साबण : मलिन पृष्ठभाग स्वच्छ करणाऱ्या पदार्थाला प्रक्षालक म्हणतात. साबण हा विशिष्ट प्रकारचा प्रक्षालक आहे. साबण वसाम्लांची सोडियम व पोटॅशियम लवणे असून दीर्घ कार्बन शृंखलायुक्त मोनोकार्‌बॉक्सिलिक अल्कली (क्षारीय) धातुलवण (उदा., सोडियम मिरिस्टेट) हे साबणाचे रासायनिक वर्णन आहे. या लवणात सोडियम ( Na+ ) किंवा पोटॅशियम (K+ ) हा धन आयन असून कार्‌बॉक्सिलेट (–COO ) हा अणुगट ऋण आयन असतो. शिवाय साबणात सुवासिक द्रव्ये, रंगद्रव्ये, चकाकी आणणारी द्रव्ये इ. घटकही मिसळलेले असतात. साबणातील कार्बॉक्सिलेट भाग जलस्नेही, तर हायड्रोकार्बनी भाग जलविरोधी असतो. साबणात प्रक्षालनाचा गुणधर्म येण्यासाठी जलविरोधी हायड्रोकार्बनी भागात १२ ते १८ कार्बन अणू असावे लागतात. बारापेक्षा कमी कार्बन अणू असलेले हायड्रोकार्बन शृंखलायुक्त सोडियम साबण पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्याच्या दृष्टीने उपयुक्त नसतात तर या शृंखलेत अठराहून अधिक कार्बन अणू असतात, तेव्हा साबण पाण्यात विरघळत नाही, म्हणजे त्याचा उपयोग होत नाही. याचा अर्थ या शृंखलेत १२ ते १८ कार्बन अणू असलेले साबण प्रक्षालक म्हणून उपयुक्त असतात.

साबण पाण्यात विरघळविल्यास त्यामध्ये मानवी त्वचा, कापड व इतर घन पृष्ठभागांवरील मळ काढून टाकण्याची क्षमता येते. घन पृष्ठभाग स्वच्छ वा साफ करण्याची ही प्रक्रिया साधी व सोपी वाटते. तथापि प्रत्यक्षात ही प्रक्रिया गुं तागुंतीची असून तिचे पुढील भौतिकीय व रासायनिक टप्पे आहेत. मलिन पृष्ठभाग ओला होणे, त्यावरील मळ वा धूलिकण काढून टाकणे आणि पाण्याने खंगाळून काढून टाकले जाईपर्यंत मळ पाण्यात निलंबित ( लोंबकळत्या ) अवस्थेत ठेवणे या कियांनी मलिन पृष्ठभाग स्वच्छ होतो. ⇨पृष्ठताणा मुळे पाण्याचे रेणू एकत्र धरून ठेवलेले असतात व पाण्याचे थेंब तयार होतात. साबणामुळे पाण्याचा पृष्ठताण कमी होऊन त्याची पसरण्याची व पृष्ठभाग ओला करण्याची क्षमता वाढते. कमी पृष्ठताण असलेले पाणी कापडाच्या तंतुमय रचनेसारख्या मलिन पृष्ठभागात पूर्णपणे शिरते. साबणामुळे बुडबुडे निर्माण होऊन पाणी फेसाळ बनते. साबणामुळे मळ काढून टाकण्यास पुढीलप्रमाणे मदत होते. साबण या ⇨पृष्ठक्रियाकारकाचा एक भाग जलस्नेही व एक भाग जलविरोधी असतो. जलविरोधी भाग पाण्याशिवाय इतर पृष्ठभागाला चिकटतो. असे अनेक भाग धुलिकणाला घेरतात व त्यावर चिकटून राहतात. त्याचवेळी जलस्नेही भाग द्रव्यापासून दूर ओढले जातात व मळ धुण्याच्या पाण्याकडे खेचला जातो. कपडा घासल्याने मळ सुटा होण्यास मदत होते. तसेच यामुळे मळाचे कण दूर ओढले जाऊन पाण्यात येतात. पाण्यातील मळाच्या कणांभोवतीच्या साबणाच्या रेणूंमुळे हे कण अलग ठेवले जातात आणि पाण्याद्वारे निघून जाईपर्यंत मळाचे कण पाण्यात निलंबित राहतात. अशा रीतीने धुतलेल्या पृष्ठभागावर मळ परत बसण्याला साबणामुळे प्रतिबंध होऊन पृष्ठभाग स्वच्छ होतो.

