साम्यवाद : (कम्यूनिझम). समाजातील संपत्ती सर्वांच्या मालकीची असावी, संघटित श्रमांद्वारे निर्मित उत्पादन आणि तिचे वितरण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे व्हावे, समाजाच्या शक्तींचा विकास व्हावा व अंतिमतः वैश्विक स्तरावर वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज स्थापन व्हावा, की जेथे मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास करावयास मुक्त असेल, हा मूलभूत सिद्घांत निर्दिष्ट करणारी ही विचारप्रणाली होय. साम्यवाद या संज्ञेच्या अंतर्गत साम्यवादी शासन, साम्यवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी क्रां तिकारी चळवळ, साम्यवादी जीवनशैली वगैरे विविध कल्पना अंतर्भूत होतात. साम्यवाद ही एक राजकीय चळवळ असून ती द्वंद्वात्मक जडवादाच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेते. साम्यवाद या विचारप्रणालीत समानतेचे तत्त्व अध्याद्यात असले, तरी ती अन्य विचारप्रणालींहून–विशेषतः लोकशाही समाजवादी तत्त्वप्रणालीहून–भिन्न आहे कारण लोकशाही समाजवादी तत्त्वप्रणालीत संसदीय लोकशाही आणि संविधान यांना विशेष महत्त्व असते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : साम्यवाद या संकल्पनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. प्राचीन काळी चीन, इराण, इंका संस्कृती आणि काही आदिम समाजांत वर्गविरहित समताप्रधान समाजव्यवस्था रुढ असल्याचे दाखले मिळतात. इतिहासकाळात सामुदायिक जीवन जगणारे अनेक छोटे समाजगट होते. पश्चिमी देशांत राजकीय तत्त्वज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात ज्या विविध विचारांचा उदय झाला त्यांत साम्यवादी विचारसरणीचाही अंतर्भाव होता. प्रसिद्घ ग्रीक तत्त्वज्ञ ⇨प्लेटो ( इ. स. पू. सु. ४२८– ३४८) याने आपल्या रिपब्लिक या ग्रं थात पालकवर्गासाठी साम्यवादी राज्यव्यवस्थेचे चित्र रेखाटले आहे. त्याने कल्पिलेल्या तत्त्ववेत्त्या राज्यकर्त्यांची जीवनपद्घती साम्यवादी स्वरूपाची आहे. हा राज्यकर्ता खाजगी मालमत्तेच्या मालकी हक्कातून मुक्त असावा. तसेच राज्यकर्त्या वर्गाने कुटुंबसंस्थेचा त्याग करून सामुदायिक जीवन जगावे, वैयक्तिक स्वार्थ आणि लोभ यांपासून अलिप्त असावे, अशी त्याची भूमिका होती. राजकीय शहाणपणा आणि मनाची प्रगल्भता यांचा संगम झाल्याशिवाय जगातील कोणत्याही राज्यात शांतता नांदणार नाही, हा प्लेटोचा सिद्घांत सर्वकालीन स्वरूपाचा आहे. प्लेटोने प्रत्यक्षात तो आणण्यासाठी तत्त्वज्ञ राज्यकर्त्याची कल्पना मांडली. राज्यकर्त्या वर्गासाठी त्याने विशिष्ट अभ्यासक्र मही सूचित केला आहे. प्लेटोच्या साम्यवादी कल्पनेत मुख्यत्वे तीन गोष्टींवर भर दिला आहे. त्या म्हणजे, बालकवर्गाच्या साम्यवादात खासगी मालमत्तेला स्थान नाही. कुटुंबसंस्था नसेल व संतानोत्पत्ती ‘यूजेनिक्स’च्या तत्त्वाने होईल व राज्य मुलांचे संगोपन करील. या ध्येयाने प्रेरित होऊन राज्यकर्त्यांनी समाजाला मार्गदर्शन करावे, अशी त्याची अपेक्षा होती. गीक तत्त्वज्ञ ⇨सीशीयमचा झीनो ( इ. स. पू. सु. ३३६–२६५) याने स्टोइक पंथ स्थापन केला. त्याने स्टोइक मताचा पुरस्कार केला आणि सुखदुःखाविषयी निर्विकार राहून नैसर्गिक हक्कांविषयी एक तत्त्वप्रणाली प्रसृत केली. त्यानुसार सर्व माणसे निसर्गतः व जन्मतः स्वतंत्र आणि समान असतात. खासगी संपत्ती ही कल्पना मूलभूत नैसर्गिक अवस्थेत ज्ञात नव्हती.

