सायपेरेसी : (इं. सेजेस म. मोथा कुल, मुस्तक कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका कुलाचे हे नाव असून ⇨ ग्रॅमिनी या तृण कुलाबरोबर या कुलाचा अंतर्भाव ⇨ ग्रॅमिनेलीझ या तृण गणात केला जातो. ⇨ जॉन हचिन्सन आणि रिखार्ट फोन वेटश्टाइन यांनी सायपेरेलीझ (मुस्तक) या स्वतंत्र गणात सायपेरेसी कुलाचा समावेश केला आहे कारण ⇨ जुंकेसी (प्रनड) कुलाशी असलेले त्याचे साम्य आणि त्यावरून ग्रॅमिनी व सायपेरेसी यांचा जुंकेलीझ किंवा जुंकेसीपासून (त्यांच्या मते) झालेला समांतर क्रमविकास (उत्क्रांती) होय. या कुलात सु. ९०प्रजाती व सु. ४,००० जाती असून गवताप्रमाणे त्यांचा प्रसार जगात सर्वत्र आहे. त्यांचे सर्वसाधारण स्वरूप गवतासारखे असून त्या बहुधा पाणथळ जागी वाढतात. या सर्व वनस्पती ⇨ ओषधी आहेत. त्या बहुधा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) क्वचित वर्षायू असून त्यांना संयुतपदी भूमिस्थित खोड (मूलक्षोड) असते वायवी खोड घन व त्रिधारी असते. पाने साधी, तीन रांगांत व रेषाकृती असून तळाशी बंद आवरक (वेढून राहणारा भाग) असतो. फुले लहान, द्विलिंगी अथवा एकलिंगी, तुसांनी वेढलेली आणि कणिशके व कणिशे अशा लहान फुलोऱ्यांत असतात. ह्या लहान फुलोऱ्यांची मांडणी कधीकधी मंजरी, वल्लरी, स्तबक व परिमंजरी या प्रकारच्या मोठ्या पुष्पबंधांवर असते [⟶ पुष्पबंध]. परिदलांचा पूर्ण अभाव किंवा त्यांची जागा सूक्ष्म खवले अथवा केस यांनी व्यापलेली असते. केसरदले बहुधा तीन, सुटी परागकोश अधःबद्घ (तळाशी सांधलेले) किंजदले दोन किंवा तीन किंजपुट ऊर्ध्वस्थ व एकपुटक (तळातून वर आलेले) असते. किंजल एक व किंजल्के २-३ आणि शिखायुक्त (केसाचा तुरा असलेली) फुले वायुपरागित असतात [⟶ फूल]. एकबीजी शुष्क फळ कृत्स्न किंवा कपाली प्रकारचे [⟶ फळ] व बिया सपुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश असलेले) असते. खोडात व पानांत भेदोद्भव (कोशिकावरणे अलग होऊन निर्माण झालेले) हवामार्ग आढळतात व मूलक्षोडात कधीकधी एकमध्य ⇨वाहक वृंद असतात. या कुलातील लव्हाळा (नागरमोथा), कचोरा, निर्विशी, मोथा इ. वनस्पती औषधी आहेत. काहींच्या खोडापासून टोप्या, चटया व टोपल्या बनवितात काहींचे मूलक्षोड खाद्य तर काहींचे खोड व मुळे सुगंधी असतात ⇨ पपायरसापासून कागद बनवितात.

पहा : ग्रॅमिनी सेज.

संदर्भ : 1. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, स. वि.