तेलाच्या व ग्री झाच्या पातळ पटलाने मळ पृष्ठभागाला बद्घ झालेला असतो. साबणाच्या विद्रावाने हे पटल विस्थापित होते व नंतर पाण्यात खळबळल्याने ते निघून जाते. म्हणजे साबणाच्या विद्रावाच्या प्रभावाखाली या पटलाचे तुकडे होऊन बारीक थेंब बनतात व मळ निलंबित होतो. अंडे, दूध, रक्त इ. प्रथिनयुक्त पदार्थांचे डाग फक्त साबणाने निघणे अवघड असते, कारण ते पाण्यात विरघळत नाहीत. ते तंतूंना भक्कमपणे चिकटलेले असल्याने साबण आत घुसण्यास प्रतिबंध होतो. म्हणून प्रथिनाचे तुकडे करणारी विशिष्ट ⇨एंझाइमे साबणाबरोबर वापरतात. त्यांच्यामुळे प्रथिनमय द्रव्य पाण्यात विरघळण्यायोग्य होते किंवा पाणी आत शिरू  शकेल असे होऊ शकते. अशा प्रकारे वरीलप्रमाणे प्रथिनमय पदार्थांचे डाग तेलकट मळाबरोबर विसरित होऊन निघून जातात.  

इतिहास : साबण किमान २३०० वर्षांपासून ज्ञात आहे. मात्र तो प्रथम केव्हा व कोठे तयार करण्यात आला, हे निश्चित माहीत नाही. बॅबिलोनियन लोकांनी इ. स. पू. सु. २८०० दरम्यान प्रथम साबण वापरल्याचे म्हटले जाते. ईजिप्शियन लोक नैसर्गिक रीत्या आढळणारे सोडा लवणांचे साठे, प्राणिज व वनस्पतिज तेले आणि मसाले वापरुन सुगंधी साबण बनवीत असावेत. इ. स. पू. सु. ६०० या काळात फिनिशियन लोक ऱ्होन नदीच्या मुखाशी स्थायिक झाले. त्यांनी साबणाचा शोध लावल्याचे मानले जाते. बकऱ्याची चरबी व लाकडाची राख यांच्यापासून साबण बनविल्याचा उल्लेख थोरले प्लिनी यांनी आपल्या हिस्टॉरिया नॅचरॅलिस या गंथात केला आहे ( इ. स. ७७). बहुतेक इतिहासकारांच्या मते रोमजवळच्या टेकड्यांच्या भागातील सॅपो नावाची मृत्तिका कच्च माल म्हणून साबण बनविण्यासाठी वापरीत. गॉल ( फ्रान्समध्ये राहणाऱ्या ) लोकांनी मलम व वस्तुविनिमयाची वस्तू म्हणून इ. स. १०० मध्ये साबण वापरला होता. पाँपेई येथील उत्खननामध्ये सु. २०२५ वर्षांपूर्वीचा साबण कारखाना आढळला आहे. रोमन साम्राज्यात साबणाची विस्तृत माहिती होती. रोमन लोक साबणाचा उपयोग व उत्पादन या गोष्टी भूमध्य सागरी लोकांकडून शिकले. ब्रिटानियाचे रहिवासी केल्ट लोकांनाही या गोष्टी माहीत होत्या. केल्ट लोक चरबी व वनस्पतींची राख यांपासून साबण तयार करीत व त्याला सैपो म्हणत. यावरू न सोप हा इंग्रजी शब्द आला. दुसऱ्या शतकापर्यंत साबणाचे धुलाई करण्याचे महत्त्व लक्षात आले नव्हते. ग्रीक वैद्य गेलेन यांनी औषधी उपयोगाचे व शरीर स्वच्छ करण्याचे साधन असे साबणाचे वर्णन केले होते. पूर्वी साबणाचा औषधी उपयोग होत असे. आठव्या शतकातील जाबीर दूब्न हय्यात यांच्या लेखनात पृष्ठभाग स्वच्छ करणारे द्रव्य असा साबणाचा उल्लेख आलेला आहे.

जर्मनीत थोड्या प्रमाणात तर मध्य यूरोपात त्याहून कमी प्रमाणात साबण तयार होत असे. १६७२ मध्ये ए. लिओ या जर्मन गृहस्थांनी लेडी फोन श्लीनिटस् यांना इटलीमधून साबण भेटीदाखल पाठविला होता. तेव्हा हे गूढ द्रव्य कसे वापरायचे याचे तपशिलवार वर्णनही त्यांनी सोबत पाठविले होते.

सातव्या शतकात मार्सेली, जिनोआ, व्हेनिस व सॅव्होना ही शहरे साबणनिर्मितीची व्यापारी केंद्रे होती. कारण तेथे ऑलिव्ह तेल व कच्च्या सोड्याचे साठे विपुल प्रमाणात उपलब्ध होते. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम साबणाचे उत्पादन बिस्टॉल येथे बाराव्या शतकाअखेरीस झाले. तेराव्या व चौदाव्या शतकांत चीपसाइड (लंडन) येथे साबण निर्माण करणारी छोटी जमातच निर्माण झाली होती. तेव्हा साबणावर उत्पादन कर भरावा लागे. १८५३ सालापर्यंत हा कर चालू होता. १६०८ मध्ये अमेरिकेत साबणनिर्मिती होऊ लागली. तेव्हा जर्मन व पोलिश साबणनिर्माते जेम्सटाउन (व्हर्जिनिया) येथे स्थायिक झाले.


