सात्म्या सात्म्य : मानवी शरीराशी सृष्टीतील कोणत्याही द्रव्यगुण-कर्माचा संबंध आला असताना ते शरीराने आत्मसात केले व घटक बनविले म्हणजे त्याला सात्म्य असे म्हणतात. आत्मसात झालेले द्रव्य शरीराला शल्यरुप न होता आपल्या गुणकर्मांनी शरीरात आरोग्य निर्माण करते व सुख देते ह्यालाच उपशय असे म्हणतात.
उपशय देणाऱ्या द्रव्याला सात्म्यार्थ अशी संज्ञा आहे. प्रवर (श्रेष्ठ), मध्य (मध्यम) आणि अवर (कनिष्ठ) हे सात्म्यार्थांचे प्रकार आहेत. सहाही रस ज्याला सुखावह होतात त्याचे ते प्रवर म्हणजे श्रेष्ठ सात्म्य होय. तीन-चार रस ज्यांना सुखावह होतात ते मध्य सात्म्य होय. एकच रस ज्याला सुखावह होतो त्याचे ते अवर म्हणजे कनिष्ठ सात्म्य होय.
सात्म्याचे सात प्रकार असून प्रत्येक रसाचे सात्म्य असणारे सहा प्रकार व सर्व रस सात्म्य असणे हा एक प्रकार होय. म्हणजे मधुर सात्म्य, लवण सात्म्य इ.सहा प्रकार आणि सहाही रसांचे सात्म्य असा एक मिळून सात प्रकार होतात.
अवर सात्म्य व मध्य सात्म्य असणाराने प्रवर सात्म्य क्रमाने संपादन करावे. जे रस सात्म्य नाहीत ते रस हळूहळू सात्म्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रवर सात्म्य असणाऱ्याने त्या त्या रसाच्या द्रव्याचे स्वभाव जड, हलके इ. स्वभावगुणांचा विचार करून आपल्याला ते हितकर किंवा अहितकर कसे आहेत याचा विचार करून जे हितकर असतील तेच सेवन करावेत. आहाराचा प्रकार, तो घेण्याचा विधी, त्याचे हिताहितत्व, हिताहितत्वाची कारणे हे सर्व पाहणे आवश्यक असते. प्रकृती, करण, संयोग, राशी, देश, काल, उपयोगसंस्था आणि उपयोग करणारा ही आहारविधीची आठ कारणे आहेत.
द्रव्याचा स्वभाव म्हणजे प्रकृती. आहार-औषध व ह्या द्रव्याचे जे स्वाभाविक गुरु, लघू, स्निग्ध, रुक्ष इ. गुण यांचा जो योग असतो तो द्रव्याचा स्वभाव होय. जसे उडीद जड आहेत, तर मूग हलके आहेत. डुकराचे मांस जड आहे व हरणाचे मांस हलके आहे. हे गुण पाहून आपल्याला जे सात्म्य होईल त्याचा उपयोग करावा.
करण म्हणजे नैसर्गिक द्रव्यावर करावयाचा संस्कार. संस्कार म्हणजे निराळे गुण निर्माण करणे. ते गुण पाणी, अग्नी, देश (स्थान), काल, वासन (सुगंधी करणे), भावना, कालाची मर्यादा व भांडे इ. साधनांनी उत्पन्न करता येतात.
तोयाग्निसंनिकर्ष व शौच पाहणे म्हणजे तांदूळ चांगले धुवून स्वच्छ केले, पाणी काढून टाकले, अग्नीवर शिजविले तर होणारा भात हलका होतो. तांदूळ अग्नीवर भाजल्यावर होणाऱ्या लाह्या खूप हलक्या होतात.
मंथन म्हणजे सूज उत्पन्न करणारे. दही घुसळून घेतले, तर ते सूज नाहीसे करते. देश म्हणजे आसव भस्माच्या राशीत किंवा धान्याच्या राशीत ठेवले म्हणजे त्यातील दोष नाहीसे होऊन ते गुणवान होते.
