सायपंक्युलिडा : प्राणिसृष्टीतील एक संघ. ⇨ कार्ल लिनीअस यांनी गांडुळासारख्या प्राण्यांसाठी सर्वांत प्रथम ‘सायपंक्युलिअस’ या शब्दाचा वापर केला.ॲडम सिज्विक यांनी १८९८ मध्ये सायपंक्युलिडा यास संघाचा दर्जा दिला. आता तो नगण्य संघांपैकी एक संघ मानला जातो. या संघात सु. १३ प्रजाती व सु. २५० जाती आहेत. यामध्ये सायपंक्युलस, फॉस्फोसोमा, सायफोनोसोमा, डेंड्रोस्टोमा आणि डेंड्रोस्टोम या काही प्रजाती आहेत. १८८८ मध्ये हॅटशेक यांनी सायपंक्युलिडा प्राणी ⇨ ॲनेलिडा या संघाच्या जवळचे आहेत असे दाखविले. त्यांच्या विकासातील व शरीररचनेतील साम्यावरून हा संबंध त्यांनी दाखविला. उदा., (१) सायपंक्युलिडाची त्वचा व उपत्वचा ही स्नायूपासून बनलेली असते. (२) तंत्रिका तंत्र ॲनेलिडासारखे असते. (३) विदलन हे वलयांकित प्रकारचे असते. (४) ट्रोकोफोअर हा डिंभ तयार होतो. (५) वृक्कक असतात परंतु सायपंक्युलिडामध्ये ॲनेलिडा प्राण्यांत आढळणारी वलये नसतात. तसेच त्यांत नसणारे अंतर्मुख असते. यावरून ते ॲनेलिडापेक्षा वेगळे प्राणी आहेत. सायपंक्युलिडा यांच्यानंतर ॲनेलिडा प्राणी निर्माण झाले असावेत.
सायपंक्युलिडा संघातील प्राणी समुद्रात आढळणारे, अळी व कृमीसारखे असून त्यांच्यात देहगुहा असते. तोंडाभोवती संस्पर्शके असतात. या प्राण्यांना ‘पिनट वर्म’ असेही म्हणतात. ते समुद्रात मध्यम खोलीपासून सु. ५,००० मी. खोलीपर्यंत आढळतात. ते स्थानबद्घ वा स्वतंत्रपणे जगणारे असून वाळूत बिळे करून वा रिकाम्या शिंपल्यात किंवा पाणवनस्पती, प्रवाळ, स्पंज यांच्या आधाराने राहतात. ते बिळातून बाहेर काढल्यावर फारच थोडी हालचाल करतात. संकटाची चाहूल लागताच ते बिळाबाहेरील भाग शरीरात ओढून घेतात व बिळात जातात. त्यांच्या अन्नसेवनाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ते पक्ष्माभिकाच्यासाह्याने अन्न घेतात. संस्पर्शकांचा उपयोग त्यांना अन्नाचा शोध घेण्यासाठी होतो. सायपंक्युलिडा संघातील प्राणी हे मासे, समुद्रपुष्प, खेकडा व शीर्षपाद यांसारख्या प्राण्यांचे अन्न आहे.
सायपंक्युलिडा प्राण्यांचे शरीर लांबट व दंडगोलाकार असून त्यावर वलये नसतात. शरीराचे आकारमान २ मिमी. पासून ६० मिमी. पर्यंत असते. बहुतेक प्राणी १५ ते ३० मिमी. लांबीचे असतात. शरीराचे दोन भाग असतात. सुरुवातीच्या भागास अंतर्मुख व पाठीमागच्या भागास धड म्हणतात. ते गडद काळ्या व करड्या रंगाचे असतात.
अंतर्मुख भाग पूर्णपणे शरीरात लपलेला असतो, त्यासाठी त्यास प्रत्याकर्षक (आत ओढून घेणारे) स्नायू असतात. त्यामध्ये डोके व सुरुवातीचे भाग असतात. तो पूर्णपणे बाहेर आल्यावर अंतर्मुखाच्या मध्यभागी तोंड असते. अंतर्मुखावर पूर्ण किंवा भागशः काटे वा आकडे असतात. धड दंडगोलाकार असून त्यावर काटे वा आकडे नसतात. काही प्राण्यांत ते कठीण ढालीसारखे असते.
