साने गुरुजी : ( २४ डिसेंबर १८९९– ११ जून १९५०). अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने परंतु साने गुरुजी या नावानेच ते ओळखले जात. त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला माध्य-मिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो) पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी ⇨विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).
साने गुरुजींनी मुलांसाठी केलेल्या अन्य लेखनात गोड गोष्टी (भाग १ ते १० १९४१–४५ ), चिमण्या गोष्टी (१९४९) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय होत. मुलांसाठी पश्चिमी साहित्यातील ⇨टॉमस हार्डी, ⇨मारी कोरेली (१८५५–१९२४), ⇨व्हिक्टर ह्यूगो ह्यांच्या उत्कृष्ट कादंबऱ्यांच्या कथा त्यांनी मराठीत आणल्या. धडपडणारी मुले (दोन खंड, १९३७), आस्तिक (१९४०), क्रांती (१९४०), सती (१९४०), रामाचा शेला (१९४४) ह्या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या कादंबऱ्यांत तांत्रिक दोष समीक्षक दाखवितात पण वाचकाला सात्त्विक आनंद देण्याची मांत्रिक शक्ती या दोषांवर मात करते. या कादंबऱ्यांत उत्तान प्रणयाऐवजी संयत, सात्त्विक प्रेमाची उज्ज्वल धारा वाहताना दिसते. श्रमणारी लक्ष्मी ह्या कथासंगहाव्यतिरिक्त त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या. तसेच भारतीय संस्कृति (१९३७), इस्लामी संस्कृति (१९६४) अशी विवेचक स्वरूपाची पुस्तकेही त्यांनी लिहिली. भारतीय संस्कृती हे विचारांच्या दृष्टीने गुरुजींचे सर्वांत प्रौढ पुस्तक होय. भारतीय संस्कृतीची मूलतत्त्वे समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रबंध अत्यंत उपयुक्त आहे. यातील विचार मनाला आश्वासन देणारे व जीवनावरील श्रद्घा वाढविणारे आहेत. साने गुरुजी विचारांचे प्रवर्तक नसून एकनिष्ठ वृत्तीचे प्रचारक असल्याचा प्रत्यय या ग्रंथांत येतो. विनोबांनी गीतेवर दिलेली प्रवचने त्यांनी अक्षरबद्घ केली ( गीता-हृदय, आवृ. २ ,१९४४). सुंदर पत्रे (भाग १ ते ३, १९५०) ही त्यांनी सुधा नावाच्या मुलीला लिहिलेली पत्रे आहेत. पत्री (१९३५) हा त्यांचा देशभक्तिपर गीतांचा संग्रह असून बिटिश सरकारने तो जप्त केला होता. ⇨ ईश्वरचंद्र विद्यासागर, ⇨गोपाळ कृष्ण गोखले, ⇨शिशिरकुमार घोष, ⇨रवींद्रनाथ टागोर, ⇨बेंजामिन फँकलिन ह्यांसारख्या थोर व्यक्तींची एकूण १९ चरित्रे त्यांनी लिहिली. ⇨भगिनी निवेदिता, रवींद्रनाथ टागोर, ⇨राधाकृष्णन् ह्यांच्या लेखनाचेही त्यांनी अनुवाद केले. त्यांच्या सर्व लेखनामागची प्रेरणा मात्र नैतिक बोधाची आणि समाजपरिवर्तनाची राहिली. प्रख्यात रशियन साहित्यिक ⇨लीओ टॉलस्टॉय याने स्वतःची कलाविषयक भूमिका स्पष्ट करण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथाचा अनुवाद कला म्हणजे काय? ह्या नावाने साने गुरुजींनी केला, ह्याचे कारण हेच होय. त्यांच्या साहित्यात तत्कालीन जनजीवनातील आदर्शवादी व ध्येयवादी उन्मेष स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहेत. ती एका कविहृदयाची निर्मिती होती. त्यांची साधी, सरळ, छोट्या वाक्यांची, खास मराठी मनाचा ठसा असलेली देशीभाषा आहे.
सभोवतालची सामाजिक-राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनःस्थितीत मुंबई येथे त्यांनी आत्महत्या केली. आंतरभारती, सानेगुरुजी कथामाला, ⇨राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी सेवा पथक अशा अनेक संस्था त्यांच्या जीवनापासून व कार्यापासून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालत आहेत.
संदर्भ : १.जाधव रा. ग. संपा. निवडक साने गुरुजी, पुणे,१९९८.
२. रेडकर, चैत्रा, साने गुरुजी, पुणे, २०१०.
थत्ते, यदुनाथ
“