काल म्हणजे योग्य अग्नीवर अधिक काळ अन्न शिजविले, तर ते जास्त गुणवान होते, मात्र तीव्र अग्नीवर झटकन शिजवून घेतले, तर तितके गुणवान होत नाही. कालप्रकर्ष होणे म्हणजे आसव अधिकाधिक कालाचे जुने होईल, तसे ते अधिक गुणांचे तयार होते.
वासन करणे म्हणजे उन्हाळ्यात पाण्यामध्ये वाळा घालून ते सुगंधी करणे होय.
भावना देणे म्हणजे चंदन, वाळा इ. रसांच्या भावना औषधांना दिल्याने औषध शीतवीर्य होते आणि पित्रकादिकाची भावना दिल्याने ते उष्णवीर्य होते.
भाजन (भांडे) म्हणजे पांडुरोगात त्रिफळेची चटणी लोखंडाच्या भांड्याला लावून दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे सेवन करावयाचे असते. त्रिफळेवर लोखंडाच्या भांड्याचा संस्कार केला जातो. अशा रीतीने संस्कार करून आहार्य द्रव्यातील गुण वाढवून ते द्रव्य आपल्याला हितकर करून सेवन करता येते. तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम असते, असे कोणते आहार्य पदार्थ कोणत्या भांड्यात असावे ते ठरलेले आहे.
दोन किंवा अधिक द्रव्ये एकत्र केली असता काहींचे मिश्रण होते आणि काहींचा संयोग होतो. मिश्रणामध्ये ती द्रव्ये त्या मिश्र स्वरुपात पोटात गेल्यानंतर आपापल्या गुणधर्माप्रमाणे कार्य करतात परंतु संयुक्त झालेली द्रव्ये आपापल्या गुणधर्माप्रमाणे कार्य न करता, त्यांच्या संयोगाने एक विशिष्ट द्रव्य निर्माण होऊन ते कार्य करते. वरण आणि भात तसेच डाळ व तांदूळ यांची खिचडी ही स्वतंत्र तऱ्हेने आपापले कार्य शरीरावर करतील मात्र मध आणि तूप तसेच मध, मासे आणि दूध ही एकत्र करून आहार मात्रेने घेतली, तर त्या घटक द्रव्यांचे स्वतंत्र कार्य न होता त्यांच्या संयोगाने बनलेले विशिष्ट द्रव्य ते कार्य करते.
दोषकारक व गुणकारक संयोग, हे संयोगाचे दोन प्रकार आहेत. (१) मध आणि तूप ही स्वतंत्र रीत्या शरीराला उपकारक होतात परंतु एकत्र दिली तर ती मारक होतात, हा दोषकारक संयोग आहे. संयोगाचे पुढील आणखी प्रकार आहेत. कणीक व हळद यांच्या मिश्रणाने रंग बदलत नाही, तर चुना व हळद यांच्या मिश्रणाने संयोग होऊन निराळे द्रव्य बनते. त्याचा रंगही बदलतो. ते तांबडे होते. हा दृश्य संयोग आहे.
दूध, मध व मासे ह्या उदाहरणात द्रव्यांचा रंग हा गुण बदलत नाही, परंतु इतर गुण बदलून दोष निर्माण होतो. ही द्रव्ये बदललेली दिसत नाहीत. हा अदृश्य संयोग होय.
(२) दह्याबरोबर सैंधव, साखर, मध, आवळकाठी इ. द्रव्ये मिसळून ते खाल्ले असता दह्याचे दोष नाहीसे होऊन तो संयोग गुणकर होतो. गुणकर संयोग म्हणजे संयोग सात्म्य व दोषकर संयोग हे संयोग असात्म्य होय.
राशी म्हणजे मात्रा असून तिचे सर्वग्रहराशी व परिग्र हराशी हे प्रकार आहेत.
