सामाजिक मानसशास्त्र : ( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले. समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला.

विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१) ⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली. माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले.

सी. एच्. कुली ह्याने ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९०२) ह्या त्याच्या ग्रंथात व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील नात्याच्या अतूटपणाचा मुद्दा मांडला. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुटुंब, बालोद्यान, प्ले ग्रू प अशा ठिकाणी कसा होतो, हे त्याने सोशल ऑर्गनायझेशन (१९०९) मध्ये दाखवून दिले. ए स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण, जलद वाहतूक आणि संदेशवहन, औद्योगिकीकरण आणि विशेषीकरण, वर्गसंघर्ष इत्यादींचा मानवी व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, ह्याचे विवेचन केले. आनुभविक (एम्पिरिकल) पद्घतीचा प्रथम वापर १९२० च्या दशकात सुरू  झाला. या पद्घतींनी सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिगत वर्तन यांमधील संबंधांची साधनसामग्री पुरविली. या क्षेत्रात सर्वप्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संशोधनास सुरू वात झाली. त्यावेळेपासून सामाजिक मानसशास्त्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रणाली वा शास्त्र म्हणून विकासित झाले. साहजिकच अमेरिकेतील संशोधकांचा या क्षेत्रावर अधिकतर प्रभाव जाणवतो.

माणसाच्या भोवतालचा परिसर जसा भौतिक, तसा सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. व्यक्तीचा समाजातील अन्य व्यक्तींशी वा व्यक्तिसमूहांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी व्यक्तीच्या आंतरक्रिया (इंटरॲक्शन्स) होत असतात. त्या व्यक्तींची काही एक संस्कृतीही असतेच. त्यांची मूल्यव्यवस्था, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, रीतिरिवाज, विधिनिषेध, जीवनशैली ह्या संस्कृतीचा भाग असतात. ह्या साऱ्यांचा व्यक्तीवर काही प्रभावही पडत असतो. अशा सामाजिक–सांस्कृतिक आंतरक्रियांमधूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.

सामाजिक आंतरक्रियांचे वर्ग तीन आधारांवर केले जातात : (१) त्या आंतरक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या. (२) संबंधित व्यक्तींची परस्परांशी असलेली जवळीक. (३) सामाजिक आंतरक्रियांमागे असलेल्या ⇨सामाजिक प्रक्रिया.

पहिल्या आधारावर केलेल्या वर्गात व्यक्ती आणि व्यक्ती समूह आणि व्यक्ती [⟶ समूह] किंवा व्यक्ती आणि समूह व समूह आणि समूह असे प्रकार मोडतात. व्यक्ती आणि व्यक्ती ह्या प्रकाराचे आई आणि मूल ह्यांच्यातील आंतरक्रिया हे उत्तम उदाहरण होय. आपण एका कुटुंबाचा घटक आहोत आणि कुटुंबातील प्रौढ व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवीत आहेत, ह्याची जाणीव मुलाला यथावकाश होते. इथे काही व्यक्तींचा समूह आणि मूल ह्यांच्यात सामाजिक आंतरक्रिया होते. ह्या कौटुंबिक सभासदांच्या वर्तनाचे आकृतिबंध, त्यांच्या वृत्तिप्रवृत्ती, त्या कुटुंबाच्या परंपरा मूल स्वीकारते. कुटुंबातील आपल्या विशिष्ट स्थानाचीही त्याला जाणीव होते. नंतर कुटुंबाबाहेरील समूहांशी संबंध येतो. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर निरनिराळे समूह भेटतात. समूहवर्तनाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा त्याला अनुभव येतो. वेगवेगळ्या समूहांतील आपल्या वेगवेगळ्या भूमिका व्यक्ती पार पाडू लागते. काही समूहांमध्ये तिचे वर्चस्व असते, तर काही समूहांमध्ये तिला गौण भूमिकाही स्वीकारावी लागते.

समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या ‘समूह आणि समूह’ ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.

