साबावाला, जहांगीर अर्देशिर : (२३ ऑगस्ट १९२२–२ सप्टेंबर २०११). आधुनिक भारतीय चित्रकार. मुंबई येथे एका गर्भश्रीमंत पारशी घराण्यात, अर्देशिर पेस्तनजी व मेहेरबाई या दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. या घराण्याच्या देणगीतून ‘जहांगीर आर्ट गॅलरी ‘स्थापन झाली. ऐश्वर्यसंपन्न अशा वातावरणात वाढलेल्या साबावाला यांनी उपजत कलाप्रेमापोटी चित्रकार होण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९४४ साली त्यांनी कला पदविका घेतली आणि नंतर ते यूरोपला गेले. ‘हीदर्ली स्कूल ऑफ आर्ट’, लंडन (१९४५–४७) तसेच पॅरिस येथील ‘अकादेमी आंद्रे लोत ’ (१९४८–५१), ‘अकादेमी जूल्यन ’ (१९५३-५४) व ‘अकादेमी दी ला ग्रांदे शोम्येर ’ (१९५७) या कलाशिक्षण संस्थांतून त्यांनी कलेचे उच्च शिक्षण घेतले. दरम्यान ते भारतात परतले व मुंबई येथे स्थायिक झाले. भारतात मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे तसेच परदेशांत लंडन व एडिंबरो येथे त्यांनी एकल चित्रप्रदर्शने ( वन मॅन शो ) भरवली, तसेच अनेक प्रमुख राष्ट्री य व आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांतून आपली चित्रे मांडली. उदा., ‘एक्स्पोझिशन द्यू लेर गांप्री दी पेंत्यूर’, मोनॅको ‘सालाँ नॅशनल इंडिपेन्डंट’ (१९५०) व ‘अकादेमी दी ला गांदे शोम्येर ’, पॅरिस ‘व्हेनिस बायेनिअल’ हे द्विवार्षिक कलाप्रदर्शन (१९५४). या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांत चित्रे मांडून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. देश-विदेशांतील अनेक प्रमुख कलासंग्रहांमध्ये त्यांची चित्रे कायमस्वरुपी जतन करण्यात आली आहेत. उदा., ‘ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ’, नवी दिल्ली ‘ गव्हर्नमेंट म्यूझीयम ऑफ आर्ट’, चंडीगढ ‘संसद सभागृह’, नवी दिल्ली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, मुंबई इत्यादी.
साबावाला यांची चित्रशैली अकादेमिक, अभिजात, दृक्प्रत्ययवादी व घनवादी अशा विभिन्न शैलींच्या मिश्रणातून स्वतःचे खास वैशिष्ट्य निर्माण करुन स्वतंत्रपणे सिद्घ झाली आहे. त्यांच्या चित्रांचा पोत, आकार व रंगसंगती यांत ही संमिश्र शैलीवैशिष्ट्ये आढळतात. ⇨आंरी मातीस, ⇨पॉल गोगँ, ⇨फेनिंजर या चित्रकारांचा प्रभाव साबावालांवर उमेदवारीच्या काळात होता. सुरुवातीला त्यांच्या शैलीवर मुख्यत्वे घनवादी चित्रशैलीचा प्रभाव ठळकपणे जाणवणारा होता. नग्नदेहाकृतिचित्रण व निसर्गचित्रण या चित्रप्रकारांचे आकर्षण त्यांना सुरुवातीपासूनच होते व या प्रकारांत अद्वैत साधून त्यांनी काही चित्रे रंगविली. त्यांनी मुख्यत्वे तैलरंग माध्यमात चित्रे रंगविली. त्यांच्या तैलरंगांच्या हाताळणीत रंगलेपणातील मृदुता व तरलता विशेषेकरुन जाणवते. निसर्गचित्रे, सागरी दृश्ये, मानवाकृतिचित्रण, नागरी जीवनदृश्ये हे त्यांच्या चित्रांत वारंवार आढळणारे विषय होत. निसर्ग व मानवाकृती हे त्यांच्या चित्रांचे केवळ विषय नव्हते, तर त्यांच्या मनातील अमूर्त तत्त्वचिंतनाला द्यृश्य रुप देणारे आधारस्रोत होत. खास भारतीय परंपरेला साजेशी आध्यात्मिक गूढता व त्यातील चैतन्य सूचित करणारी चित्रे त्यांनी घनवादी शैलीत रंगविली. त्यामुळे त्यांच्या चित्रांतून पाश्चात्त्य घनवादी शैलीचे खास भारतीय रंगरुप साकारलेले दिसून येते. मूर्त जडवादापासून अमूर्त गूढवादापर्यंत त्यांच्या चित्रनिर्मितीची वाटचाल होत गेली. त्यांच्या मनुष्याकृतीच्या रेखनात एकाकीपणाची व एकटेपणाची जाणीव दृग्गोचर होते. पडदानशीन स्त्रिया, ध्यानस्थ बौद्ध भिक्षू, काहीशा गूढ रहस्यमय भासणाऱ्या मनुष्याकृती असे अनेक विषय त्यांनी रंगविले. वस्तुनिष्ठ वास्तवचित्रणापासून ते अमूर्त आकारिक चित्रणापर्यंतची अनेक स्थित्यंतरे त्यांच्या चित्रनिर्मितीच्या विकासकमात दिसून येतात.
त्यांच्या चित्रातील रंगसंगती सौम्य व शांत भावसूचक आहे. ‘पिलगिम’ (यात्रिक), ‘एक्झाइल’ (देशपार व्यक्ती) व ‘सॉर्सरर’ (चेटक्या, जादूगार) ह्या विषयसूत्रांवर आधारित चित्रमालिका त्यांनी रंगविल्या. १९४६–९६ या पन्नास वर्षांच्या काळात त्यांनी ११४ हून अधिक उत्तमोत्तम चित्रकृती निर्माण केल्या. त्यांच्या दर्जेदार, विशेष लक्षणीय चित्रांमध्ये सेल्स ऑन अ गोल्डन आफ्टरनून (१९६०), स्टील लाइफ विथ बॉटल्स (१९६१), सीगल्स अँड सेल्स (१९६१), प्रेझेन्सेस अन्मूव्हिंग स्टँड (१९६९) इत्यादींचा निर्देश करता येईल. साबावाला यांनी चित्रनिर्मितीबरोबरच चित्रकलाक्षेत्राच्या विकासार्थ सेवाभावी वृत्तीने कार्य केले. ‘टाटा’ सारख्या संस्थांनी अन्य भारतीय चित्रकारांची चित्रे विकत घ्यावीत, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. साबावाला यांच्या पंचाहत्तरीपूर्तीनिमित्त रणजित होस्कोट यांनी पिलग्रि म, एक्झाइल, सॉर्सरर : द पेंटर्ली इव्हाल्यूशन ऑफ जहांगीर साबावाला (१९९८) हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांचा जीवनपट, एस्. व्ही. वासुदेव यांनी लिहिलेला ‘साबावाला’ (१९६६) हा व्याप्तिलेख द रीझनिंग व्हीजन (१९८०), जहांगीर साबावाला (१९८४) ही पुस्तके यांचा अंतर्भाव आहे. कलर्स ऑफ ॲब्सेन्स हा त्यांच्या जीवनावर चित्रपट काढण्यात आला. त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले (१९९४). साबावाला यांना १९७७ मध्ये ‘पद्मश्री’ किताब मिळाला, तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते ‘ललित कलारत्न’ (२००७) हे पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले. (चित्रपत्र).
इनामदार, श्री. दे.