(१) सर्वग्र हराशी आहार शरीराच्या गरजेइतका घेतला तर तो पचतो म्हणजे सात्म्य होतो. शरीराच्या गरजेला अनुसरुन घ्यावयाचे जे प्रमाण त्याला मात्रा असे म्हणतात. यालाच सर्वग्र हराशी, पूर्ण आहार मात्रा म्हणतात.
आमाशयाचा अर्धा अवकाश भरेल इतका आहार घ्यावा. एक चतुर्थांश पातळ पेय (पाणीसुद्घा) घ्यावे व १/४ भाग वायू इत्यादींकरिता मोकळा राहू द्यावा. अर्धे पोट भरेल इतका आहार ही आहाराची स्वाभाविक मात्रा होय.
शिरा व लाडू यांसारख्या जड पदार्थांचाच आहार असेल, तर वरच्यापेक्षा निम्मा घ्यावा परंतु हलका आहार अतितृप्ती होईपर्यंत घेऊ नये. ही सर्व आहाराची राशी होय. ह्याला सर्वग्र हराशी किंवा पूर्ण आहारमात्रा असे म्हणतात.
(२) आहार घटकांची वेगवेगळी मात्रा म्हणजे परिग्र हराशी होय. भाज्या किंवा कढी किंवा आमटी खूप घेतली आणि भात पोळी कमी घेतली, तर ते सात्म्य होणार नाही. भात, पोळी हा मुख्य आहार व बाकीचे त्या पदार्थांना साहाय्यक म्हणून असावे. यांचे प्रमाण कमी असावे. भात, भाकरी यांचे म्हणजे घन-अन्नाचे १५ ते २० तोळे, मांस ८ तोळे इ. प्रमाण आहारातील पृथक् पदार्थांचे आहे (१ तोळा =१० ग्रॅ). असे प्रमाण घेतले तर ते सात्म्य होते. या मात्रेला आहारांश मात्रा म्हणावे. ही आहारांश मात्रा सात्म्य होय. या आहारांशाचे परस्पर योग्य प्रमाण न ठेवता घेतले, तर ते असात्म्य होईल. त्याला आहारांश मात्रेचे असात्म्य म्हणावे.
आहारात पुढील दोन प्रकारचे प्रदेश असतात : एक आहारद्रव्योत्पत्ती प्रदेश व दुसरा भक्षकाचा प्रदेश. हिमालयातील गहू इ. द्रव्ये जड तर राजस्थानातील हलकी असतात. खानदेशच्या गव्हाच्या पोळीला तूप लावले नाही तरी तो पचतो. तो स्निग्ध व हलका आहे. इतर गहू तापीकाठच्या गव्हाच्या मानाने जड व रुक्ष असतात. कोकणातील तांदूळ जड तर इतर ठिकाणचा हलका, म्हणून कोकणात श्रमिक नुसता भात खाऊनही काबाडकष्ट करु शकतो परंतु नुसता भात खाऊन भागत नाही. गहू, बाजरी व ज्वारी यांपैकी काही तरी जोडीला हवेच. या दृष्टीने कोठले व कोणते अन्न सात्म्य होईल ते पाहून खावे. हा प्रदेश सात्म्यासात्म्य विचार होय.
समुदाय देश सात्म्यात व्यक्ती जर आनूप (आर्द्र) देशात असेल तर रुक्ष व उष्ण आहार सात्म्य होईल, या उलट स्निग्ध, शीत व जड असात्म्य होईल. जांगल (रुक्ष) देशात त्याच्या उलट सात्म्यासात्म्य होईल. साधारण देशात सर्व प्रकारचा आहार सात्म्य होईल. देशगुणांच्या विपरीत गुणांचा आहार सात्म्य होतो व समान गुणांचा आहार असात्म्य होतो, असा नियम आहे.