 अठराव्या शतकापर्यंत साबणनिर्मिती ही घरगुती कलाच होती. ग्रीझ वा तेले आणि राखेचे पाण्याने निक्षालन करू न बनविलेला अल्कली विद्राव ( लाय ) यांचे मिश्रण तापवून त्यात साधे मीठ घालीत. नंतर कच्च साबण तयार होईपर्यंत हे मिश्रण तापवीत असत. १७९१ मध्ये ⇨ नीकॉला लब्लां  यांनी साध्या मिठापासून धुण्याचा सोडा बनविण्याची स्वस्त पद्घत शोधून काढली. नंतर साबणनिर्मितीत तयार होणारे ग्लिसरीन परत मिळविण्याच्या पद्घतीचा शोध लागला. यामुळे साबणनिर्मितीचा खर्च कमी होऊन साबण स्वस्त झाला व त्याचा वापर वाढला. मिशेल यूजीन शव्ह्रल यांच्यामुळे एकोणिसाव्या शतकात साबणाचा आधुनिक उद्योग भक्कम अशा वैज्ञानिक पायावर उभा राहिला. कारण त्यांनी साबणाचा घटक असलेल्या अल्कली द्रव्याच्या संबंधातील वसाम्लांचे नेमके रासायनिक महत्त्व काय आहे, ते दाखविले [⟶वसाम्ले]. यासाठी त्यांनी वसाम्लांचे रासायनिक स्वरू प व संरचना यांचा शोध घेतला होता. अशा रीतीने एकोणिसाव्या शतकात साबण ही सामान्य दैनंदिन वापरातील वस्तू बनली. म्हणून जर्मन रसायनशास्त्रज्ञ युस्टुस फोन लीबिक यांनी देशात वापरल्या जाणाऱ्या साबणाचे प्रमाण हे त्या देशाच्या संपन्नतेचे व सुसंस्कृतपणाचे अचूक मापन करणारे साधन आहे, असे म्हटले होते.

लब्लां प्रक्रियेमुळे साबणनिर्मितीची ⇨साबणीकरण प्रक्रिया शक्य झाली. अल्कधर्मी जलीय विच्छेदन विक्रि येवर आधारलेली ही साबणीकरणाची विक्रिया पुढील रासायनिक समीकरणाने दर्शविली आहे. येथे हायड्रकार्बन शृंखला दर्शविण्यासाठी R हे इंग्रजी अक्षर वापरले आहे.

C3H5 (OOCR)3 

+

3NaOH 

⟶ 

3NaOOCR 

C3H5(OH)3 

वसा 

दाहक सोडा 

 

साबण 

 

ग्लिसरीन 

  

साबणनिर्मिती प्रक्रिया : साबण बनविण्यासाठी पूर्वी लाकडाची राख व प्राण्याची वसा (चरबी) वापरीत. राखेत पोटॅशियम कार्बो नेट हे अल्कली रूपात असते. राख पाण्यात विसरित होऊन विद्राव बनतो. या विद्रावात वसा मिसळून बनणारे मिश्रण उकळतात. या प्रक्रियेत उदासीन वसेचे सावकाशपणे विच्छेदन ( रासायनिक दृष्ट्या तुकडे होण्याची विक्रिया) होते. यामुळे वसाम्ले तयार होऊन त्यांची राखेतील अल्कधर्मी कार्बोनेटांशी विक्रिया होते. या विक्रियेमुळे साबण तयार होत असल्याने तिला ‘साबणीकरण’ म्हणतात.

काही प्रमाणात मुक्त वसाम्ले असलेल्या वसा केल्ट लोक साबण तयार करण्यासाठी वापरीत. मुक्त वसाम्लांमुळे साबणीकरण सुरू  होण्यास मदत होते. मध्ययुगाच्या अखेरीपर्यंत ही पद्घत वापरात असावी. नंतर अल्कली कार्बोनेटाचे दाहक (कॉस्टिक) सोड्यात रू पांतर करण्यासाठी भिजविलेला चुना वापरात आला. या प्रक्रियेमुळे उदासीन वसांचे दाहक अल्कलीने सहजपणे साबणीकरण होते. १७९१ साली पुढे आलेल्या लब्लां प्रक्रियेमुळे साध्या मिठाच्या पाण्यापासून सोडा ॲश (सोडियम कार्बोनेट) तयार करणे शक्य झाले. यामुळे साबणनिर्मिती या हस्तव्यवसायाचे उद्योगात परिवर्तन झाले. १८२३ साली शव्ह्रल यांनी पुढील बाब लक्षात आणून दिली. साबणीकरणात वसेचे विच्छेदन होऊन वसाम्लांचे क्षारीय लवण ( साबण ) व ⇨ग्लिसरीन तयार होतात. एकोणिसाव्या शतकात साबण बनविण्यासाठी वाफेचा (उष्णतेसाठी) उपयोग होऊ लागला. साबणनिर्मितीला उद्योगाचे स्वरुप प्राप्त होण्याच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