ख्रिस्ती धर्माच्या पुरस्कर्त्यांनी मानवता व बंधुभाव यांसारखे समानतेचे तत्त्व प्रतिपादन केले. सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळात सर्वांना समान हक्क होते. खाजगी मालमत्तेविषयी ममत्व ठेवू नये, अशीही भूमिका घेतली होती. याला प्रारंभी काही पाद्र्यां नीही सहमती दिली परंतु चर्चच्या प्रमुख मंडळींनी यास विरोध करताच फक्त पाखंडी मताच्या लोकांनी ही साम्यवादी वृत्ती जोपासली. मध्ययुगात पुन्हा दुसऱ्यांदा बाप्तिस्मा घेतलेल्या भिन्न मताच्या लोकांनी जर्मनीतील धर्मसुधारणा आंदोलनाच्या वेळी या तत्त्वांचा प्रसार केला. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात ⇨ टॉमस मोर  (१४७८– १५३५) या इंग्र ज मानवतावादी विचारवंताने यूटोपिया (१५१६) या ग्रंथात एका काल्पनिक आदर्श समाजाचे वर्णन केले असून त्यात प्राचीन नगरराज्ये, पेगन मत, दंडशास्त्र, शासननियंत्रित शिक्षणव्यवस्था, धार्मिक बहुसत्तावाद, द्वैतवाद, स्त्रियांचे अधिकार, सामाजिक समता व समान न्याय यांसारख्या विषयांची चर्चा केली आहे. त्याने प्लेटोपासून स्फूर्ती घेतली. त्याच्या कांतदर्शित्ववादी विचारांत साम्यवादाचे ओझरते दर्शन घडते. सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये लेवलर्सच्या पंथाच्या अनुयायांनी साम्यवादाला भरीव स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक भेद आणि विषमता नष्ट करून सर्वांना एका समान पातळीवर आणणे, हे समतावाद्यांचे उद्दिष्ट होते, तर जहाल समतावाद्यांना समान पद्घतीने जमिनीची वाटणी अभिप्रेत होती. भूमी हा संपत्तीचा मौलिक ठेवा असून ती सर्व मनुष्यप्राण्यांसाठी दिलेली नैसर्गिक देणगी आहे. खासगी मालमत्तेच्या अधिकारावर त्यांनी प्रहार केला. समाजातील विकृती नष्ट करावयाची झाल्यास प्रथम खाजगी संपत्ती-मालमत्ता–विशेषतः जमिनीवरील–नष्ट केली पाहिजे, असे जहाल समाजवाद्यांनी प्रतिपादिले. गाब्री एल माब्ली (१७०९–८५) या फ्रेंच इतिहासकार तत्त्ववेत्त्याने विषमतेमुळेच माणसाचा अधःपात होतो, हे मत मांडले. एवढेच नव्हे तर, सर्व वस्तूंवर राज्यसंस्थेची सत्ता प्रस्थापित करून तिच्या द्वारे प्रत्येक नागरिकाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व वस्तू पुरवाव्यात, अशी सूचना केली होती. यानंतर ⇨टॉमस पेन (१७३७–१८०९) याने व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी हक्क यांचे समर्थन करून मनुष्याची दारिद्रयतून मुक्तता करण्यावर अधिक भर दिला. त्याच्या परखड विचारात साम्यवादाचे पडसाद उमटतात. एत्येन काबे (१७८८–१८५६) या सुधारणावादी फ्रेंच विचारवंताने यूटोपियन समाजव्यवस्थेचा प्रयोग केला. आदर्श शांततावादी साम्यवादी चळवळीची पूर्वपीठिका त्याने मांडली. त्याच्या लेखनाचा प्रभाव उत्तर अमेरिकेतील अनेक अयशस्वी साम्यवादी प्रयोगांत आढळतो. फ्रा न्सच्या राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फ्रांस्वा बॅबफ (१७६०–९७) याने क्रांतिकारी साम्यवादाची बीजे पेरली. त्याच्या मते फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आणखी एक क्रांती निश्चित होणार असून तीत कामगारवर्गाची मुक्तता होईल. साम्यवाद ही संज्ञा ल्वी ब्लांकी (१८०५–८१) याने पॅरिसमधील गुप्त-संघटनांत कार्यरत असताना प्रथम उपयोगात आणली. तो अत्यंत प्रक्षोभक क्रां तिकारक होता. त्याने १८३९, १८४८ व १८७१ मधील क्रां त्यांमधून सकिय सहभाग घेतला होता.


औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार व कामगार असे दोन नवीन वर्ग निर्माण झाले आणि त्यांमधील विषमतेचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले. औद्योगिक क्रांती ही मुळात एक प्रक्रिया होती. ती जगातील अनेक देशांत शास्त्रीय शोध लागल्यानंतर निरनिराळ्या कालखंडांत घडून आली. तिच्यामुळे सरंजामशाही अर्थव्यवस्था संपुष्टात येऊन उद्योगानुकूल आर्थिक नीती स्वीकारली गेली परंतु दुसऱ्या बाजूला औद्योगिक क्रांतीमुळे मनुष्यप्राण्यांचे दारिद्य आणि दैन्यावस्था अधिकच वाढीस लागल्याचे आढळले. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्ग मोठ्या संख्येने शहरांत स्थायिक झाला. कामगारांच्या प्रश्नाने वेगळे व तीव्र स्वरूप धारण केले. ही विषमता तत्कालीन विचारवंतांना अस्वस्थ करणारी ठरली. ती नाहीशी करण्यासाठी काही विचारवंतांनी आपल्या परीने प्रयोगही सुरु केले. या प्रयोगांमध्ये विशुद्घ मानवतावादी दृष्टिकोन होता आणि समता निर्माण करण्याची तळमळ होती. त्यातून अपेक्षित फलप्राप्ती कदाचित झाली नसेल पण साम्यवादी समाजजीवनाच्या आणि विचाराच्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा टप्पा होता, हे मान्य करावेच लागेल. यांना स्वप्नाळू व मनोराज्यवादी समाजवादी म्हणतात. या विचारवंतांत मुख्यत्वे काँत द सेंट-सायमन (१७६०–१८२५), फ्रा न्स्वा मेरी चार्ल्स फूर्ये (१७७२– १८३७), ⇨रॉबर्ट ओएन (१७७१–१८५८) वगैरेंचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. फ्रेंच समाजवादाचा संस्थापक असलेल्या सेंट सायमनने जीवनभर गरिबांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. उत्पादन करणाऱ्या श्रमजीवीवर्गाला समाजोपयोगी मानले पाहिजे आणि त्याच्याकडेच समाजाचे नेतृत्व असले पाहिजे असे त्याचे मत होते. या संदर्भात त्याने संसदेच्या पुनर्रचनेसाठी केलेली सूचना मूलगामी स्वरूपाची होती. या सूचनेत साम्यवादी दृष्टी होती. फूर्येने कामगारवर्गाचे दारिद्य आणि दास्य नष्ट करण्यासाठी चारशे कुटुंबे राहतील, अशा एका आदर्श वसाहतीचा आराखडा तयार केला होता आणि तिचे सर्व व्यवस्थापन सहकारपद्घतीवर स्थानिक प्रतिनिधीद्वारे चालेल, तिचे आर्थिक जीवन कृषिप्रधान असेल आणि अशा अनेक वसाहती मिळून मध्यवर्ती सत्ता अस्तित्वात येईल, अशी त्याची धारणा होती. ओएनने साम्यवादी विचाराला सहकारी समाजवादाचा प्रत्यक्ष प्रयोग करून दिशा दिली. कामगारांना चारित्र्यसंपन्न व कार्यक्षम नागरिक बनविण्यासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे, असे त्याचे मत होते. सहकारावर आधारलेली समाजरचना करण्यासाठी त्याने ऐक्य व सहकार या तत्त्वांवर नगरे उभारण्याची योजना हाती घेतली. सहकारी शेती व औद्योगिकीकरण यांची सांगड घालून त्याने नगरे वसविली आणि अनेक बेकारांना रोजगार उपलब्ध केला. या संदर्भात अमेरिकेतील इंडियाना राज्यातील त्याची वसाहत आदर्श होती पण ती पुढे विसर्जित झाली.