प्रचार सात्म्यासात्म्य : वनस्पतिज आहाराबद्दलच्या वरील विचाराप्रमाणेच प्राणिज आहाराचा विचार करताना तो प्राणी ज्या प्रदेशात असतो त्याप्रमाणे त्याचे गुण असतात. आनूप प्रदेशांतल्या प्राण्यांचे मांस जड तर जंगल प्रदेशांतल्या प्राण्यांचे मांस हलके असते. भक्षक शरीर प्रदेशाचे पुढील दोन प्रकार आहेत : समुदाय सात्म्यासात्म्य व अवयव सात्म्यासात्म्य. समुदाय सात्म्यासात्म्यमध्ये मधुर रस सर्व धातूंना वर्धक म्हणजे सात्म्य आहे. तसेच क्षार व विषे ही असात्म्य आहेत. तर अवयव सात्म्यासात्म्यमध्ये सैंधव व मोरांचे मांस डोळ्यांना हितकर आहेत तर क्षार डोळ्यांना अहितकर (असात्म्य) आहेत.
शेळी कडू व तिखट असा हलका पाला खाते म्हणून तिचे मांस हलके असते. आक्रमक हिंस्र प्राण्यांचे मांस हलके असते. हे लवकर सात्म्य होते. याउलट आनाक्रमक गाय, म्हैस इत्यादींचे मांस जड व असात्म्य होते.
कालसात्म्यासात्म्यात कालाचे दोन प्रकार आहेत : (१) नित्यग म्हणजे दिवस, रात्र व ऋतू आणि (२) आवस्थिक म्हणजे अवस्थांना अनुसरुन बाल्य, तारुण्य तसेच रोगाच्या भिन्नभिन्न अवस्था इत्यादी. नित्यग कालात कालगुणांच्या विपरीत गुणांचा आहार सात्म्य होतो व समगुणी असात्म्य होतो. आवस्थिक कालात (१) बाल्यामध्ये कफकर द्रव्ये व वार्धक्यात वातुळ द्रव्ये असात्म्य. (२) ज्वराच्या आमावस्थेत लंघन, पाचक ही सात्म्य व दूध असात्म्य तर पक्वावस्थेत दूध, तूप सात्म्य व लंघनादी असात्म्य होत.
रोगावस्थेत किंवा ऋतुचर्चेत वमन, विरेचन इ. शोधन दिल्यानंतर नित्याचा सात्म्य आहार त्याच स्वरुपात असात्म्य होतो. तो मंड, पेय इ. द्रव्यांकडून घनाकडे जाणारा तसेच प्रथम केवल अकृत व नंतर फोडणी इ. संस्कारांचा कृत दिला तरच सात्म्य होतो. अशा वेळी भात खाणारांना भाताचा द्रवच, गहू खाणाऱ्याला गव्हाच्या पिठाची लापशी असा नेहमीच्या सवयीचा व सात्म्य होणारा आणि मुख्य आहार द्रव स्वरुपातच प्रथम दिला पाहिजे आणि नंतर तो घन, अधिक घन इ. क्रमाने वरीलप्रमाणे दिला पाहिजे. अग्निवर्धनाच्या वेळी अग्नी अबल असतो.
जातिसात्म्यासात्म्यानुसार मानव जातीला भात, गहू इ.सात्म्य परंतु तृण, काष्ठ इ. असात्म्य असून ते पशूंना सात्म्य आहेत.
आजन्म सात्म्यासात्म्य म्हणजे सस्तन प्राण्यांना त्यांचे दूध हे आजन्म सात्म्य असते. दुधात आजन्म सात्म्य होण्याची स्वाभाविक योग्यता आहे. तशीच योग्यता मधुर रसांत आहे. तेही आजन्म सात्म्य आहेत. इतर दुधापेक्षा मानवी दूध अधिक गोड असते.