साबण-उत्पादन प्रक्रिया व उत्पादने : साबणीकरण या आधारभूत विक्रियेत तप्त दाहक अल्कली (दाहक सोडा) विद्रावाची वसा वा वनस्पतिज तेले यांसारख्या नैसर्गिक वसांवर विक्रिया होऊन अल्कली वसाम्ल लवण (साबण) व ग्लिसरीन तयार होतात. औद्योगिक रीतीने बनविलेली वसाम्ले वापरल्यास दाहक सोड्याबरोबर त्यांची विक्रिया होऊन साबण व पाणी तयार होतात ग्लिसरीन तयार होत नाही.

कच्चा  माल व समावेशक द्रव्ये : अल्कली व वसा किंवा वसाम्ले या मुख्य कच्च्या मालाशिवाय झळाळी आणणारे पदार्थ, पाणी मृदू (फेनद) करणारे पदार्थ, ⇨अपघर्षक, सुगंधी व रंगद्रव्ये इ. समावेशक द्रव्ये घालून वैशिष्ट्यपूर्ण साबण तयार करतात.

अल्कली  : बहुधा सोडियम हायड्रॉक्साइड ( दाहक सोडा ) व कधीकधी पोटॅशियम हायड्रॉक्साइड (दाहक पोटॅश) हे अल्कली वापरू न साबण तयार करतात. या साबणांना अनुक्रमे सोडियम आणि पोटॅशियम साबण म्हणतात. पोटॅशियम साबण सोडियम साबणापेक्षा पाण्यात अधिक विरघळतात. संपृक्त रू पातील पोटॅशियम साबणाला मृदू साबण म्हणतात. सध्या याचे महत्त्व कमी होत आहे. तथापि विविध संहतींच्या द्रवरू प पोटॅशियम साबणांचा वापर दाढीसाठीचे साबण व क्रीम यांमध्ये आणि कापड उद्योगांत सोडियम साबणाबरोबर करतात. धुलाईच्या बहुतेक सर्व साबणांत विशिष्ट अल्कली द्रव्ये घालतात. त्यांच्यामुळे साबणाची प्रक्षालनक्षमता वाढते. सोडियम सिलिकेट ( वॉटर ग्लास ), सोडियम कार्बोनेट ( सोडा ॲश ), सोडियम परबोरेट व विविध फॉस्फेटे ही काही सर्वांत महत्त्वाची अल्कली द्रव्ये आहेत.

वसा व तेले : प्राणिज व वनस्पतिज तेल, वसा, तसेच १२, १४, १६ व १८ कार्बन अणू असलेली वसाम्ले, लार्ड शिवाय सेल्युलोज व कागद उद्योगांतील उपपदार्थ ( उदा., रोझिने, टाल तेल इ.) साबण बनविण्यासाठी वापरतात. त्यांच्यामुळे साबणाला लाभणाऱ्या गुणधर्मानुसार यांचे पुढील चार गट करतात : (१) वसा, वाया जाणारी गीजे, उच्च उकळबिंदू असलेली सागरी प्राण्यांची व वनस्पतिज हायड्रो-जनीकृत तेले, तसेच पाम तेल या कठीण वसा वापरुन तयार केलेल्या साबणाचा फेस सावकाश तयार होतो. तो थंड पाण्यात थोडा व गरम पाण्यात अधिक होतो. हे साबण त्वचेच्या दृष्टीने सौम्य असून त्यांच्यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते. (२) खोबरेल व पाम गर (केर्नेल) तेल या कठीण वसांपासून तयार केलेल्या साबणाचा जलदपणे फेस तयार होतो. याचा वसा मिठाला संवेदनशील नसल्याने सागरी साबण बनविण्यासाठी योग्य आहेत व या साबणाचा सागरी पाण्यातही फेस होतो. (३) टिकाऊ मृदू साबणांसाठी ऑलिव्ह, सोयाबीन व शेंगदाणा ही तेले महत्त्वाची आहेत. शिवाय यांच्यासाठी अळशीचे व देवमाशाचे तेलही वापरतात परंतु ही तेले खवट होत असल्याने साबण वासट होऊन त्याचा रंग विटतो. (४) उपपदार्थ म्हणून मिळणारे टाल तेल व रोझीन वापरू न वैशिष्ट्यपूर्ण औद्योगिक, तसेच धुलाईचे व स्नानाचे स्वस्त साबण तयार करतात.

