सामाजिक आदान-प्रदान : (सोशल कम्युनिकेशन). सामाजिक आदान-प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाज अनेक समूहांचा आणि अनेक प्रकारच्या व्यक्तींचा असतो. या नानाविध व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण चालू असते. व्यक्ती वेगळ्या वयाच्या, विविध नातेसंबंध असलेल्या व विविध धर्म-पंथांच्या आणि विविध रिवाज पाळणाऱ्या असतात. व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करतात म्हणूनच समाजव्यवस्था चालू राहते. असे व्यक्तिसमूह एका भौगोलिक प्रदेशात राहतात म्हणूनच त्या जागेबद्दलची आत्मीयता ‘आपला गाव, राज्य, देश आणि आपले एकत्र राहणारे सर्व लोक’ अशी भावना समूहांमध्ये असते आणि अशा समुदायांमध्ये सतत आदान-प्रदान चालू असते. स्वतःला विसरुन समूहातील व्यक्तींचे आदानऐ-प्रदान सामाजिक स्वरुपाचे असते. प्रसिद्घ जर्मन समाजशास्त्रज्ञ ⇨माक्स वेबर (१८६४–१९२०) यांनी चार प्रकारचे आदान-प्रदान असल्याचे सांगितले आहे : पारंपरिक (मंदिरबांधणीत सहभाग, पूजा-अर्चा, उपवास इ. रुढी पाळणे), मानसिक (प्रेम करणे, वाईट वाटणे, भिणे, सहकार), मूल्यप्रमाणित वर्तन (कायदे पाळणे, सामूहिक लढ्या त भाग घेणे इ.) व वैचारिक आणि व्यावहारिक वर्तन.
प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट पार्सन्झ (१९०२– ७९) यांच्या मते समुदायातील व्यक्ती क्रि यांची निवड समुदायातील नियमांनुसार करते. समाजाच्या सुरुवातीपासून व्यक्ती इतरांशी प्रेमाने, सलोख्याने, सहकार्याने वागते. आज व्यक्ती एकत्र उत्पादनाचे काम करतात, सरकारने सुरु केलेल्या कामावर सर्वांना बरोबर घेऊन कामाचा भार उचलतात. असे असूनही व्यक्ती नेहमीच असे वागत नाहीत. कधीकधी काहींशा रागाने, द्वेषाने आणि सूडबुद्घीने वागतात. व्यक्तींच्या मनातील सूडभावना सामूहिकपणेही प्रकट होतात, त्या कधी तडजोड करतात, तर कधी त्यांच्यामध्ये वैर चालूच राहते. तसेच विविध समुदाय आपापल्या धर्माचे ग्रंथ पवित्र मानतात आणि सणसमारंभ साजरे करतात. प्रत्येक धर्माचे बोधचिन्ह वेगवेगळे असते. हे वर्तणुकीतील वेगळेपण सामाजिक स्वरुपाच्या आदान-प्रदानाची गरज पूर्ण करते. परस्परांत सौहार्दाचे वातावरण आवश्यक असते.
जे समुदाय कोणतेच धर्म किंवा कर्मकांड पाळीत नाहीत, ते सर्वांनी पाळण्याजोगे कायदे आणि मूल्यांनुसार वर्तन करणे पसंत करतात. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये जोपासतात. त्यांच्या क्रिया अधिकतर सांघिक असतात. मोर्चे, हरताळ, बंद, सभा यांतून त्या व्यक्त होतात. क्रांती, चळवळ, सत्यागह, अन्यायमूलक विरोध ही साधने त्यांना वापरावी लागतात. आतापर्यंत जगात ठिकठिकाणी समुदायांनी अन्य समुदायांवर अन्याय केले. राजे, सावकार, उच्च जाती, जमीनदार यांनी गरीब जनतेवर, पुरुषांनी स्त्रियांवर, धर्ममार्तंडांनी अडाणी भक्तगणांवर अन्याय केला मात्र या दुष्ट प्रथांचे विचारवंतांनी खंडन केले. उद्योगाच्या क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली. परिवहनाची आधुनिक साधने निर्माण झाल्यामुळे परदेशात व देशांतर्गत उत्पादनाच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडून आली. पूर्वापार चालत आलेली वस्तुविनिमयाची जागा बाजारव्यवस्थेने घेतली. बँका निघाल्या, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, भांडवलदारांची श्रीमंती वाढतच गेली आणि समाजात श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी वाढत गेली. कारखानदारांकडून कामगारांची पिळवणूक होऊ लागली. परिणामतः कामगार संघटनांचे संघटन होऊन हरताळ, बंद इ. प्रकारांनी कारखानदारांवर दबाव आणला गेला. तत्पूर्वी यूरोप खंडात ⇨ कार्ल मार्क्स यांनी ‘जगातील कामगारांनो, संघटित व्हा आणि अन्याय करणाऱ्या भांडवलशाहीला विरोध करा. तुम्हाला केवळ तुमच्या पायातील बेड्या गमवाव्या लागतील पण त्या बदल्यात तुम्हाला स्वातंत्र्य व सत्ता मिळेल’ असा उपदेश केला आणि त्याची परिणती रशियन राज्यक्रांतीत झाली (१९१७). माणूस आदान-प्रदानातून मोठे युद्घही लढू शकतो हे सत्य जगापुढे आले.
