सायकॅडेलीझ : प्रकटबीज वनस्पतींतील (उपवर्ग-सायकॅडोऐफायटा ) एक गण [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग]. यामध्ये सायकॅडेसी हे एकच कुल असून त्यातील ⇨सायकस ही प्रजाती बरीच पसरलेली व प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. या गणातील वनस्पती फार प्राचीन असून त्यांचा उदय उत्तर पुराजीव महाकल्पात (सु. ३५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वी) झाला त्यानंतरच्या मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांचा प्रसार जगभर आणि विशेषतः किटेशस कल्पात (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वी) बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाला.

विद्यमान पादपजातींत (वनस्पतींत) यांच्या एकूण नऊ प्रजाती व सु. १०० जाती असून त्यांचा प्रसार फक्त उष्ण व उपोष्ण कटिबंधांत मर्यादित आहे. त्यांचे दोन गट पडतात : (१) पाश्चिमात्य गटातील सेरॅटोझॅमिया (सहा जाती), डायून (तीन जाती) व मायक्रोसायकस (एक जाती) ह्या तीन प्रजाती विषुववृत्ताच्या उत्तरेस मेक्सिको ते वेस्ट इंडीजमध्ये आढळतात आणि झॅमिया (तीस जाती) फ्लॉरिडा ते चिलीपर्यंत सापडते. (२) पौर्वात्य गटातील सायकसाखेरीज इतर बॉवेनिया (एक जाती) व मॅकोझॅमिया (चौदा-पंधरा जाती) फक्त ऑस्ट्रेलियात असून एनसेफॅलारटॉस (बारा–पंधरा जाती) व स्टँगेरिया (एक जाती) द. आफिकेत आढळतात. सायकस (वीस जाती) जपानपासून भारत व ऑस्ट्रेलियापर्यंत पसरले असून भारतात हिच्या पाच-सहा जाती आढळतात. इतर प्रजातींतील अनेक जाती शास्त्रीय उद्यानांत व इतर उद्यानांत विशेष काळजीपूर्वक लावून ठेवल्या जातात तथापि एकंदरीत त्यांची संख्या बरीच कमी आहे.

ताडा-माडाप्रमाणे [⟶ पामी] या वनस्पतींना शाखाहीन जाड खोडावर अनेक, बहुधा संयुक्त व पिसासारख्या मोठ्या पानांचा झुबका असून खोडाची उंची साधारण १–२० मी. पर्यंत आढळते. काहींचे खोड लहान व गंथिल (गाठाळ) असते(झॅमिया फ्लॉरिडा) यांची वाढ मंद गतीने होते व हे वृक्ष बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असतात.

सायकॅडेलीझ गणातील वनस्पती द्विभक्तलिंगी असून प्रजोत्पादक इंद्रिये ( बीजुकपर्णे ) पुं-शंकू व स्त्री-शंकूमध्ये रचलेली ( एकांतरित म्हणजे एकाआड एक किंवा कधी मंडलित ) व बहुधा संख्येने खूप असतात शंकू खोडाच्या टोकावर येतात. लघुबीजुकपर्णे शंकूवर गर्दीने येतात ती बहुधा सपाट [⟶ सायकस] किंवा छत्राकृती [⟶ एक्विसीटम] असून त्यांच्या खालच्या बाजूस असंख्य (क्वचित थोडे) लघुबीजुककोश विखुरलेले किंवा २–६ च्या समूहांनी (पुंजांनी) मांडलेले असतात. त्यांची रचना, मांडणी, स्फुटन पद्घती इ. नेचांतल्याप्रमाणे [⟶ मॅरॅटिएसी मॅरॅटिएलीझ] असून बीजुके निर्माण करणारा पहिला थर ⇨अभित्वचे पासून बनतो. बीजुककोशाचे आवरण जाड व लघुबीजुके असंख्य असतात.

स्त्री-शंकू बहुधा मोठे ३०–६० सेंमी. लांब असतात. सायकसामध्ये शंकू नसून गुरुबीजुकपर्णे पानाप्रमाणे व २–१० गुरुबीजुककोश त्यांच्या कडेवर असतात. इतर प्रजातींत शंकू खोडाच्या टोकांवर ( क्वचित बाजूवर) असून गुरुबीजुकपर्णे छत्राकृती व जोडीने असतात.

सायकस प्रजातीतील जातींची काही सामान्य लक्षणे या गणातील इतर जातींत आढळतात. मध्यशीर व बाजूच्या शिरा आणि इतर काही लक्षणे यांतील फरक लक्षात घेऊन सायकॅडेसी, स्टँगेरिएसी व झॅमिएसी अशा तीन कुलांत सायकॅडेलीझ गणाची विभागणी केलेली आढळते.

