सायफोनोफोरा :सीलेंटेरेटा (आंतरगुही) संघातील ⇨ हायड्रोझोआ वर्गातील हा प्राण्यांचा एक गण आहे. या गणातील प्राणी पाण्यात पोहणारे वा तरंगणारे असून ते निवहजीवी (समूहात राहणारे) आहेत. सायफोनोफोरात बहुरूपता आढळते म्हणजे हे प्राणी एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात [⟶ बहुरूपता]. यामागे प्रामुख्याने कामाच्या विभागणीचे तत्त्व असते. विविध कार्ये निवहातील निरनिराळ्या जीवकांमार्फत पार पाडली जातात. पॉलिप हे काहीसे दंडगोलाकार प्राणी व मेड्यूसा (जेलीफिश) हे घंटेच्या व वाडग्याच्या आकाराचे प्राणी एका देठास किंवा तबकडीस चिकटलेले असतात. शिवाय हवेची पिशवी (प्लावक) काही प्राण्यांत आढळते.

 

पॉलिपच्या बाहेरील बाजूस संस्पर्शक नसतात. दंशकोशिकांची संख्या जास्त असून त्या ताकदवान असतात. मेड्यूसा हा अपूर्ण परंतु चिकटलेला वा मुक्त असतो, त्यास पेरिसार्क(बाहेरील आवरण) नसते.

 

सायफोनोफोरा गणात कॅल्कोफोरा व फायसोफोरिडा या दोन उपगणांचा समावेश होतो. कॅल्कोफोरा उपगणात हवेची पिशवी नसते. एक किंवा अधिक पोहणारे जीवक (कमी-अधिक प्रमाणात स्वतंत्र असलेले निवहातील व्यक्तिगत प्राणी) हे निवहाच्या वरील भागात असतात. उदा., अबेला, डायफायसिस. फायसोफोरिडा उपगणातील प्राण्यांत मोठ्या आकाराची हवेची पिशवी असून ती निवहाच्या वरील भागात असते. यातील जीवक हे पॉलिप व मेड्यूसा स्वरूपांत आढळतात. उदा., फायजेलिया, हॅलीस्टेमा.

 

पॉलीपाइड : या जीवकाचे तीन प्रकार आढळतात.

 

गॅस्ट्रोझॉइड : यांना सायफन असेही म्हणतात. ते अन्न घेण्याचे काम करतात, त्यासाठी बाहेरील बाजूस तोंड असते. निवहास अन्नाचा पुरवठा करणे हे त्यांचे काम आहे.

 

डॅक्टिलोझॉइड: हे निवहाचे संरक्षण करणारे जीवक असतात. त्यांच्यावर दंशकोशिका मोठ्या प्रमाणावर असतात.

 

गोनोझॉइड: हे प्रजनन करणारे जीवक आहेत. त्यांना ब्लास्टोस्टाइल असेही म्हणतात. ते अलैंगिक पद्घतीने मुकुल व लैंगिक पद्घतीने मेड्यू सॉइड तयार करतात. काही प्राण्यांत त्यांचा आकार गॅस्ट्रोझॉइडासारखा असतो. वेलेला व पॉरपिटा या प्राण्यांना तोंड असते.

 

मेड्यूसा : हे जीवक चार प्रकारांत आढळतात.

 

न्यूमॅटोफोर : सायफोनोफोरा गणातील कॅल्कोफोराखेरीज इतर गणातील प्राण्यांत हवेने वा वायूने भरलेली पिशवी आढळते. तिचा उपयोग प्राण्यांस तरंगण्यासाठी होतो. ही पिशवी उलट्या घंटेच्या आकाराची असते. ती दोन स्तरांपासून बनलेली असून आतील जागेत वायू भरलेला असतो. वायू तयार करणाऱ्या ग्रंथीचे तोंड ह्या पिशवीत उघडते. फायजेलियामधील हवेच्या पिशवीत कार्बन मोनॉक्साइड वायू मोठ्या प्रमाणावर आढळतो. हॅलीस्टेमा प्राण्यांत ही पिशवी अतिशय लहान, तर पॉरपिटामध्ये तबकडीच्या आकाराची आढळते.

 

 

नेक्टोकॅलिसे किंवा नेक्टोझॉइड : या प्रकारात तोंड, हस्तक व संस्पर्शक संवेदांगे नसतात. यास पोहण्यासाठी विविध घंटेसारख्या आकारांच्या वायूने भरलेल्या पिशव्या असतात. त्यांचा उपयोग निवहाच्या हालचालीसाठी होतो.

 

बॅक्टस : या प्रकाराला हायड्रोफिलीया अथवा फायलोझॉइड असे म्हणतात. त्यांचे आकार ढाल, लोलक, पान वा हेल्मेट यांसारखे असतात. त्यांचा उपयोग निवहाच्या संरक्षणासाठी होतो.

 

गोनोफोर : हे जीवक लैंगिक मेड्यूसा किंवा गोनोफोर या नावाने ओळखले जातात. ते स्वतंत्र देठावर (दांड्यावर) किंवा निवहात आढळतात. नर व मादी मेड्यूसा हे एकत्र वा निवहात किंवा स्वतंत्र आढळतात. गोनोफोरवर जनन ग्रंथी असतात.

 

फायजेलियामध्ये मादी गोनोफोर हे मेड्यूसासारखे असतात तर नर गोनोफोर हे लहान पिशवीच्या आकाराचे असतात. ते निवहाचा एक भाग म्हणून राहतात (नर फायजेलिया) किंवा स्वतंत्र होतात (मादी फायजेलिया, पॉरपिटा, वेलेला). ते लिंग कोशिका सोडल्यावर मृत होतात, कारण ते स्वतंत्रपणे अन्न घेऊ शकत नाहीत.

 

पॉलिप हे अलैंगिक पद्घतीने प्रजोत्पादन करतात, तर मेड्यूसा किंवा गोनोफोर हे लैंगिक पद्घतीने प्रजोत्पादन करतात. यामुळे सायफोनोफोरामध्ये दोन्ही पद्घतींनी एकाआड एक (आलटून-पालटून) प्रजनन होत असते. त्यास पिढ्यांचे एकांतरण असे म्हणतात. [⟶ एकांतरण, पिढ्यांचे].

 

एका मतानुसार सुरुवातीचे सीलेंटेरेट हे पॉलिप रूपात होते व त्यानंतर मेड्यूसा निर्माण झाले. मेड्यूसाद्वारे लैंगिक प्रजोत्पादन पार पाडले जाते. दुसऱ्या मतानुसार सीलेंटेरेटांचे पूर्वज हे मेड्यूसा स्वरूपता होते व पॉलिप हा त्यांचा डिंभ समजला जातो. यातूनच बहुरूपता निर्माण झाली असावी.

 

पहा : सीलेंटेरेटा हायड्रोझोआ.

 

संदर्भ : 1. Bhamrah, H. S. Juneja, Kavita, An Introduction to Coelenterata, New Delhi, 2001.

2. Kotpal, R. L. Coelenterata, Meerut, 1990.

 

पाटील, चंद्रकांत प.