सातारा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यातील एक संस्थान. त्यात तासगाव सोडून १८८५ मध्ये अस्तित्वात असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रदेशाचा अंतर्भाव होता. शिवाय सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील उपविभाग आणि विजापूर शहरासह त्या जिल्ह्याचा काही भाग त्यात अंतर्भूत होता. दक्षिणेस कृष्णा-वारणा आणि उत्तरेस नीरा-भीमा या नद्या, पश्चिमेस सह्याद्री घाट आणि पूर्वेस पंढरपूर व विजापूर यांनी सीमित हे संस्थान होते. संस्थानचे क्षेत्रफळ सु. ८,४१० चौ. किमी. असून लोकसंख्या १,६२,००० (१८२१) होती आणि उत्पन्न सु. तीन लाख सालिना तनखारूपाने ठरविण्यात येऊन वार्षिक सु. १५ लाखांचा प्रदेश संस्थानाधिपतीस देण्यात आला (१८२१).
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला. याकामी त्यांना ⇨बाळाजी विश्वनाथ, ⇨पहिला बाजीराव व ⇨बाळाजी बाजीराव हे कर्तबगार पेशवे आणि ⇨कान्होजी आंग्रे, ⇨रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यद हुसेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रूवारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. कोल्हापूर–सातारा अशी मराठी राज्याची दोन स्वतंत्र संस्थाने (छत्रपतींच्या गाद्या) उभयता मान्य करण्यात आली तथापि कोल्हापूर व सातारा यांत आपापसांत पुढे अनेक वर्षे संघर्ष चालू होता. शाहूंना पुत्रसंतती नव्हती म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा यांना दत्तक घेण्याचे ठरविले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभार-विषयक सर्व अधिकार आज्ञापत्राद्वारे पेशवे बाळाजी बाजीराव यांना दिले. शाहूंच्या निधनानंतर (१७४९) रामराजे (कार. १७४९–७७) विधिवत सातारच्या गादीवर आले पेशवे व रामराजे यांत २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावांनी त्यांना सालिना ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली. रामराजे पेशव्यांच्या कच्छपि जात आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून रामराजांना कैद केली (१७५५), तेव्हा बाळाजी बाजीरावांनी ताराबाईंशी समझोता केला, त्यामुळे प्रत्यक्षात ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्या आणि रामराजांना फारसे अधिकार उरले नाहीत. पुढे ताराबाईंच्या मृत्यूनंतर (१७६१) जवळपासचा थोडाबहुत प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच मर्यादित अधिकार छत्रपतींना राहिला होता. तत्पूर्वीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे होऊन प्रायः पेशवे मराठी राज्याचे सूत्रधार-सर्वेसर्वा झाले.
रामराजांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना संतती नसल्यामुळे सखाराम बापू बोकील व नाना फडणीस यांनी वावी येथील विठोजी भोसले यांच्या शाखेतील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी यांस १५ सप्टेंबर १७७७ रोजी विधिपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नाव धाकटे शाहूराजे ठेवले. रामराजे ९ डिसेंबर १७७७ रोजी मरण पावले. त्यानंतर ११ डिसेंबर १७७८ रोजी शाहूंना राज्याभिषेक झाला. त्यास परशुराम व चतुरसिंग हे दोन भाऊ होते. राज्याभिषेकानंतर वडील त्र्यंबकजी व चतुरसिंग सातारच्या किल्ल्यात राहण्यास आले परंतु बंधू परशुराम हे मात्र वावी येथेच राहत असत. सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळी (१७७४–९५) सर्व ठीक चालले, पण त्यांच्या मृत्यूनंतर शाहूंची स्थिती सर्व दृष्टींनी नाजूक झाली. चतुरसिंग यांना छत्रपतींचा बंदिवास व अपमानकारक प्रसंग सहन न होऊन पेशव्यांविरुद्घ बंड करण्यास ते उद्युक्त झाले. ते धाडसी, पराक्रमी व हुशार होते. त्यांनी छत्रपतींचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मराठे सरदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि कोल्हापूरच्या संस्थानिकांच्या सहकार्याने उठाव केला (१८०९). तो रास्ते व परशुरामभाऊ पटवर्धनांनी साताऱ्यावर आक्रमण करून मोडून काढला. दुसऱ्या बाजीरावाने त्यांना कैद करून रायगडजवळच्या कांगोरी किल्ल्यात ठेवले. तिथेच त्यांचे १५ ऑगस्ट १८१८ रोजी निधन झाले. शाहू छत्रपतींना चार राण्या होत्या. त्यांपैकी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब या कर्तबगार, बुद्घिमान व व्यवहारदक्ष होत्या. त्या घोड्यावर बसण्यात पटाईत होत्या. त्यांच्या पोटी शाहूंना प्रतापसिंह ऊर्फ बुवासाहेब, रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब व शहाजी ऊर्फ आप्पासाहेब हे तीन मुलगे झाले. दुसरे शाहू ४ मे १८०८ मध्ये निवर्तले. त्यानंतर प्रतापसिंह (कार. १८०८–३९) हे अल्पवयीन चिरंजीव सातारच्या गादीवर विराजमान झाले.
दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी वैर येताच प्रतापसिंहांना नजरकैदेत ठेवले. त्यांनी इंग्रजांशी गुप्तपणे संधान बांधून सुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाजीरावाने काही लढायांत त्यांना सोबत घेतले. अखेर इंग्रजांच्या हाती प्रतापसिंह लागले (१० फेब्रुवारी १८१८). इंग्रजांनी पेशवाई नष्ट करून बाजीरावास उत्तरेस बह्मवर्तास पाठविले आणि सातारच्या गादीवर पुन्हा प्रतापसिंहास बसविले (१८१८). पुढे त्यांच्याशी १८१९ मध्ये एक तह करून त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हक्कांत काटछाट केली. एक मांडलिक संस्थान एवढा दर्जा ठेवून संस्थानास सैन्य वाढविणे, इतरांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे वगैरेंवर निर्बंध घातले. राज्यकारभार व व्यवस्था पाहण्यासाठी मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन याने ब्रिटिश रेसिडेंट (प्रशासक) दरबारी ठेवला. पहिला रेसिडेंट म्हणून ग्रँट डफ याने महाराजांस राज्यकारभारचे प्रशिक्षण दिले आणि उत्तेजनही दिले. त्यामुळे प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. राजवाडा, जलमंदिर यांसारख्या वास्तू बांधल्या, शिक्षणासाठी पाठशाळा काढल्या. इंग्रजी अध्ययनाची सोय केली. छापखाना काढून ग्रंथ छापविले आणि गावाला पाणी पुरविणारी योजना कार्यान्वित केली, तेव्हा ग्रँट डफने त्यांच्याविषयी कंपनीकडे शिफारस केली आणि ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या अधिकारांत काही प्रमाणात वाढ केली. डफने या काळात (१८१८–२२) ऐतिहासिक साधनसामग्री जमवून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची गव्हर्नरची मुदत संपली आणि डफही इंग्लंडला गेला, तेव्हा प्रतापसिंहांचे मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५–३८) आणि नंतरचे रेसिडेंट बिग्ज, रॉबर्टसन, लॉडविक यांच्याशी जमेना. लॉडविकने राजा इंग्रजांविरुद्घ कारस्थान करतो, म्हणून चौकशी समिती नेली तर ओव्हान्स या रेसिडेंटने गोवा– नागपूरशी संगनमत करून प्रतापसिंह कट करीत असल्याचा खोटा आरोप केला. यावेळी प्रतापसिंहांनी जहागीरदारीवरील अधिकार सोडून देण्याच्या इंग्रजांच्या सूचनेचा आव्हेर केला, तेव्हा ४ सप्टेंबर १८३९ मध्ये त्यांना पदच्युत करून सहकुटुंब बनारसला पाठविले. तिथेच कैदेत ते १८४७ मध्ये वारले. तत्पूर्वी त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब ऊर्फ शहाजी (कार. १८३९–४८) यास इंग्रजांनी गादीवर बसविले. त्यांच्या बरोबर नवीन तह केला आणि पूर्वीच्या तहात (२५ सप्टेंबर १८१९) ठरलेली जी कलमे ब्रिटिशांना जाचक वाटत होती, ती दुरुस्त करण्यात आली. सातारच्या छत्रपतींकडे असलेल्या सहा जहागिरदारींवरील ताबा नवीन तहाद्वारे इंग्रजांनी स्वतःकडे घेतला. प्रतापसिंहांनी रंगो बापूजी, ॲडव्होकेट जॉर्ज टॉम्पसन व ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक यांमार्फत आपली बाजू ग्रे ट ब्रिटनमध्ये मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
शहाजी ऊर्फ आप्पासाहेब यांनी जहागिरीवरील सर्व हक्क सोडले. त्यांनी शाळा, दवाखाने, सार्वजनिक बांधकामे करून जकातीची पुनर्रचना केली. सती व गुलामगिरीसारख्या अनिष्ट प्रथा बंद केल्या. पुणे-बेळगाव रस्ता सुधारून पाणी पुरवठा वगैरे सामाजिक कामावर सु. ११ लाख खर्च केले. चांगला शासक म्हणून इंग्रजांनी त्यांची प्रशंसा केली. त्यांच्या मृत्यूनंतर भोसले घराण्यास औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी प्रतापसिंह व शहाजी यांच्या दत्तकाला नामंजुरी देऊन १८४९ मध्ये सातारा संस्थान खालसा केले.
पहा : भोसले घराणे भोसले, प्रतापसिंह शाहू, छत्रपति (सातारा).
संदर्भ : 1. Basu, B. D. Story of Satara, Bombay, 1963.
2. Parasnis, D. B. Notes on Satara, Bombay, 1919.
३.सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, खंड ३ व ८, पुणे, १९८९ व १९९२.
कुलकर्णी, ना. ह.
“