त्वचा स्नायूंपासून बनलेली असून बाह्य बाजूस उपचर्म वा उपत्वचा असते. आतील बाजूस भरपूर संवेदांगे व ग्रंथी असतात तसेच स्नायूंचे समूह असतात.
देहगुहेच्या आतील बाजूस पक्ष्माभिकी अधिस्तराचे आवरण असते. देहगुहेत पिवळसर रंगाचा द्रव असतो. या द्रवाच्या दाबामुळे अंतर्मुख बाहेर येते व त्वचेचे आकुंचन-प्रसरणहोते. या द्रवात कोशिका असतात.
सायपंक्युलिडाचे आतडे नळीसारखे असून ते इंग्रजी यू (U) अक्षराच्या आकाराचे व वेटोळ्याच्या स्वरूपात असते. त्यामध्ये ग्रसिका, ग्रसनी (घसा), आतडे, गुदांत्र व गुदद्वार असे पचन तंत्राचे भाग असतात.
श्वसन व रक्ताभिसरण तंत्रांचे अवयव यांच्यात नसतात. देहगुहेतील द्रवामार्फत या दोन्ही तंत्रांची कामे पार पाडली जातात. या द्रवातील कोशिकांमध्ये हेमेरिथ्रिन हे लाल रंगद्रव्य असून त्यात लोह असते.
उत्सर्जन तंत्रात एक किंवा दोन पश्चवृक्कके असून ती धडाच्या भागात असतात. पश्च वृक्कके उभट व इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकाराचे असून त्याचा रंग तांबूस वा पिवळसर असतो. त्याच्या बाहेरील बाजूस पश्चवृक्कक रंध्र असते. ते युग्मक वाहिनी म्हणून काम करते. त्याच्या मार्फत जनन कोशिका बाहेर टाकल्या जातात.उत्सर्जन कोशिकांचे समूह असून त्या सुट्या होऊन देहगुहेतील द्रवात राहतात. त्यांनी गोळा केलेले उत्सर्जक पदार्थ पश्चवृक्ककांमार्फत बाहेर टाकले जातात.
तंत्रिका तंत्रात अर्धग्रसिका गुच्छिका अथवा मेंदू, अधोग्रसिका गुच्छिका व या दोन्ही गुच्छिकांना जोडणाऱ्या परिग्रसिका संयोजकाची एक जोडी तसेच गुच्छिकायुक्त तंत्रिकारज्जू (मज्जारज्जू)यांचा समावेश होतो. मेंदू व तंत्रिकारज्जूपासून तंत्रिका तंतू निघतात.
सायपंक्युलिडात नर व मादी वेगवेगळे असतात. विणीच्या हंगामात जननग्रंथी शरीरात तयार होतात. यात जनन कोशिका निर्माण केल्या जातात. त्यांची पूर्ण वाढ होण्यापूर्वी त्या देहगुहेत सोडल्या जातात. देहगुहेत त्यांची वाढ पूर्ण होते. नराच्या जनन कोशिका युग्मक वाहिनीमार्फत शरीराबाहेर टाकल्या जातात. मादी उन्हाळ्यात अंडी घालते. अंड्याचे फलन शरीराबाहेर समुद्राच्या पाण्यात होते. अंड्यातून कोशिका-विभाजनाने ट्रोकोफोअर हा डिंभ तयार होतो. एका महिन्याच्या स्वतंत्र जीवनानंतर तो तळाशी स्थिर होतो व त्याचे रूपांतर प्रौढामध्ये होते. सायपंक्युलिडामध्ये अलैंगिक पद्घतीने प्रजनन होत नाही, परंतु या प्राण्यात पुनर्जननाची शक्ती मोठ्या प्रमाणावर आढळते.
संदर्भ : 1. Kotpal, R. L. Minorphyla, Meerut, 1981.
2. Parker, T. J. Haswell, W. A. Textbook of Zoology : Invertebrates, Vol. I, New Delhi, 1992.
पाटील, चंद्रकांत प.
“