समूहांचेही वेगवेगळे प्रकार असतात. उदा., कुटुंब हा समूह अधिक घट्ट बांधणीचा, कुटुंबाच्या सभासदांमध्ये जिव्हाळा असलेला, एकतेचे मूल्य मानणारा, परस्परांविषयीची कर्तव्ये ओळखून प्रसंगी एकमेकांसाठी त्याग करणारा असा मानला जातो पण एखाद्या क्लबमधले लोक, राजकीय पक्षाचे सदस्य, गृहनिर्माण संस्था, भाडेकरूं ची संघटना यांतले संघटन वेगळ्या प्रकारचे असते. काही विशिष्ट हेतूंनी हे समूह तयार होतात आणि आवश्यकतेनुसार त्यांची पुनर्रचनाही होत असते पण प्रतीक्षालये, बस, आगगाडी, चित्रपटगृह अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणारे लोक म्हणजे अगदीच तात्पुरत्या स्वरूपाचे समूह असतात.


समायोजन, विरोध आणि सहकार्य ह्यांसारख्या सामाजिक प्रक्रियांवर काही सामाजिक आंतरक्रिया आधारलेल्या असतात. सामाजिक आंतरक्रियांमध्ये जे संबंध आणि प्रक्रिया गुंतलेल्या असतात, त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र असेही सामाजिक मानसशास्त्राबद्दल म्हणता येईल. एखाद्या समूहामधील आंतर्व्यक्तिक (इंटरपर्सनल ) संबंध, विविध समूहांमधले संबंध, सामाजिक संस्था वा संघटना, संवेदन, स्मृती, ज्ञान–संपादन, समायोजन, संदेशवहन, अनुकरण, सूचन ह्या प्रक्रियांबद्दल तसेच स्पर्धा, सहकार्य अशा माध्यमांतून, ज्या व्यक्ती व समूह परस्परांच्या सहवासात येतात आणि विविध प्रकारचे नातेसंबंध निर्माण करतात, त्यांच्याबद्दल सामाजिक मानसशास्त्राला मोठे स्वारस्य आहे. हे नातेसंबंध केवळ व्यक्तीच्या वर्तनावर अवलंबून नसतात. त्याचप्रमाणे एका व्यक्तीने दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया एकत्रितपणे पाहून त्यांचे आकलन होणार नसते. येथे आंतरक्रिया सर्वांत महत्त्वाची असते कारण आंतरक्रियेतून नव्या, अनन्यसाधारण अशा स्थितींची निर्मिती होते आणि त्यांतून व्यक्तींना आणि समूहांना अशा स्थितींसाठी नवे, अनन्यसाधारण प्रतिसाद देण्यास चालना मिळते. अशा प्रकारे सामाजिक आंतरक्रियेतून व्यक्ती आणि सामाजिक परिसर ह्या दोहोंतही बदल घडून येतात. तसेच अशा सामाजिक आंतरक्रियेमधून निर्माण होणाऱ्या स्थितींमधून व्यक्तीच्या वा समूहाच्या वर्तनाला त्याचे व्यवच्छेदक स्वरूपही प्राप्त होते.

जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंतच्या काळात व्यक्तीची होत जाणारी सामाजिक स्थित्यंतरे हा सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय आहे. सुरू वातीला आत्मकेंद्रित आणि सुखप्राप्तीकडेच कल असणारे मूल वाढत्या वयाबरोबर कुटुंबातील आणि त्याबाहेर पसरलेल्या समाजातील वेगवेगळ्या नातेसंबंधांचा अनुभव आल्यानंतर आत्मनियंत्रण करून इतरांचाही विचार कसा करू लागते आणि अखेरीस समाजातील एक जबाबदार घटक कसा बनते, ह्याचा विचार सामाजिक मानसशास्त्र करते. व्यक्तीच्या सामाजीकरणाची दीर्घ प्रक्रिया ही अंतिमतः सामाजिक आंतरक्रियेचीच प्रक्रिया असते.