समाज आकाराने लहान होता, त्यावेळी कुटुंबामध्ये, गावांमध्ये, समुदायांमध्ये व्यक्ती परस्परांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असत. त्यावेळी समस्यांचे प्रमाण कमी होते परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून लहानमोठ्या समुदायांमध्ये भांडणतंटे, सूड घेणे वाढले. ‘मी’ पणाची भावना वाढून स्वार्थ, स्पर्धा आणि संघर्ष यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. संघर्ष केवळ देशांतर्गत राहिला नाही, तर देशा-देशांमध्ये सुरु झाला.
देशांतर्गत सुरक्षा रहावी, त्या दृष्टीने शासन सतर्क असते. सुरक्षेइतकेच महत्त्व शिक्षण, आरोग्य आणि प्रतिबंधात्मक वैयक्तिक आरोग्य यांनाही आहे. यावर शासन व समाजसेवी संस्था काम करीत असतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञान व विज्ञानातील संशोधनामुळे औषधो पचारात प्रगती झाल्याने बालमृत्यू आणि स्त्रीमृत्यू यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच दळणवळणातील प्रगतीमुळे प्राथमिक आरोग्यसेवा गावोगावी पोहोचत असून, आहार आणि कुटुंबकल्याण यांवरही भर दिला जात आहे. नेत्रदान आणि देहदान ह्या पुण्यकर्मांचे महत्त्व समाजावर बिंबवले जात आहे. ज्ञान, मानसिक प्रवृत्तींचे उन्नयन व त्यानुसार क्रि या करणे ही त्रिसूत्री जनता स्वीकारु लागली, तर सामाजिक क्रिया कल्याणकारी होतील.
नैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सामाजिक दातृत्वाचे निखळ दर्शन घडते. जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती इत्यादींचा विचार न करता माणसे आपद्गस्तांना मदत करतात. समुदायातील सेवाभावी संस्था दुःखात सहभागी होतात. समुदायात ‘आम्ही, आपले आणि आमच्या सर्वांचे अशी भावना असते’. इतरांच्या समस्या माझ्याच समस्या आहेत असे मानून परस्परांना त्या साहाय्य करतात. आजचे ‘बचतगट’ – विशेषतः महिलांचे – स्त्रियांची संकुचित दृष्टी व्यापक करण्यास साहाय्यभूत होतात. त्यांच्या एकत्र भांडवलनिर्मितीतून उत्पादक क्रि यांना आणि बाजारहाट यांना तर वाव मिळतोच पण त्याशिवाय कोणाही महिलेवर संकट आले, तर धावून जाण्याची क्षमताही दाखविली जाते. समाजात विविध समुदाय आपापली संस्कृती जपतात. समाज नव-अभिजात-सिद्घांतानुसार सुखलोलुप होत आहे. तो सुखकारक कृती करण्याकडे प्रवृत्त होतो आणि दुःखकारक गोष्टी करण्याचे टाळतो. यालाच विलासवादी मानसशास्त्र असे म्हटले जाते. या सिद्घांतास सुख-दुःख असेही म्हणतात. आदान-प्रदानाचे हे विविध नमुने समाजात आढळतात.
संदर्भ : 1. Parsons, Talcoat, Theoris of Society, New York, 1961.
२. बोबडे, प्रकाश, कोलाज (आर्थिक विकास व सामाजिक चळवळी), पुणे, १९९२.
काळदाते, सुधा