ओक म्हणजे अभ्यास. ओक सात्म्यासात्म्य म्हणजे जे शरीराला आजन्म सात्म्य नसते परंतु ते पुढे क्रमाने, अभ्यासाने व सतत सेवनाने आत्मसात होते, ते अभ्याससात्म्य होय. मानवाला वा मानव प्रकृतीला ही असात्म्य द्रव्ये अभ्यासाने सात्म्य होतात. विष हे मानवासाठी मारकच परंतु तेही सात्म्य होऊ शकते. मानवप्रकृती विषात्मक असली, तरी तिखट पदार्थ अभ्यासाने सात्म्य होऊ शकतात. अर्थात त्याला मर्यादा आहेच.
अल्पसात्म्य म्हणजे देश, काल, जाती, ऋतू, रोग, व्यायाम, प्राणी, दिवसा झोप, आहाराचे षड्रस इ. प्रकृतीशी विरुद्घ असले, तरी अभ्यासाने फार बाधक होत नाहीत. कफ प्रकृतीला आनूपदेश, विसर्गकाल (वर्षा, शरद व हेमंत) हे काल, म्हशीचे दूध, अल्पनिद्रा, आनूपदेशातील पाणी, दिवसा झोप, मधुर रस हे विरुद्घ असून ते अभ्यासाने थोड्या प्रमाणात सात्म्य होतात. जो आहाराचा उपयोग करतो तो पुरुष म्हणजे उपयोक्ता असून याच्यावरच ओकसात्म्य अवलंबून आहे. आहार घेण्याच्या विधीचे हिताहितत्व ज्यावर अवलंबून आहे त्या कारणांतील पुरुष हाच मुख्य आहे. तो प्रकृती, सारासारत्व इत्यादींच्या दृष्टीने कसा हे ठरवून त्याप्रमाणे सात्म्यासात्म्य विचार करावा लागतो.
उपयोग संस्था म्हणजे उपयोगाचे नियम होत. सात्म्य होणाऱ्या आहाराचे सात्म्य होणे हे आहाराचा उपयोग करावयाच्या नियमांवर अवलंबून आहे. या नियमांचा उपयोग केला, तर तो रोगी व निरोगी या दोघांनाही स्वाभाविक अत्यंत हितकर होतो.
वरील प्रकृती, करण, संयोग, राशी, देश, काल, उपयोक्ता व उपयोग संस्था ही जी आहारविधीची आठ कारणे आहेत त्यांचे हितत्व आणि अहितत्व हे आरोग्य व अनारोग्य कारक होते.
आहार हा उष्ण स्निग्ध शरीराच्या गरजेइतक्याच प्रमाणात, पूर्वीचा आहार जीर्ण झाल्यावर अविरुद्घ वीर्याचे इष्ट देशांमध्ये आवश्यक त्या सर्व उपकरणांसह अतिशय घाईने नाही, अतिशय सावकाशही नाही, न बोलता, न हसता आणि जेवणाकडेच पूर्ण लक्ष ठेवून स्वतःच्या स्थितीचा चांगल्या रीतीने विचार करून आहार घ्यावा, हा नियम होय. उष्ण अन्न खावे. ते स्वादिष्ट कफनाशक अग्निदीपक असल्याने लवकर जिरते व वात सरतो. स्निग्ध अन्न वरच्या गुणांनी युक्त असून शरीर पुष्टकर, प्रसन्न वर्णांचे बळकट असे करते. योग्य मात्रेत खाल्लेले अन्न वात-पीत्त-कफ दोषांना, पीडित न करता केवळ आयुष्यच वाढविते. त्रास न घेता व्यवस्थित पचन होऊन गुदापर्यंत जाते आणि शरीराचा ऊष्मा कमी करीत नाही. पूर्वाभ जिरल्यावर जेवावे. त्या वेळी दोष स्वतःच्या स्थानांत असतात. अग्निप्रदीप्त असतो. भूक लागते. स्रोतसे रिकामी विकसित असतात. विशुद्घ ढेकर येतात. हृ दय विशुद्घ असते. वात, मूत्र व मल यांचे विसर्जन केल्यावर वात आपल्या मार्गाने संचार करीत असतो तेव्हा भोजन सर्व शरीरधातूंना दूषित न करता आयुष्यच वाढविते. मात्र अजीर्णावर जेवले तर पहिल्या अन्नाचा योग्य रस बनण्यापूर्वीच नंतरच्या आहाराचा रस त्यांत मिसळतो. त्यामुळे दोघांचे पचन नीट न झाल्यामुळे ताबडतोब दोष उत्पन्न होतात. विरुद्घ नसलेल्या वीर्याचा आहार घ्यावा म्हणजे विशुद्घ वीर्याच्या आहाराचे विकार उत्पन्न होत नाहीत.