पश्चिम क्यूबातील मायक्रोसायकसाच्या बियांचा उपयोग बुचासारखा होत असल्याने त्यातील जातींना इंगजीत ‘पामा क्वार्का’ असे म्हणतात. डायून, सायकस एनसेफॅलारटॉ यांच्या बिया खाद्य आहेत. काही सायकसाच्या जाती व झॅमिया फ्लॉरिडा यांच्या खोडापासून खाद्य पीठ काढून त्यापासून साबुदाणा बनवितात.

टीनिऑप्टेरीस : सायकॅडेलीझ गणातील सुरुवातीच्या प्रजातींपैकी एक. कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या ( सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वीच्या ) खडकांच्या सर्वांत वरच्या थरांपासून ते क्रिटेशस कल्पाच्या तळातील (सु. १२ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकापर्यंत बहुतेक सर्वत्र आढळणाऱ्या काही वनस्पतींच्या पानांचे ⇨जीवाश्म (शिळारुप अवशेष) ह्या प्रजातीच्या नावाने ओळखले जातात. टी. जी. हाले (१९२७) यांनी ह्या पानांच्या जीवाश्मांची वाटणी सु. ११ जातींत केली परंतु त्यांतील काटेकोर फरक ठरविण्यात त्यांना बरीच अडचण भासली. टी. एम्. हॅरिस (१९३७) यांनी अभ्यासलेल्या स्कोरेस्बी साउंड (पूर्व ग्रीनलंड)येथील काही जातींचे पुढील तीन नैसर्गिक गट पाडले : (१) ⇨ बेनेटाइटेलीझऐमध्ये आढळणाऱ्या त्वग्रं ध्रां सारख्यांचा टीनिओझॅमाइट गट (२) सायकॅडेलीझमध्ये आढळणाऱ्या त्वग्रंध्रां सारख्यांचा डोरॅटोफायलम गट व (३) मॅरॅटिएसी [⟶ मॅरॅटिएलीझ] ह्या नेचांच्या कुलात निश्चितपणे समाविष्ट असलेल्या जातींप्रमाणे पाने असणाऱ्यांचा गट [⟶ नेचे]. यांशिवाय या तीन गटांत समाविष्ट न होणाऱ्या जातींचा त्यांनी टीनिऑप्टेरीस ह्या प्रजातीत अंतर्भाव केला. काहींनी ही प्रजाती नेचांत समाविष्ट केली आहे परंतु तिच्यातील जाती प्रकटबीज (सायकॅडेलीझ) वनस्पतींपैकी असणे शक्य आहे. त्यांची पाने लांबट व अरुंद असून मध्यशीर मजबूत व ठळक दिसते तिच्यापासून बाजूस काटकोन करुन दुय्यम समांतर शिरा निघतात (उदा., केळीच्या पानांतील शिरांप्रमाणे) व नंतर द्विभक्त होतात (उदा., अनेक नेच्यांतील शिराविन्यासाप्रमाणे). स्वीडनच्या ऱ्हेटिक थरातील (उच्च ट्रायासिक म्हणजे सु. २० कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांतील) जुविया सिंप्लेक्स ह्या सु. २·८० मी. उंच वृक्षावरच्या साध्या चिवट पानांना ‘टीनिऑप्टेरीस’ म्हटले आहे. ह्या वृक्षाच्या प्रजोत्पादक भागास पॅलिओसायकस ( गुरुबीजुकपर्णे ) म्हणतात व तो आधुनिक सायकसासारखा दिसतो सायकॅडेलीझ गणातील सुरुवातीच्या जातींपैकी तो असावा.

 जुविया सिंप्लेक्स : (१) संपूर्ण वृक्ष (२) टीनिऑप्टेरीस (पान) (३) पॅलिओसायकस (गुरूबीजुकपर्ण).टी. बिटाटा ही जाती विशेषेकरुन (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात अस्तित्वात होती. पर्मोकार्बॉनिफेरस (सु. ३५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चीन (शांसी ) मधील जीवाश्मात टी. नो रि नी ही जाती ⇨बीजी नेचात समावि ष्ट केलेली आढळते. त्याच काळातील अमेरिकेच्या (कॅनझस) गार्नेट वनस्पतीत टीनिऑप्टेरीसा चा बीजी नेचात अंतर्भाव केलेला आढळतो. भारतात खालच्या पूर्व गोंडवनी खडकांत ( राणीगंज माला ) टीनिऑप्टेरीसा च्या दोन जाती आढळतात तसेच इतरत्र काही जाती (राजमहालात सहा व जबलपूर मालेत दोन) आढळतात.

पहा : नेचे बीजी नेचे वनस्पति, प्रकटबीज उपविभाग साबुदाणा सायकस.

संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York 1967.

2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.

3. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Bombay, 1966.

4. Mukharji, H Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

5. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.