मार्क्सवाद :कार्ल मार्क्स (१८१८–८३) आणि ⇨फ्रीड्रिख एंगेल्स (१८२०–९५) या दोघांनी साम्यवाद या संकल्पनेची शास्त्रशुद्घ मीमांसा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (१८४८) या ग्रंथात केली. त्यांनी सेंट सायमन, ओएन, फूर्ये इ. पूर्वसूरी विचारवंतांना स्वप्नदर्शी समाजवादी ( यूटोपियन सोशॅलिस्ट ) म्हटले आहे. साम्यवादाचा हा जाहीरनामा प्रसिद्घ करण्यापूर्वी ‘द लीग ऑफ द जस्ट’ या गुप्तसंघटनेचे मार्क्स व एंगेल्स सभासद झाले होते. त्यांनी या लीगचे नाव बदलून ‘कम्युनिस्ट लीग’ केले. मार्क्स आणि एंगेल्स यांनी एक वर्ष खपून ⇨कम्युनिस्ट जाहीरनामा  तयार केला (१८४८). त्यात त्यांनी प्रथम द्वंद्वात्मक विकासाच्या इतिहासाचा मुख्य सिद्घांत सांगितला. विविध वर्गांतील संघर्ष-सिद्घांत हाच इतिहास होय हा सिद्घांत प्रथम सांगून वर्गविहीन समाजरचना निर्माण होण्याकरिता शेवटी कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली क्रांती होणार आणि त्यात विजय होऊन शेवटी समताप्रधान व विकसनशील साम्यवादी समाजरचना निर्माण होईल, असे भाकित त्यांनी वर्तविले आहे. हा जाहीरनामा साम्यवादाच्या इतिहासामधील विचारांच्या प्रचाराचे एकमेवाद्वितीय असे साधन ठरले.

ऐतिहासिक व द्वंद्वात्मक भौतिकवाद हा शास्त्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. तो भांडवलशाहीच्या उत्पत्तीचा व विकासाचा शास्त्रशुद्घ अभ्यास असून तिच्या अंगभूत गुणधर्माप्रमाणे ती कामगारांचे वाढते शोषण करून अतिरिक्त मूल्ये कशी निर्माण करते व त्यामुळे इतिहासक्र मानुसार येणाऱ्या पुढच्या अवस्थेला म्हणजे क्रांतीला समाज कसा तयार होतो, हे कम्युनिस्ट जाहीरनाम्यामध्ये दाखविले आहे. भांडवलशाहीविरुद्घ कामगारांमध्ये तीव्र  असंतोष माजला होता. तो असंतोष फुलवून त्याचे क्रां तिकारक उठावात रुपांतर करता येईल, अशी मार्क्सची, त्याच्या मित्रांची व इतर समाजवाद्यांची कल्पना होती. मार्क्सचा हा भौतिकवादी, तात्त्विक दृष्टिकोन आहे. मार्क्सचे अर्थकारण व राजकारण यांना तो पायाभूत आहे. समाजव्यवस्था बदलत असते आणि हा बदल उत्पादनसाधने, उत्पादनपद्घती व त्या पद्घतींत निर्माण झालेले सामाजिक संबंध यांच्या बदलांमुळे घडून येतो. या सिद्घांतालाच मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद ( हिस्टॉरिकल मटीरिॲलिझम ) म्हटले आहे. इतिहास घडतो व बदलतो, तो भौतिक कारणांमुळे–विशेषतः वस्तूंच्या उत्पादनाची आणि विनिमयाची साधने व पद्घती बदलल्यामुळे. या सिद्घांतानुसार मार्क्सने मानवेतिहासाची संगती लावली आणि अगदी आदिम कालापासून भांडवलशाही क्रांतीपर्यंतच्या इतिहासाच्या टप्प्यांची अवस्था सांगितली. त्यात गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही व समाजवाद यांचा समावेश होतो. अखेर भांडवलशाहीच्या अंगभूत नियमांनुसार कामगारवर्ग प्रबळ बनतो. भांडवलदारांना समाजाच्या गरजेस पुरेसे उत्पादन वाढवता येत नाही, अशी स्थिती उत्पन्न होते, तेव्हा भांडवलशाही उत्पादनपद्घत समाजप्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरते व मग कामगारांच्या नेतृत्वाखाली क्रांती होते राजकीय सत्ता कामगारवर्ग काबीज करतो वर्गविहीन समाज अस्तित्वात येतो राज्यसंस्थेची गरज हळूहळू संपते आणि ती पुढे नष्ट होते. थोडक्यात, ऐतिहासिक विकासाच्या नियमांनुसार समाजवाद-साम्यवाद स्थापन होणे अटळ आहे, असा मार्क्सवादाचा अंतिम निष्कर्ष होय मात्र साम्यवाद तत्काळ स्थापन होणार नाही, हा इशारा त्याने स्पष्टपणे नमूद केला आहे.


कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर एंगेल्स याने त्याचा वैचारिक वारसा चालविला. त्याने साम्यवादाच्या काही कल्पना अधिक स्पष्ट केल्या आणि मार्क्सचे काही अप्रकाशित साहित्य व दास कॅपिटलच्या आवृत्त्या संपादून प्रसिद्घ केल्या. एंगेल्सनंतर मार्क्सवादाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न कार्ल काऊतस्की ( जर्मनी ), प्ल्येखानॉव्ह ( रशिया ), हिंडमन (इंग्लंड), डॅन्येल द लीआँ (अमेरिका) वगैरे साम्यवादी विचारवंतांनी केला. ते भांडवलशाही नष्ट करुन सत्ता हस्तगत करण्याच्या मार्गाचे प्रतिपादन करीत. प्ल्येखानॉव्हच्या मते रशियात साम्यवाद प्रस्थापित होण्यापूर्वी भांडवलशाही लोकशाही प्रथम प्रस्थापित व्हावी लागेल आणि नंतर अनुकमे समाजवाद व साम्यवाद प्रस्थापित होतील. रशियातील सुरुवातीच्या मार्क्सवादी नेत्यांप्रमाणे प्ल्येखानॉव्हसुद्घा पॉप्युलिस्ट कांतिकारी विचारसरणीतील एक होता. सामाजिक क्रांती जनतेनेच करावयाला पाहिजे कांतिकारकांचे काम जनतेला त्यासाठी उद्युक्त करणे एवढेच असते, या मताचा तो होता. [⟶ मार्क्सवादे].