चकाकी आणणारे विशिष्ट पदार्थ साबणात घातल्याने पांढऱ्या कापडाला निळसर, जांभळट झळाळी प्राप्त होऊन ते अधिक शुभ व चमकदार दिसते. साबण विद्रावातील ही द्रव्ये कापडाच्या तंतूमध्ये शोषली जातात परंतु कापड पाण्यात खळबळल्यावर ती निघून जात नाहीत. निळ वापरल्याने कापड अधिक शुभ दिसले, तरी अधिक चमकदार दिसत नाही. पाण्यात न विरघळणाऱ्या एथिलीन डाय-अमाइन टेट्रा- ॲसिटिक अम्लामुळे (EDTA) पाणी मृदू होते. संगजिरा, डायाटमी माती, सिलिका, संगमरवर, ज्वालामुखी राख वा पमीस, चॉक, फेल्स्पार, क्वार्ट्झ व वाळू यांची पूड अपघर्षक म्हणून साबणात घालतात. तसेच लाकडाच्या भुशासारखे कार्बनी अपघर्षकही घालतात.


 साबणनिर्मिती प्रक्रिया : यासाठी अनेक तंत्रे वा पद्घती असून बहुतेक पद्घतींत उष्णता वापरावी लागते. या प्रक्रिया खंडित वा अखंडित प्रकारच्या असतात.

उत्कलन पद्घत : ही पद्घत लघू व मध्यम उद्योगांत मोठ्या प्रमाणावर वापरतात. या पद्घतीत ग्लिसरीन नसलेला नीट साबण (उत्पादन होताना वितळलेल्या अवस्थेत असलेला साबण ) तयार होतो. नंतर या नीट साबणापासून वड्या, पत्र्या, मणी व चूर्ण रTपांतील साबण तयार करतात. या पद्घतीत साबण काहिलीत तयार करतात. या पद्घतीचे अनेक टप्पे आहेत.

वितळलेली वसा काहिलीत टाकून तिच्यात दाहक सोड्याचा विद्राव सावकाशपणे घालतात. हे मिश्रण काहिलीत सच्छिद्र वेटोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या वाफेने जोमदारपणे उकळवितात. यामुळे साबणीकरण होते. दाहक सोडा व वसा यांच्यातील विक्रियेने मिश्रण दाट होत जाऊन पायसासारखे होते. यातून साबण व ग्लिसरीन तयार होतात. या खळीसारख्या उकळणाऱ्या मिश्रणावर मिठवणीची (मिठाच्या खारट पाण्याची) क्रिया करतात. यामुळे ग्लिसरीन साबणापासून वेगळे होते. कारण मिठवणीत ग्लिसरीन विरघळते, मात्र साबण विरघळत नाही. परिणामी वरच्या बाजूस साबणाचा दह्यासारखा थर व खालील बाजूस ग्लिसरीन विरघळलेल्या लवणी जलीय विद्रावाचा थर निर्माण होतो. या किंचित अल्कधर्मी विद्रावाला ‘स्पेंट लाय’म्हणतात. तो काहिलीच्या तळावरून काढून घेतात, नंतर त्यावर संस्करण करुन ग्लिसरीन परत मिळवितात.

साबणाचा कणयुक्त व दह्यासारखा थर काहिलीत मागे राहतो. त्यात साबणीकरण न झालेली वसा, अशुद्घी वा मळ व मूळ तेलातील रंगद्रव्य असते. यात तीव दाहक विद्राव घालून मिश्रण उकळतात. यामुळे उरलेली मुक्त वसा वापरली जाते.

अंतिम टप्प्यात अशुद्घी खाली जाऊन बसतात. यामुळे रंग व अशुद्घी निघून जाऊन नीट साबण तयार होतो. नंतर इष्टवेळी साबण खाऱ्या पाण्याने धुतात. यामुळे मुक्त रुपातील अल्कली निघून जातात अथवा त्याचे थेट पिचिंग करतात. म्हणजे जादा पाणी घालून काहिलीतील सर्व द्रव्य दोन थरांच्या रू पांत अलग होईपर्यंत उकळतात. नीट साबणाचा वरचा थर स्थिर संघटनाचा (७० % साबण व ३० % पाणी) असतो. खालच्या थराला निगे म्हणतात, त्यात १५ टक्क्यांहून अधिक साबण असतो. रंगद्रव्य, अशुद्घी (मळ), लवण, अल्कली व धातुसाबण हे निगे भागात विरघळणारे, परंतु नीट साबणात सापेक्षतः अविद्राव्य (न विरघळणारे) असून बहुतेक अशुद्घी जड असल्याने खाली बसतात म्हणजे त्या नीट साबणातून खालील निगे थरात येतात.