अनुकूल व प्रसन्न जागेत तसेच सर्व अनुकूल साधनसामग्री घेऊन जेवावे. त्याने मन प्रसन्न राहते. मनावर आघात होत नाहीत. घाईने जेवू नये जेवल्यास अन्न नाकात म्हणजे श्वसनमार्गात वर-खाली असे जाते व ठसका लागतो. नीट न चावल्याने, लाळ न मिसळल्याने व तोंडातल्या बोधक कफाग्नीचे कार्य नीट न झाल्याने आमाशयात अन्न व्यवस्थित असू शकत नाही. जेवणातले केस इ. दोष लक्षात येतील किंवा चव लागेल असे नाही. अती दिरंगाईने जेवण करू नये, तसे केल्यास तृप्ती होत नाही. पुष्कळ खाल्ले जाते आहार थंड होतो व विषम पचतो. न बोलता न हसता जेवावे. तसे न जेवल्यास व भरभर जेवल्याने अनिष्ट परिणाम होतात. आपला विचार करून जेवावे. हे मला प्रकृतीला साधक की बाधक, आत्मसात होते की नाही, या अनुभवाप्रमाणे आहार्य पदार्थ जेवावेत.
आतापर्यंत सांगितलेल्या असात्म्यांपैकी काही सतत व क्रमाने वाढवून सेवन केले असता काही आत्मसात तर काही सवयीचे होतात परंतु त्यांतील काही असे असतात की, त्यांना शरीर केव्हाही आत्मसात करु शकत नाही. त्यांपासून दोष प्रकोप होतोच. त्या आत्मसात होऊ न शकणाऱ्या पदार्थांना असात्म्य असे म्हणतात. (१) शीघ्र, (२) अशीघ्र व (३) अनभ्यस्त हे असात्म्याचे प्रकार आहेत. जो पदार्थ सेवन करताच विष नसतानाही विषासारखा शीघ्र विकार करतो, तो शीघ्र असात्म्य होय. जो काही कालानंतर विकार करतो तो अशीघ्र असात्म्य होय. अनभ्यस्त असात्म्यात जो पदार्थ केव्हाही आहारविहारात आलाच नाही तो प्रथम सेवनापूर्वी असात्म्य असतो. अनभ्यस्त असात्म्य प्रकृतिगुण विपरीत असेल, तर तो सात्म्य होण्याचा पुष्कळ संभव असतो मात्र जर तो प्रकृतिगुणसम असेल, तर तो सात्म्य होणे कठीण असते.
इंद्रियार्थ सात्म्यासात्म्यामध्ये श्रोत्रादी पंचेंद्रियांशी, त्यांच्या शब्दादी अर्थांचा हीन मिथ्या व अतियोग हे असात्म्य होत. या असात्म्याने इंद्रियांचे रोग होतात, त्यांना ऐंद्रियक व्याधी म्हणतात. शब्दादी अर्थांचा श्रोत्रादी इंद्रियाशी होणारा समयोग हे सात्म्य होय. हे आरोग्यकारक असते.
मन बुद्धयादिकांच्या सात्म्यासात्म्यात मनाचे जे चिंत्यादी विषय त्यांचेही मनाशी व मनोबुद्घीशी समयोग यांचे आरोग्य आणि हीनयोग, मिथ्यायोग व अतियोग हे रोग उत्पन्न करतात, हे मनोरोग व बुद्घिरोग होत. [→ स्वस्थवृत्त].
