साती ग्रंथ : महानुभाव पंथीयांच्या सात महत्त्वपूर्ण पद्यग्रंथांचा समूह ‘साती ग्रंथ’ म्हणून ओळखला जातो. हे सारे ग्रंथ ओवीबद्घ आहेत. ह्या साती ग्रंथांत पुढील ग्रंथांचा अंतर्भाव होतो : (१) ⇨नरेंद्र कृत रुक्मिणीस्वयंवर (१२९२), (२) व (३) ⇨भास्करभट्ट बोरीकररचत शिशुपालवध (१३१२) आणि उद्घवगीता (१३१३), (४) ⇨दामोदर पंडितांचा वछाहरण (सु.१३१६), (५) रवळोबास किंवा रवळो व्यासांचे (चौदाव्या शतकाचा उत्तरार्ध) सैह्याद्रिवर्णन (१३५३), (६) पंडित विश्वनाथ बाळापूरकरांचा, म्हणजेच विश्वनाथ बासांचा ज्ञानप्रबोध (१२०० ओव्या, सु. १४१३ वा १४१८) आणि (७) पंडित नारायण व्यास बहाळिये (नारो किंवा नारायण बहाळिये) ह्यांचे ऋद्घिपूरवर्णन (सु. १४१३ वा १४१८).
नरेंद्रांच्या रुक्मिणीस्वयंवरास साती ग्रंथांत आद्यस्थान देण्यात आलेले आहे. उत्कट कृष्णभक्तीतून लिहिलेले हे काव्य मराठीतील पहिले शृंगारपर व आख्यानक काव्य म्हणता येईल. ते लिहिताना संस्कृत महाकाव्यांचा आदर्श नरेंद्रांच्या समोर होता, असेही जाणवते. भास्करभट्ट बोरीकरांच्या शिशुपालवधाचा विषय वीररसानुकूल असला, तरी त्यात वीररसापेक्षा शृंगाररसाला अधिक महत्त्व मिळाल्याचे दिसून येते. त्यांची उद्घवगीता ही भागवताच्या एकादशस्कंधावरील पहिली मराठी टीका होय. दामोदर पंडितांचे वछाहरण भागवताच्या दशमस्कंधातील वत्सहरणाच्या प्रसंगावर आधारलेले आहे. रवळो व्यासांचे सैह्याद्रिवर्णन हे सैहाद्रवर्णन आणि सैह्याद्रिमाहात्म्य ह्या नावांनीही ओळखले जाते. ५१७ ओव्यांच्या ह्या काव्यात सह्याद्रिनिवासी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन, तसेच श्री चकधर प्रभूंचे चरित्रही आहे. मूळ काव्याचा हेतू ‘बोलैन श्री दत्ताची चरित्रे’ असा आहे, दत्तचरित्राच्या वाट्याला १८१ ओव्या दिल्या असून उर्वरित भाग श्रीचकधरांचे अवतार कार्य व त्याच्या अनुषंगाने कवीचे आत्मनिवेदन यांनी व्यापला आहे. ह्या काव्यातून वर्णिलेले श्रीदत्तात्रय एकमुखी आहेत. तसेच येथे सह्याद्री म्हणजे माहूरचा (मातापूरचा) डोंगर आहे. ह्या डोंगराला एके काळी सह्य असे नाव होते. कवीच्या उत्कट भक्तिभावनेची प्रचिती ह्या काव्यातून येते. विश्वनाथ बासांच्या ज्ञानप्रबोधा त महानुभाव तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन आहे. त्यांचे उद्दिष्ट श्रीचकधरोक्त मोक्षमार्गाचे निरू पण करणे, हे असून ज्ञान हा या मोक्षमंदिराचा पाया, वैराग्य हा त्यावर बांधलेला प्रासाद आणि भक्ती हा त्यावरील कळस होय, अशी कवीची भूमिका आहे. त्यात सांगितलेली ज्ञानलक्षणे गीते च्या तेराव्या अध्यायातील ७ ते ११ ह्या पाच श्लोकांच्या आधारे सांगितलेली आहेत. तसेच अज्ञानलक्षणेही ‘अज्ञानं यदतोऽत्यथा’ या गीतावचनाला (१३.११) अनुसरू नच यात आली आहेत. त्यामुळेच ज्ञानप्रबोध ही गीतेवरील टीका होय, असा समज रू ढ झाला असावा. तथापि ज्ञानप्रबोधा चा गीताश्रित भाग (ओ. ६१ ते २१५) ज्ञानेश्वरी चीही पदोपदी आठवण करून देतो. विश्वनाथ बासांकडे काव्यदृष्टीही असल्यामुळे ह्या ग्रंथाला काव्यसौंदर्यही लाभले आहे. पंडित नारायण व्यास बहाळिये ह्यांच्या ऋद्घिपूरवर्णन (ओव्या ६४१) या ग्रंथात महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी एक असलेले श्रीगोविंदप्रभू [⟶ गोविंदप्रभू] ह्यांचे अवतारकार्य जेथे झाले, त्या ऋद्घिपुराचे वा रिधपुराचे अत्यंत सहृदयतेने आणि भक्तिभावाने वर्णन केले आहे. ऋद्घिपूर हे महानुभावीयांचे पवित्र क्षेत्र असल्यामुळे त्या विषयावर दहा-बारा लहानमोठे ग्रंथ निर्माण झाले तथापि त्यांतही ऋद्घिपूरवर्णन हे काव्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय या काव्याचा आणखी एक विशेष म्हणजे त्याच्या सर्वांगातून खेळविलेले श्रीप्रभुचरित्र होय. ही दोन इतकी एकरूप आहेत की, ती एकमेकांपासून वेगळी करताच येत नाहीत. कविमनात वसत असलेल्या या ऐक्यभावाचा आविष्कार सर्व काव्यभर झालेला दिसून येतो. या काव्याचा अंतर्भाव साती ग्रंथांत करून महानुभाव पंथाने त्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
हे साती ग्रंथ सु.सव्वाशे वर्षांच्या कालावधीत तयार झाले आहेत. ह्या सात ग्रंथांचा एक समूह मानताना विशेष असे कोणतेही निकष लावलेले दिसत नाहीत तथापि एक विशेष लक्षवेधी बाब म्हणजे नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवरा ची भाषा आणि त्यानंतर शंभरांहून अधिक वर्षांनी लिहिलेल्या ज्ञानप्रबोध व ऋद्घिपूरवर्णन ह्या ग्रंथांची भाषा या दोहींत भाषाशास्त्रदृष्ट्या साधर्म्य आहे. तसेच महानुभाव होण्यापूर्वीचे नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर सोडले, तर पंथनिष्ठा आणि चक्र धरभक्ती ह्यांच्या पक्क्या धाग्यांनी त्यांना जोडलेले आहे.
पहा : मराठी साहित्य (प्राचीन मराठी साहित्य) महानुभाव पंथ व साहित्य.
संदर्भ : १. तुळपुळे, शं. गो. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९८४.
२. देशपांडे, अ. ना. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भाग १, पूर्वार्ध, पुणे, १९६६.
कुलकर्णी, अ. र.