अखंड साबणनिर्मिती : जलीय विच्छेदन प्रक्रिया : उत्कलन पद्घती वेळखाऊ असते. कारण अशुद्घी खाली बसायला तिच्यात अनेक दिवस लागतात. शिवाय मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी प्रचंड मोठ्या काहिली लागतात. यामुळे तिच्याऐवजी मोठ्या प्रमाणावर अखंड पद्घती वापरली जाऊ लागली. अखंड पद्घतीत बहुधा वसा व तेलांऐवजी वसाम्ले वापरतात. वसाम्लांत अशुद्घी नसतात तसेच वसाम्ले व अल्कली यांच्या विक्रियेतून ग्लिसरिनाऐवजी पाणी तयार होते. यामुळे अशुद्घी व ग्लिसरीन काढून टाकण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय संपूर्ण अखंड प्रक्रियेचे नियंत्रण करणे अधिक सोपे काम असून ते अधिक अचूकतेनेही करता येते. म्हणजे प्रवाहमापक किंवा मापक पंपे वापरू न वसाम्ले योग्य प्रमाणात साबणीकरणाच्या प्रणालीत सोडता येतात आणि संवाहकता मापकांनी अंतिम जुळवाजुळव करणे सोपे असते.

झिंक सोप हा उत्प्रेरक [⟶उत्प्रेरण] तसेच अतिउच्चदाब व तापमान असलेले पाणी वापरुन नैसर्गिक वसेचे प्रथम वसाम्ले व नंतर ग्लिसरीन यांत विभाजन केले जाते. सामान्यपणे १५ मी. पेक्षा उंच स्तंभात हे विभाजन अखंडपणे होत असते. यासाठी वितळलेली वसा व नंतर पाणी स्तंभाच्या विरुद्घ टोकांनी सोडून वसाम्ले व ग्लिसरीन एकाच वेळी काढून घेतात. निर्वातात ही वसाम्ले ऊर्ध्वपातनाद्वारे शुद्घ होतात. नंतर दाहक सोड्याच्या विद्रावाने त्यांचे ⇨उदासिनीकरण होते. यातून नीट साबण तयार होतो. स्नानाचा साबण बनविताना अंतिम टप्प्यात जादा मुक्त वसाम्ले घालतात किंवा मागे राहतील असे पाहतात. यामुळे अंतिम उत्पादनात अनावश्यक अल्कली उरण्याचा धोका नसतो. ही संपूर्ण प्रक्रिया काही तासांत पूर्ण होते, तर उत्कलन पद्घतीला अकरा दिवस लागतात. शिवाय या प्रक्रियेत तयार होणारा ग्लिसरीन हा उपपदार्थ शुद्घ व संहत रुपात मिळतो.

थंड व अर्ध-उत्कलन पद्घती  : थंड पद्घतीत वसा आणि खोबरेल व पाम गर तेल यांचे उच्च प्रमाण असलेले मिश्रण अल्कलीबरोबर मिसळतात. सिद्घांततः जेवढे अल्कली लागणार असते त्यापेक्षा कमी अल्कली वापरतात. यामुळे अंतिम साबणात साबणीकरण न झालेली थोडीच वसा वा तेल उरते. हे मिश्रण दाट होईपर्यंत उघड्या पात्रात ढवळतात. नंतर ते साच्यांत ओततात. तेथे त्याचे साबणीकरण होऊन ते घट्ट होते.

अर्ध-उत्कलन पद्घतीत काहिलीत वसा टाकून तिच्यात अल्कली विद्राव घालतात. नंतर हे मिश्रण तापवितात व ढवळतात मात्र ते उकळू देत नाहीत. काहिलीत साबणीकरण झाल्यावर मिश्रण साच्यांत ओततात. तेथे ते घट्ट होते. सोपे तंत्र व कमी गुंतागुंतीची यंत्रसामग्रीरी यांमुळे छोट्या  कारखान्यांच्या दृष्टीने ही पद्घत आदर्श आहे.

अंतिम संस्करण प्रक्रिया : उत्कलन पात्रातून किंवा अखंड उत्पादन उपकरणांतून येणाऱ्या तप्त मिश्रणापासून इष्ट उत्पादांत परिवर्तन करण्या-साठी ही प्रक्रिया करतात. धुलाईच्या साबणासाठी हे लगद्यासारखे मिश्रण साच्यांत व दाबयंत्रात थंड होते. यामुळे त्याचे योग्य आकाराचे व आकारमानाचे तुकडे (वड्या) होऊन त्यांवर व्यापारी चिन्हे उमटतात. साबणाच्या पातळ व पारदर्शक पत्र्या तयार करण्यासाठी मिश्रणापासून प्रथम लांब फिती तयार होतात. त्या सुकवून त्यांचे योग्य आकारमानाचे तुकडे (पत्र्या) करतात. स्नानाचा साबण बनविताना मिश्रणात सुगंधी व रंगद्रव्ये आणि इतर समावेशक घटक घालतात. नंतर हे मिश्रण निर्वातात सुकवून थंड करतात. या मिश्रणापासून वरीलप्रमाणे साबणाच्या वड्या किंवा पत्र्या तयार करतात. घन साबण दळून वा चुरडून एकसारखे कण तयार होतात. यापासून टप्प्याटप्प्याने जाड व बारीक भुकटी तयार करतात. साबणाचे मिश्रण गरम असताना त्यात दाबाखालील हवा सोडतात. निर्वात शुष्कातून मिश्रण बाहेर पडताना तरंगणारा सच्छिद्र साबण तयार होतो. औषधी साबण सामान्यपणे स्नानासाठी वापरतात. त्यामुळे त्वचेच्या रंध्रांतील मळ निघून जाण्याबरोबरच जंतूंचाही नाश होऊ शकतो. अशा साबणांत क्लोरिनीकृत फिनॉल, झायलेनॉलाचे अनुजात, कोलोन इ. समावेशक द्रव्ये घालतात. यामुळे साबण दुर्गंधीनाशक व जंतुनाशक बनतो. दाढी करताना वापरण्यात येणारे घट्ट व क्रीमच्या रूपातील साबण हे पोटॅशियम व सोडियम साबणांचे विविध प्रकारे केलेले संयोग असतात.