निदानार्थ सात्म्यासात्म्यामध्ये रोगाचे ज्ञान होण्याकरिता जे निदानादी पाच उपाय आहेत, त्यांत रोगाचे सात्म्यासात्म्य पाहणे हा एक उपाय आहे. जो रोग निदानादी इतर चार साधनांनी वाढतो, तो गृहीत धरुन त्या रोगाच्या नाशक द्रव्याचा उपयोग करावा व परिणाम पहावा. ते द्रव सात्म्य झाले, तर तो रोग व असात्म्य झाले तर अन्य रोग समजावा. या रोगसात्म्याला उपशय व असात्म्याला व्याध्यसात्म्य किंवा अनुपशय म्हणतात. (१) हेतुविपरीत, (२) व्याधिविपरीत, (३) हेतुव्याधिविपरीत, (४) हेतुविपर्यस्तार्थकारी, (५) व्याधिविपर्यस्तार्थकारी व (६) हेतुव्याधिविपर्यस्तार्थकारी असे सहा प्रकारचे सात्म्यासात्म्य आहेत. व्याधिसात्म्य म्हणजे गुल्मी रोग्याला दूध, उदावर्तीला तूप व प्रमेही रोग्याला मध सात्म्य होत असतो. सर्व सफल चिकित्सा ही सात्म्य होय व असफल चिकित्सा ही असात्म्य होय.
सारांश कालार्थकर्म यांचा समयोग हा सात्म्य व हीनमिथ्याप्रतियोग असात्म्य होय. समयोग आरोग्यद व हीनादी योग अनारोग्यद होत. व्याधिसात्म्य व द्रव्यसात्म्यात आरोग्यावस्थेत नित्य सात्म्यसेवन आरोग्य राखते, अनभ्यस्त द्रव्य अभ्यासाने अल्प प्रमाणात घेऊन क्रमाने अल्प प्रमाणात वाढवीत सेवन केले, तर ते सात्म्य होते. हा नियम आहार व औषध या दोहोंच्या बाबतीत पाळावा लागतो.
रोगावस्थेत सात्म्य आहारच द्यावा लागतो. तोही अग्नीला अनुसरुन अल्प प्रमाणात पेयादी स्वरुपात प्रथम देऊन वाढवीत न्यावा लागतो. लंघनादी उपक्र मात तर असेच करावे लागते. अन्यथा सात्म्य आहार मात्रेनेही असात्म्य होतो म्हणजे व्याधिसात्म्य आरोग्यरुपी होणार नाही. रोगात द्यावयाची औषधे बहुधा नित्य सेवनात येत नाहीत. तेव्हा त्यांचेही सात्म्य होत रोग नाश व्याधिसात्म्य होणे जरुर असते. ज्वरामध्ये व लंघनात औषधी पाणीच द्यावयाचे असते. त्यात औषधाचे प्रमाण अत्यल्प असते. नंतर पेज इ. तयार करताना औषधे घालावयाची असतात. त्यात औषधाचे प्रमाण वाढते. रोगी घन-अन्नावर आल्यावर काढे देण्यास सांगितले आहे. अन्न व औषधे यांचे प्रमाण क्रमाने वाढविण्याच्या प्रकियेने व औषधांचे सात्म्य होऊन व्याधीचा उपशय होणे चांगले.
दीर्घकालीन ज्वर, प्लीहोदर इ. विकारांत वर्धामान पिंपळीचा प्रयोग व इतर प्रयोग याच हेतूने सांगितले आहेत. शरीर औषधाला आत्मसात करून रोगनाश करते तेव्हा ते आरोग्य टिकते. जर औषध आत्मसात न होता औषधाच्या जोरावर रोगनाश केला, तर शरीरातील असात्म्य औषधी घटकांपासून अन्य रोगोत्पत्ती होते. हे रोग असात्म्यज होत.