लेनिनवाद (बोल्शेव्हिकवाद) : ⇨न्यिकलाय लेनिन (१८७०– १९२४) हा मार्क्सवादी सिद्घांतानुसार रशियात क्रांती घडवून आणणारा प्रमुख सूत्रधार होय. त्याने मार्क्सवादाचा गाढा व्यासंग करुन मार्क्सने प्रस्थापित केलेल्या कांतितत्त्वांचे सांगोपांग विवेचन आपल्या निबंधात्मक पुस्तकांतून केले. त्याची साम्यवादी चळवळीची – क्रांतीची – संकल्पना मार्क्सच्या मूलभूत उपपत्तीवर आधारित असून तीत त्याने तत्कालीन परिस्थित्यनुसार योग्य ते फेरफार केले आणि तिचा अन्वयार्थ लावून रशियात प्रत्यक्ष ती कृतीत आणली. या त्याच्या विचारसरणीला ‘लेनिनवाद’(बोल्शेव्हिकवाद) ही संज्ञा आधुनिक विचारवंत देतात. मार्क्सवाद हा कांतिकारकवर्गीय व्यवहार असून कामगारवर्गाने सत्ता संपादन करणे, हे कांतिकारक कृतीचे मुख्य उद्दिष्ट आहे, या तत्त्वाला अनुसरुन लेनिनने पक्षाची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे व्हॉट इज टु बी डन ? (१९०२) या निबंधवजा पुस्तिकेत सारांशरूपात संगहीत केली आहेत. सोशल डेमॉक्रॅटिक पक्षापुढील प्रश्न, पक्षसंघटना आणि पक्षाचा कार्यक्रम यांची त्यामध्ये चर्चा आहे. साम्यवादी पक्षाला लेनिनवादाने वर्गलढ्याचे हत्यार मानले आणि पक्षावर भांडवलदारवर्गाच्या संघटित शक्तिविरुद्घ सामना करण्यासाठी वर्गजाणीव निर्माण करण्याची जबाबदारी टाकली. त्यासाठी पक्ष कामगार संघटनांच्या आधारे निर्माण करू  नये. त्यामुळे अर्थवादालाच वाव मिळतो. म्हणून कांतिकार्याला पूर्ण वेळ वाहून घेतलेल्या, मार्क्सच्या सिद्घांताचे पूर्ण आकलन झाले आहे, अशा व्यावसायिक बिनीवाल्या सराईत कांतिकारकांच्या समूहांचा मिळून पक्ष बनविला पाहिजे पण या समूहांनी अल्पशा मोहात अडकून उच्च उद्दिष्टापासून च्युत होऊ नये, हे मूलभूत तत्त्वही त्याने सांगितले. हा पक्ष कामगारांचे नेतृत्व करेल आणि क्रांती घडवून आणेल. कांतिकारक सिद्घांत हा साम्यवादी पक्षाचा आधार असला पाहिजे कारण कांतिकारक सिद्घांत हाच कांतिकारक चळवळीचा पाया असतो. साम्यवादी पक्ष हा लोकशाही केंद्रीकरणाच्या तत्त्वावर उभा असला पाहिजे. साम्यवादी पक्षाने भांडवलदार (बूर्झ्वा) आणि त्यांचे हितसंबंधी यांविरुद्घ सतर्क राहून सतत संघर्ष करावा. पक्षांतर्गत चर्चा व नेतृत्वाचे उत्तरदायित्व लेनिनला मान्य होते. कम्युनिस्ट पक्ष हा क्रांतीच्या अगभागी ठेवून सुसंघटित व शिस्तबद्घ पक्षयंत्रणेला त्याने सर्वोच्च स्थान दिले. कामगारवर्गाच्या उत्स्फूर्त कृतीवर न विसंबता कामगारवर्गामध्ये कांतिकारक जाणिवा निर्माण करणे आणि पक्षाच्या मार्गऐदर्शनाखाली कांतिकारक कृती करणे, याला तो महत्त्व देतो. पुढे लेनिनने स्टेट अँड रेव्हलूशन (१९१७) या ग्रंथात कामगारवर्गाच्या क्रांतीनंतर भांडवलशाही संपुष्टात येऊन कामगारवर्गाची हुकूमशाही स्थापन होईल, असे म्हटले आहे. भांडवलदारवर्गाचे संपूर्ण उच्चटन हेच कामगार-वर्गाच्या हुकूमशाहीचे उद्दिष्ट असते. लेनिनचे हे विवरण मार्क्सच्या १८७१ च्या ‘पॅरिस कम्यून’ च्या मूल्यमापनावर बेतले आहे. तत्पूर्वी लेनिनने इम्पीरिअलिझम, द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटॅलिझम (१९१६) हा ग्रंथ लिहिला होता. त्यात त्याने भांडवलशाही साम्राज्यवादाचे वैकासिक टप्पे देऊन सैद्घांतिक विवेचन केले आहे. भांडवलशाहीच्या उच्चटनासाठी प्रगत भांडवलशाही राष्ट्रांमधील वर्गलढ्यांची वासाहतिक प्रदेशांमधील वर्गलढ्यांबरोबर सांगड घातली पाहिजे, असा विचार त्याने मांडला. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीवर मार्क्स-एंगेल्सखालोखाल लेनिनच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव जाणवतो.

लेनिनच्या नेतृत्वाखाली त्याच्या सूचनाप्रमाणे बोल्शेव्हिकांनी १९१७ मध्ये सशस्त्र उठाव करुन रशियातील संयुक्त शासन पदभ्र ष्ट केले आणि लेनिनने समाजवादी क्रांती झाल्याचे घोषित केले. पुढे १९१८ मध्ये लेनिनने संसद (ड्यु मा) रद्द करू न कम्युनिस्ट पक्षाची राजवट प्रस्थापित केली. यादवी युद्घानंतर विविध देशांतील डाव्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणून त्याने पक्षाची ध्येय-धोरणे, मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान आणि पक्षशिस्त यांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ‘थर्ड इंटरनॅशनल’किंवा ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’( कॉमिंटर्न ) नावाची संस्था स्थापन केली (१९१९). तत्पूर्वीच त्याने सोशल डेमॉकटिक पक्षाचे रूपांतर कम्युनिस्ट पार्टीत केले होते. त्याने क्रांतीनंतर शेतकऱ्यांना काही सवलती दिल्या मात्र राष्ट्रीयीकरणाच्या त्याच्या धोरणास विरोध झाला. पक्षाघाताच्या झटक्यामुळे लेनिन अखेरची काही वर्षे (१९२१–२४) विकलांग झाला. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचा सचिव ⇨जोझेफ स्टालिन (१८७९–१९५३) सर्व व्यवहार पाहात असे.