 गुणवैशिष्ट्ये  व वैशिष्ट्यपूर्ण साबण : साबण पाण्यात विरघळल्याने पाण्याचा पृष्ठताण कमी होतो. त्यामुळे या विद्रावात त्याची इतर द्रव्यांबरोबर पायसे वा कलिली निलंबने तयार होतात. उदा., साबणाच्या पाण्याने हात धुतल्यास हातावरील धुळीचे कण (मळ) ओले होतात व साबणाच्या रेणुंमुळे ते सैलही होतात. मृदु पाण्याने ते निघून जातात. मात्र जड पाण्यातील विपुल कॅल्शियम ( Ca+ ) व मॅग्नेशियम ( Mg+) आयनांबरोबर साबणातील कार्‌बॉक्सिलेट आयनांची विक्रिया होऊन पाण्यात न विरघळणारी लवणे बनतात व ती अवशेषाच्या रूपात मागे राहतात. या द्रव्यांना ‘लाइम सोप’ म्हणतात. साबण वापरण्यामधील ही प्रमुख अडचण आहे. म्हणजे यामुळे चांगला फेस न झाल्याने हात स्वच्छ होत नाही. धुण्याच्या व आंघोळीच्या साबणाच्या पाण्यात लाइम सोप हे दह्यासारखे द्रव्य वर येते. धुलाईच्या साबणात सोडियम कार्बोनेटासारखे द्रव्य घालून हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. यामुळे कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेटांचा साखा खाली बसतो. मात्र ही कार्बोनेटे व दह्यासारखे द्रव्य कपड्यांवर अवशेषाच्या रुपात साचते व ते सहजपणे धुवून काढता येत नाही. यांमुळे कपडा हळूहळू निस्तेज, करडा व कधीकधी कडक होत जातो. साबणाच्या या गंभीर अडचणीवर मात करण्यासाठी कृत्रिम वा संश्लेषित प्रक्षालके पुढे आली. मात्र त्यांच्यामुळे इतर प्रकारच्या समस्या पुढे आल्या. [⟶ प्रक्षालके].

साबणाचा रेणू कोणते विशिष्ट कार्बॉक्सिल अम्ल व आधारभूत अल्कली यांच्यापासून बनला आहे, यांवर त्या विशिष्ट साबणाचे गुणधर्म अवलंबून असतात. अल्कलीच्या स्वरूपांनुसार साबणाचे जलविद्राव्य व धातवीय हे दोन स्थूल प्रकार होतात. जलविद्राव्य साबण सोडियमाची लवणे असतात. पाण्याप्रमाणेच अनेक कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थात) विरघळणारे साबण सर्व प्रकारच्या धुलाईसाठी वापरतात. पाण्यातील तेलासारखी पायसे आणि पाण्यातील घन कणांची निलंबने यांसाठी त्यांचा असा उपयोग होतो. अमाइन साबणांचे कार्बनी विद्रावकांतील विद्राव पुष्कळदा धातू स्वच्छ करणे, कपड्यांची निर्जल धुलाई व गंजरोधन यांसाठी वापरतात.

ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरियम, लिथियम, जस्त, शिसे, कोबाल्ट व तांबे यांच्या ऋणायनांची लवणे म्हणजे धातवीय साबण होत. ते पाण्यात विरघळत नाहीत, मात्र ते कार्बनी विद्रावकांत विरघळतात किंवा विसरित होतात. पाण्यातील तेलासारखी पायसे बनविणे, तसेच इतर उपयोगांसाठी धातवीय साबण वापरतात. जेलीकारक, कार्बनी विक्रियांसाठी उत्प्रेरक आणि व्हिनिल प्लॅस्टिकांसाठी स्थिरीकारक म्हणूनही ते वापरतात.

स्नानाचे साबण वड्या, चूर्ण, पत्र्या व मणी अर्धद्रव रूपांत असून हे सर्वांत महत्त्वाचे साबण आहेत. स्नानाप्रमाणेच बश्या व तलम कापड धुण्यासाठीही हे वापरतात. धुलाईसाठी यांची प्रक्षालनक्षमता वाढावी म्हणून त्यांच्यात विशिष्ट समावेशक द्रव्ये घालतात.  

