साप्पोरो : जपानच्या होक्काइडो बेटाचे प्रमुख ठिकाण. देशाचे एक सांस्कृतिक केंद्र व व्यापारी शहर. लोकसंख्या १९,२१,८३१ (२०११) ते बेटाच्या नैर्ऋत्य भागातील इशिकारी मैदानात इशिकारी नदीकाठी वसले साप्पोरो : हिमशिल्प महोत्सव.आहे. शहराची स्थापना १८६८ मध्ये करण्यात आली असून याचा रचनाकल्प १८७१ मध्ये अमेरिकन अभियंत्यांनी तयार केला. बुद्घिबळाच्या पटाप्रमाणे शहराचा आराखडा असून दुतर्फा झाडांच्या रांगा असलेले काटकोनात छेद जाणारे रुंद रस्ते हे याचे वैशिष्ट्य आहे. वासाहतिक काळात १८८६ मध्ये होक्काइडो प्रांताचे हे प्रशासकीय केंद्र करण्यात आले. या काळात शहराची भरभराट झाली. याच्या पश्चिमेस ४० किमी. वरील ओतारू या बंदरातून व्यापार वाढला. पुढे दुसऱ्या महायुद्घानंतर शहराची औद्योगिक प्रगती होऊन व्यापारातही वाढ झाली. सांप्रत शहरात छापखाने, लाकूड चिरकामाच्या गिरण्या, प्रकाशन संस्था, अन्नप्रक्रिया उद्योग, बांधकाम व्यवसाय, कापडउद्योग, रबरी वस्तू, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, कृषियंत्रावजारे निर्मिती इ. व्यवसायांचा विकास झाला आहे. परिसरातील टोयो ह्या खाणीतून मिळणाऱ्या जस्त आणि शिसे यांवरील प्रक्रिया उद्योगही येथे वाढला आहे. साप्पोरो हे उत्तम प्रतीच्या बीर उत्पादनासाठी प्रसिद्घ असून येथे कांदे व कलिंगडे यांची मोठी बाजारपेठ आहे. ‘साप्पोरो बूअरीज लिमिटेड’ ही शहरातील बीयर उत्पादक कंपनी मद्यार्क आणि सौम्य पेयांचेही उत्पादन करते व त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करते.

साप्पोरो १९७२ मधील हिवाळी ऑलिंपिक सामन्यांमुळे जगभर प्रसिद्घ झाले. येथे प्रथमपासूनच हिवाळी खेळांना प्राधान्य दिलेले असून स्कीइंग हा बर्फावरील खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. येथे दरवर्षी हिमोत्सव भरतो. या उत्सवात हिमराशीतून बर्फ जमा करून त्यांची अजस्त्र शिल्पे बनविण्यात येतात. येथे ३ ते १३ फेबुवारी १९७२ मध्ये हिवाळी ऑलिंपिक क्री डा स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यांमध्ये स्कीइंग, स्केटिंग, बर्फावरील हॉकी व घसरगाड्यांच्या शर्यती, धावण्याच्या शर्यती इ. खेळांचा अंतर्भाव होता.

मारुयामा आणि मोईवायामा या येथील अभयारण्यांमुळे तसेच वनस्पतिउद्यानामुळे साप्पोरो हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. शहरात होक्काइडो विद्यापीठ (स्था. १८७६) असून तेथे अमेरिकन शिक्षणतज्ञ विल्यम स्मिथ क्लार्क यांचा पुतळा आहे. उद्याने, मारुयामा अभयारण्य, जोझांकेई हा गरम पाण्याचा झरा ही शहराच्या परिसरातील अन्य प्रेक्षणीय व पर्यटकांची आकर्षण स्थळे आहेत.

चौंडे, मा. ल.