सर्व सामाजिक घटना सामाजिक संघटन, [⟶ सामाजिक विघटन व संघटर्नें ], ⇨सामाजिक परिवर्तन, तसेच अनेकदा दिसणारे विविध संस्कृतिप्रवाहांचे संमिश्रण हे सर्व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या भोवती फिरत असते. त्यांचे मानवी व्यक्तिमत्त्वाबरोबरचे आंतरसंबंध (इंटररिलेशन्स) हा सामाजिक मानसशास्त्राच्या विचाराचा एक केंद्रवर्ती विषय होय.

सामाजिक प्राणी वा जीव म्हणून माणसाच्या मूलभूत सामाजिक गरजा काय आहेत, सामाजिक आंतरक्रियेतून तो आपल्या जैव तसेच सामाजिक गरजा कशा भागवतो, आपल्या वृत्ती आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ह्यांचा विकास तो कसा घडवतो, सर्व संस्कृतींना समान असणाऱ्या वृत्ती आणि वैशिष्ट्ये कोणती, हेही सामाजिक मानसशास्त्राच्या आस्थेचे विषय आहेत. अशा प्रश्नांच्या अभ्यासासाठी सामान्य मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि सांस्कृतिक मानसशास्त्र ह्यांसारख्या संबद्घ अभ्यासऐक्षेत्रांचा महत्त्वपूर्ण उपयोग होत असला, तरी सामाजिक मानसशास्त्राला त्याचा असा एक स्वतंत्र अभिगम (ॲप्रोच) आहे आणि मानवी स्वभावाचे ज्ञान आणि आकलन ह्यांच्या संदर्भांत ते देत असलेले योगदान फार मोठे आहे, अशी सामाजिक मानसशास्त्रज्ञांची धारणा आहे. माणसांचे सामाजिक वर्तन नीट समजून घेऊन त्याला योग्य दिशा देणे, त्याचे नियमन–नियंत्रण करणे सामाजिक मानसशास्त्राला निश्चितच शक्य आहे, असेही त्यांना वाटते. व्यक्तींच्या सामाजिक आंतरक्रिया, विविध प्रकारच्या सामाजिक–सांस्कृतिक चौकटीत माणसांचे वर्तन कसे होत असते, सामाजिक दडपणे व्यक्तींवर कोणते परिणाम घडवून आणतात, खोलवर रुजलेले पूर्वगह सामाजिक सद्भावनेस कशी हानी पोहोचवतात, ह्यांच्या आकलनांतून सहकार्य, सहिष्णुता, स्वीकारशीलता ह्यांचा पाया सामाजिक संबंधांना मिळवून देऊन विविध वांशिक, धार्मिक, राष्ट्रीय समूहांमधले संघर्ष नाहीसे करता येतील सामाजिक संबंध निकोप करता येतील सामाजिक पुनर्रचना घडवून आणता येईल. [⟶ सामाजिक संबंध].

सामाजिक मानसशास्त्रामध्ये माहिती वा आधारसामग्री मिळविण्यासाठी दोन मुख्य स्रोत असतात. एक, प्रयोग आणि दुसरा, क्षेत्रीय काम. संशोधनास साहाय्य म्हणून प्रयोगशाळेच्या चौकटीत आणि वातावरणात काही व्यक्तींवर प्रयोग केले जातात पण ह्या पद्घतीला मर्यादा आहेत. एक तर समाजात प्रत्यक्ष चालू असलेल्या सामाजिक आंतरक्रियांचे व्यापक जग प्रयोगशाळेत आणता येत नाही आणि ज्यांच्यावर प्रयोग चालू असतात, त्यांनाही आपले निरीक्षण चालू असल्याची जाणीव राहते. क्षेत्रीय कामासाठी संशोधक विशिष्ट सामाजिक आंतरक्रिया ज्या ठिकाणी घडतात, तिथे जाऊन निरीक्षणे करतात पण येथेही कधी कधी अडचणी येतात. संशोधकांना सर्वच क्षेत्रांमध्ये सहज प्रवेश मिळत नाही.