दाढीचे साबण आणि फेसाळणारे व साधे कीम मुख्यतः पोटॅशियम स्टिअरेट असून त्यात थोडे सोडियम स्टिअरेटही असते. त्यामुळे दाढीच्या केसांना दृढता (ताठरपणा) प्राप्त होते. दाढीचे क्रीम वायुकलिल वा संपीडित अर्धद्रव रू पातही असते. शाम्पू (केशधावक) सर्वसाधारणपणे अर्धद्रव रुप असून ते खोबरेलयुक्त पोटॅशियम साबण असतात.  

भांडी व फरशी घासावयाचे वा उजळण्याचे ( स्क्र ब ) साबण सर्वसाधारणपणे सोयाबीन, ऑलिव्ह तेलाचा गाळ व टाल यांसारख्या कमी प्रतीच्या तेलांचे पोटॅशियम साबण असतात. ते पाण्यात विरघळतात व त्यांचा उत्पादन खर्च कमी असतो. त्यांची कोठी तापमानाला असलेली प्रक्षालनक्षमता समाधानकारक असते. ओलेइक अम्लाचे अमाइन साबण कार्बनी विद्रावकांत विरघळतात. ते निर्जल धुलाई व धातू स्वच्छ करणे यांसाठी वापरतात. मॉर्‌फॅ्लीन साबण बऱ्याचदा रंगलेप व मेणाचे पायस यांत वापरतात. यामुळे वस्तूंचे पाण्यापासून संरक्षण होते.  

उपयोग : पृष्ठभाग स्वच्छ करण्याच्या विविध कामांसाठी साबण वापरतात. विकसित देशांत मुख्यतः स्नानाचा साबण वापरला जातो. इतर धुलाई कामांसाठी तेथे प्रक्षालके व वैशिष्ट्यपूर्ण साबण वापरतात. साबणाचा चुरा, पत्र्या व मणीही थोड्या प्रमाणात वापरतात. अनेक विकसनशील देशांत मात्र प्रक्षालकांपेक्षा साबण अधिक वापरतात. क्षारीय मृत्तिका व जड धातू यांची दीर्घ शृंखला कार्‌बॉक्सिलेटे असणारे धातवीय साबण, वंगण, तेले व ग्रि जे यांमध्ये समावेशक किंवा गंजरोधक द्रव्य म्हणून वापरतात. रोगनियंत्रण, कापड जलाभेद्य करणे, पोलादी तार काढताना मुद्रांवरील व प्लॅस्टिकांच्या साचेकामातील वंगण म्हणून, भुरी (दहिया) रोगप्रतिबंध करणे वगैरे कामांसाठी धातवीय साबण वापरतात. सौंदर्यप्रसाधनविषयक व औषधी क्रिमे, धावन द्रव (लोशन), मलमे, स्वयंझिलई ( पॉलिश ) करणारी मेणे यांमध्ये तसेच कीटकनाशके, जंतुनाशके व कवकनाशके यांच्या फवाऱ्यांसाठीची पायसे बनविण्यासाठी साबण वापरतात. आगलावी युद्घसामगींतील जेल गॅसोलीन बनविण्यासाठी साबण वापरतात. रंगलेपांतील शुष्कक म्हणून साबण वापरतात. कृत्रिम रबर व विविध प्लॅस्टिके यांचे उत्पादन साबणाच्या विद्रावांत करतात. काँक्री ट जलाभेद्य करणे, कातडी भुरीरोधी करणे, जहाजे बार्नेकल (काही कवचधारी जातींच्या ) प्राण्यांपासून मुक्त ठेवणे व खाद्यपदार्थांच्या संस्करणात आरोग्यदायी स्वच्छताकारक या कामांसाठीही साबण वापरतात. सौंदर्यप्रसाधनांतील अनेक शाम्पू व क्रिमे यांचा आधार साबणातील अमाइने (कार्बनी अल्कली द्रव्ये) असतात. झिंक स्टिअरेट हा साबण जलप्रतिकारक म्हणून वापरतात.

पहा : ग्लिसरीन तेले व वसा धुलाई पायस पृष्ठक्रियाकारके प्रक्षालके फेस वसाम्ले साबणीकरण.

संदर्भ : 1. Kane, J. G. Soap : Their Chemistry and Technology, Hydrabad, 1959.

    2. Standen, A and others (Eds.), Kirk-Othmer Encyclopedia of Chemical Technology, New York, 1983.

   3. Stone, A Harris, Slegep Bertrum, M. Chemistry of Soaps, 1968.

   4. Thomson, E. G Mccuteon, J. W. Soaps and Detegents, 1967. 

   5. Thorpe, J. F Wutlay, M. A. and others, Thorp’s Dictionary of Applied Chemistry, London, 1937-56.

   6. Woolatt, E. The Manufacture of Soaps, Other Detergents and Glycerine, 1985.

ठाकूर, अ. ना.