एक रोग नष्ट करून अन्य रोगोत्पत्ती करणारी चिकित्सा विशुद्घ नाही. अन्य रोगोत्पत्ती न करता रोगनाश करणारी चिकित्सा विशुद्घ होय. औषधाचे महत्त्व एवढेच की, शरीराचा जाणारा तोल सावरण्याला ते मदत करते. रोग शरीरानेच नाहीसा करावयाचा असतो, औषधाने नाही. सात्म्य पदार्थ एकदम सोडले तर शरीराला स्वास्थ्य रक्षणार्थ पोषणाचे सुरळीत चाललेले कार्य एकदम बंद पडते आवश्यक घटक मिळत नाही म्हणूनही रोग होतात, यांनाही असात्म्यज व्याधी म्हणतात.
ऋतू संधीच्या वेळी पूर्व ऋतुचर्या एकदम सोडून उत्तर ऋतुचर्या एकदम सुरु केली, तर यात दोन तऱ्हेने असात्म्य होते. टाकलेले व स्वीकारलेले दोन्ही आहार-विहार ऋतुसात्म्य होत. परंतु ते क्रमाने सोडून क्रमाने स्वीकारले नाहीत, तर दोन्ही तऱ्हेने असात्म्य होते व रोग होतात.
जे आहार-विहार प्रकृतीला न मानवणारे आहेत, त्यांच्या सेवनाची वाईट खोड लागलेली असते. ती जरी सोडायची असेल, तरी ती एकदम सोडता येत नाही, खोड लागलेला आहार-विहार सवयीचा असतो. शरीराने तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करून त्यात काहीही यश मिळविले असो परंतु त्याचा एकदम त्याग केल्याने शरीरव्यवस्थेत बिघाड होतो. प्रतिकूल आहाराचे पृथःकरण करून थोड्या प्रतिकूल घटकांना अनुकूल स्वरुप देऊन पोषणाचे काम केले जात असते, ते एकदम बंद पडते व नव्या हितकर ठरणाऱ्या द्रव्यांचे पचन करण्याची सवय नसते. त्याचा अग्नी तयार नसतो, त्यामुळे त्याचेही सम्यक् पचन होत नाही. त्यामुळे धातूंना अवलंब येतो. म्हणून त्यांना असात्म्यज विकार होतात. त्यामुळे अहितकर सवयीचे आहार-विहार एकदम सोडू नयेत व हितकर एकदम सेवन करू नयेत.
अहितकरांचा त्याग व हितकरांचे सेवन यांचे पुढील दोन नियम आहेत : (१) एक चतुर्थांश किंवा एक षोडशांश प्रमाणात अहितकर अन्नपान, झोप, जागरण इत्यादींचा त्याग करावा, म्हणजे रोग होणार नाहीत. जितका अपथ्याचा भाग कमी करावा तितकाच त्याच्याऐवजी पथ्याचा भाग घ्यावा. (२) काल : पहिल्या जेवणाच्या वेळी १/४ अपथ्य कमी करून १/४ पथ्याचे घ्यावे, नंतर दुसरे जेवण पुन्हा पहिलेच (अपथ्य पूर्ण) घ्यावे, तिसऱ्या जेवणात अपथ्य १/२ व पथ्य १/२ घ्यावे. चवथे व पाचवे जेवण पुन्हा पहिलेच घ्यावे. सहाव्या जेवणात ३/४ अपथ्य सोडून ३/४ पथ्य घ्यावे. सातव्या, आठव्या व नवव्या जेवणात पुन्हा पहिलेच घ्यावे. दहाव्या जेवणात सर्व पथ्याचेच घ्यावे. हा क्र म मानवणार नाही, त्यांना १/१६ भागाचा त्याग व सेवनाने पूर्ण पथ्य घ्यावे.
पहा: आतुर निदान उपशय.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
“