लेनिननंतर १९२५ मध्ये जोझेफ स्टालिन याच्याकडे रशियातील साम्यवादी चळवळीची सूत्रे आली. त्याने मार्क्सच्या तत्त्वज्ञानात विशेष अशी भर घातली नाही मात्र स्वतःच्या काही कल्पना मांडून समाजवादाची शास्त्रशुद्घ प्रगती रशियातच होऊ शकेल, असा दावा केला आणि रशिया हाच आंतरराष्ट्रीय क्रांतीचा समर्थक असेल, असे भाकित केले. त्याने कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या सहाव्या अधिवेशनात (१९२८) पक्षाच्या कार्यकमात काही कल्पना मांडल्या. रशियन हिताला अग्र हक्क हे त्याचे प्रमुख सूत्र होते. त्याने कामगारांची हुकूमशाही दृढतर करण्यासाठी आर्थिक विकासावर भर दिला पण आपली एकाधिकारशाही दृढ करण्यासाठी जुन्या साम्यवादी नेत्यांना संपविले, काहींना बंधनागारात डांबले. सामुदायिक शेतीच्या प्रयोगासाठी लक्षावधी शेतकऱ्यांचा बळी दिला. जगातील साम्यवादी चळवळीचे एकमेव मार्गदर्शक केंद्र म्हणून त्याने रशियाचे महत्त्व वाढविले, लष्करी सामर्थ्याबरोबरच राष्ट्रवाद जागृत केला आणि फॅसिस्ट देशांशी करार केला. पू. यूरोपातील साम्यवादी पक्षांना रशियन लष्कराच्या जोरावर सत्तेवर बसविले. त्यामुळे दुसऱ्या महायुद्घानंतर हंगेरी, पोलंड, रुमानिया, पूर्व जर्मनी आदी देशांत कम्युनिस्ट राजवटी आल्या परंतु यूगोस्लाव्हिया, इराण, तुर्कस्तान, गीस यांतून रशियाला काढता पाय घ्यावा लागला. रशियाच्या अंकित राष्ट्रांनी रशियाचे परराष्ट्र व आर्थिक धोरण शिरसावंद्य मानले. मार्शल टिटो आणि माओवादी चीन यांनी रशियाऐपासून फारकत घेतली. रशिया हा खृया अर्थाने साम्यवादी नाही, तो केवळ सुधारणावादी आहे, असे चिनी नेत्यांना वाटे. त्यामुळे रशिया, चीन व यूगोस्लाव्हिया ही तीन स्वतंत्र साम्यवादी केंद्रे निर्माण झाली. स्टालिनने कम्युनिस्ट इंटरनॅशनल ऐवजी ‘कॉमिनफॉर्म’ संघटना स्थापन केली. रशियन बोल्शेव्हिक क्रांतीनंतर साम्यवाद सबंध जगभर प्रसृत झाला होता. ज्या देशात मार्क्सवादी क्रांती झाली, तिथे म्हणजे सोव्हिएट युनियन, पूर्व यूरोपीय राष्ट्रे (हंगेरी, पोलंड, रूमानिया वगैरे), चीन आणि क्यूबा येथे त्याला प्रतिष्ठा मिळाली होती. तिथे साम्यवादावर टीका करणे अगर त्याच्यातील उणिवा दाखवून देणे, हे राज्यविरोधी वा समाजविघातक कृत्य समजले जाई. मार्क्सवादाचा अभ्यास केल्याखेरीज तिथे कुणालाही राजकारणात किंवा समाजकारणात स्थान लाभत नसे. सर्व साम्यवादी देशांत ही स्थिती होती.

