मोडली. त्यानंतर सायरसने बॅबिलोनियाकडे मोर्चा वळविला. त्याचा राजा ⇨ नेबुकॅड्नेझर याविषयी लोकांत नाराजी होती. त्याचा फायदा त्याने घेतला. एवढेच नव्हे, तर बॅबिलन शहरातील मार्डूक या राष्ट्रीय देवतेचे पुजारीही नेबुकॅड्नेझरच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामुळे अखेर बॅबिलन हे तत्कालीन जगप्रसिद्घ प्राचीन शहर व राजधानी ऑक्टोबर ५३९ इ. स. पू. मध्ये सायरसच्या हाती पडली. बायबलमधील वृत्तानुसार सायरसने बॅबिलोनियाच्या तुरुंगातील ज्यूंची सुटका केली आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत पाठविले. याशिवाय त्याने मार्डूक देवतेची यथास्थित संभावना करून अन्य देवतांच्या पूजेअर्चेची व्यवस्था केली. तेथील लोकांच्या चालीरीती, रूढी यांत हस्तक्षेप न करता त्या चालू ठेवल्या. त्यामुळे त्याच्या सहिष्णू धोरणाविषयी लोकांत आदराची भावना निर्माण झाली. बॅबिलोनियाच्या पाडावामुळे सिरिया आणि पॅलेस्टाइन हे भूप्रदेशही त्याच्या अंमलाखाली आले कारण ते बॅबिलोनियाने जिंकून घेतलेले होते. क्रिससवर स्वारी केली, तेव्हा आशिया मायनरमधील सिलिशियाच्या राजाने त्यास मदत केली होती, म्हणून सिलिशियाच्या बाबतीत त्याने सौम्य धोरण अनुसरून त्यास विशेष स्थान व मान दिला. सायरसने मुत्सद्देगिरी आणि लष्कराच्या जोरावर एक बलाढय साम्राज्य स्थापन केले. त्याच्या साम्राज्यात अनेक राजधान्या-उपराजधान्या होत्या. त्यांपैकी एज बॅटना (आधुनिक हमदान) हे मीडीझचे शहर होते. दुसरी राजधानी नवसाम्राज्याची इराणमधील पसारगडी येथे होती. येथेच त्याने ॲस्टायअझिसविरुद्घ निर्णायक लढाई केली. शिवाय बॅबिलन येथे त्याची हिवाळी राजधानी होती. या तिन्ही प्राचीन शहरांतील उत्खननांत तत्कालीन अवशेष उपलब्ध झाले आहेत.

सायरसने जित प्रदेशातील लोकांच्या रूढी, परंपरा, धर्म, देवदेवता यांत कधीच हस्तक्षेप केला नाही मात्र त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. त्यामुळे त्याचे ॲकिमेनिडी साम्राज्य सुसंस्कृत व सुधारणावादी म्हणून ख्यातनाम झाले. त्याच्या धर्मविषयक सहिष्णू वृत्तीमुळे आदिम जमातींनीही त्यास दुवा दिला. सायरसच्या व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याला चार मुलगे आणि एक मुलगी होती. त्याच्या मुलांपैकी दोन मुलांची काहीच माहिती ज्ञात नाही. त्याच्यानंतर कॅम्बायसीझ हा मुलगा गादीवर आला आणि त्याने ॲटोसा या आपल्या सख्ख्या बहिणीबरोबर विवाह केला आणि बार्दियानामक भावाला ठार मारले.

ग्रीक इतिहासकारांच्या मते सायरस हा पहिला यशस्वी राजा होय की, ज्याने भटक्या जमातींची राणी मासागेटायी हिचा पराभव केला. त्याने तिच्या मुलाला कैद केले, तेव्हा तिच्या मुलाने आत्महत्या केली. त्यामुळे चिडून जाऊन तिने याचा बदला घेण्याचे ठरविले आणि सायरसचा पराभव करून त्यास ठार मारले परंतु या कथेत संदिग्धता आहे. सायरसने बहुराष्ट्रीय ॲकिमेनिडी साम्राज्य स्थापन केले आणि पहिल्या विश्वराज्य या संकल्पनेचा पाया घातला. त्याचे राज्य सिंधू नदीपासून इजीअन समुद्रापर्यंत पसरले होते.

संदर्भ : 1. Lamb, Harold, Cyrus the Great, New York, 1976.

2. Mathur, M. W. Hewitt, J. W. Xenophon’s Anabasis, 1979.

देशपांडे, सु. र.