सामाजिक आंतरक्रियेमुळे माणसांमध्ये समान विचारशैली, समान भावना आणि समान वर्तनशैली विकासित होण्यास साहाय्य होते. त्यातून समूहमनाची प्रणाली मांडली जाऊ लागली. समाजाला त्याचे असे एक मन असते, असा हा विचार होता. विल्यम मॅक्डूगलने द ग्रूप माइंड : अ स्केच ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ कलेक्टिव्ह सायकॉलॉजी (१९२०) या ग्रंथात व्यक्तींच्या व्यक्तिगत मानसिक जीवनातील काही समान वृत्ती आणि विश्वास ह्यांतून समूहमन घडते, असे मत मांडले. ⇨फ्लॉइड एच्. ऑल्पोर्ट ह्याने सोशल सायकॉलॉजी (१९२४) या ग्रंथात सामाजिक वर्तन हे माणसाच्या जैव गरजा भागविण्याचे एक साधन आहे आणि व्यक्तीच्या जैव आणि मानलक प्रक्रियांच्या आधारे हे स्पष्ट करता येते, हे दाखवून दिले.

आधुनिक सामाजिक मानसशास्त्रात तीन प्रवृत्ती दिसतात : पहिली, सांस्कृतिक मानवशास्त्राचा ह्या अभ्यासक्षेत्रावर पडणारा वाढता प्रभाव. ह्या प्रभावाचा परिणाम म्हणजे व्यक्तीचे अधिक परिपूर्ण असे आकलन व्हावयाचे असेल, तर तिचा अभ्यास निरनिराळ्या संस्कृती आणि सामाजिक संघटना ह्यांच्या संदर्भात केला जाणे आवश्यक आहे ह्याची जाणीव. वेगवेगळ्या सांस्कृतिक चौकटीतील व्यक्तिमत्त्वांच्या तौलनिक अभ्यासातून मानवी स्वभावाचे अधिक समृद्घ असे चित्र पाहता येईल, असा विचार प्रभावी ठरत आहे. दुसरी प्रवृत्ती प्रायोगिकतेची. सामाजिक मानसशास्त्र प्रायोगिक पद्घतींचा अवलंब करू लागल्यामुळे विज्ञानाच्या इतर शाखांऐबरोबर त्याला आता स्थान मिळू लागले आहे. प्रायोगिक पद्घतींमुळे सामाजिक वर्तनाचे विश्लेषण अधिक अचूक होऊ लागले आहे. तिसरी प्रवृत्ती अनुप्रयुक्ततेची. सामाजिक मानसशास्त्र हे अनुप्रयुक्त शास्त्र म्हणूनही झपाट्याने मान्यता पावत आहे. उदा., मानवी संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सामाजिक मानसशास्त्र उपयोगात आणले जाऊ शकते. ⇨समूहगतिकीच्या अभ्यासाचा अवलंब करून ते उद्योगाच्या क्षेत्रात मनोधैर्याचे वातावरण निर्माण करून उत्पादनात सुधारणा घडवून आणू शकते. तसेच भांडवलदार आणि कामगार संघटना ह्यांच्यातील आंतरसंबंध सुधारु शकते. ह्याशिवाय जातीय तणाव, वेगवेगळ्या समूहांमधील पूर्वगह कमी करू शकते. आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि शांतता ह्यांसाठीही सामाजिक मानसशास्त्र महत्त्वाचे योगदान देऊ शकेल असे मत व्यक्त केले जाते.

पहा : मानसशास्त्र समूह.

संदर्भ : 1. Albrecht, Stan L. and Others, Social Psychology, 1987.

         2. Bhatia, Hansraj, Elements of Social Psychology, Bombay, 1965.

        3. Broun, Roger W. Social Psychology, 1965.

        4. Gilmour, Robin, Ed. The Development of Social Psychology, 1980.

        5. Hollander, Edwin P. Principles and Methods of Social Psychology, 1971.

       6. Lindzey, G. Aronson, E. Eds. Handbook of Social Psychology, 2 Vols., 1985.

       7. Sahakian, William S. History and Systems of Social Psychology, 1982.

       8. Smith, M. Brewster, Social Psychology and Human Values, 1986.

कुलकर्णी, अ. र.