स्टालिननंतर ⇨न्यिक्यित खुश्चॉव्ह (१८९४–१९७१) यांनी स्टालिनच्या रोषास बळी पडणाऱ्यांचे पुनर्वसन केले. बंधनागारे रद्द केली. रशियन साहित्यिकांना साम्यवादी लेखन करण्यास प्रोत्साहित केले, पक्षांतर्गत लोकशाही आणली. त्याचे परराष्ट्र धोरण शांततामय सहजीवनाचे होते. त्यानंतर बेझन्येव्ह (कार. १९६४–८२) याने सामुदायिक जबाबऐदारीच्या धोरणाचा पुरस्कार केला मात्र रशियन वर्चस्व कायम ठेवण्याचेच त्याचे धोरण होते. म्यिखइल गार्बाचॉव्ह ( कार. १९८५–९१) यांनी खुलेपणा ( ग्लासनोस्त ) आणि पुनर्रचना ( पेरेस्त्रोइका ) या तत्त्वांद्वारे सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतील अंतर्विरोध दूर करू न लोकांची उपक्र मशीलता व विधायक कार्य यांना उत्तेजन दिले. कालबाह्य कल्पना व जुना दृष्टिकोन दूर करणे, ही देशाची ऐतिहासिक गरज आहे, यावर भर देणारे हे धोरण होते. त्याकरिता त्यांनी लोकशाही धोरण अवलंबिले (१९८९). त्यामुळे रशियात अंतर्गत स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. लोकांना मोकळेपणाने विचारांचे आदान-प्रदान करण्यास स्वातंत्र्य मिळाले. परिणामतः पोलादी पडद्याचे आवरण संपुष्टात आले आणि १९९१ च्या अखेरीस सोव्हिएट रशियाचे विभाजन होऊन छोटी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशियाच्या अंकित देशांनी साम्यवादाचा त्याग करुन लोकशाही राज्यपद्घती स्वीकारली. यूगोस्लाव्हियातील कम्युनिस्ट पक्ष बरखास्त करण्यात आला. साम्यवादी चळवळीचे हे विद्यमान स्वरुप पाहता मार्क्स-लेनिन यांच्या अपेक्षित साम्यवादी क्रांतीचे हे विसर्जनच म्हणावे लागेल. चीनमधील ⇨माओ-त्से-तुंग (१८९३–१९७६) हा कम्युनिस्ट चळवळीचा व आधुनिक लाल चीनचा शिल्पकार होय. प्रथम त्याने लेनिनप्रणीत तत्त्वा-नुसार क्वोमिंतांग पक्षाचे काम केले पण पुढे त्याचा भमनिरास होऊन ‘संघटित शेतमजूरच चीनमध्ये क्रांती घडवून आणतील’, ही कल्पना दृढतर झाली आणि त्यातून त्याने सरहद्दीवरील दृयाखोऱ्यांतील शेतमजुरांचे कम्युनिस्ट सैन्य बनविले. अखेर चीनवर त्याने वर्चस्व प्रस्थापिले. १९५०–७२ दरम्यानचा कम्युनिस्ट चीनचा इतिहास हा माओवादी साम्यवादी ध्येयधोरणांची फलनिष्पत्ती होय. मात्र एकविसाव्या शतकात चीनमध्येही साम्यवादी राज्यकर्त्यांना युवक संघटनांनी दिलेल्या आव्हानांमुळे तसेच मुक्त बाजारपेठेच्या आंतरराष्ट्रीय धोरणामुळे माओवाद जाऊन आज ना उद्या लोकशाही राज्यपद्घती स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही.’

पहा : एंगेल्स, फीड्रीख कम्युनिस्ट जाहीरनामा कम्युनिस्ट पक्ष कॉमिनफॉर्म मार्क्स, कार्ल मार्क्सवाद रशिया (इतिहास) लेनिन, न्यिकलाय स्टालिन, जोझेफ स्टोइक मत.

संदर्भ : 1. Bukharin, Nikolai Preobrazhensky, Evgeny, ABC of Communism, 1988.

    2. Daniels, Robert, Ed.,  ocumentory istory of Communism, 2 Vols., 1984.

   3. Narkiewicz, Olga, Marxism and the Reality of Power, 1919–80, London, 1981.

  4. Pryer, Peter, The New Communism, London, 1988.

   5. Whetten, Lawrence, Current Research in the Comparative Communism, New York, 1976.

   6. Yoder, Amos, Communist Systems and Challenges, New York, 1990.

  ७. चौसाळकर, अशोक, मार्क्सवाद, उत्तर मार्क्सवाद, कोल्हापूर, २०१०.  

  ८. जावडेकर, शं. द. शास्त्रीय समाजवाद, पुणे, १९५५.

  ९. तळवलकर, गोविंद, सोव्हिएट संघराज्याचे विघटन, ३ खंड, मुंबई, १९९२–९९.

गर्गे, स. मा.