साठमारी : देशी मर्दानी खेळाचा एक प्रकार. माजलेल्या हत्तीला रंगणामध्ये मोकळा सोडून त्याला डिवचण्याचा वा चिडविण्याचा एक खेळ. मस्तवाल हत्तीशी झुंज देण्याचा हा साहसी खेळ आहे. या खेळात हत्तीशी झुंजणारा जो मल्ल वा खेळाडू असतो, त्याला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्या असे म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भूतपूर्व कोल्हापूर व बडोदे संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता आणि पाहुण्यांसाठी –विशेषतः इंग्रज गव्हर्नर वगैरेंसाठी–तो खास प्रदर्शित केला जाई. ह्या खेळातच डागदारी, हत्तींच्या टकरा इ. प्रकारांचाही समावेश केला जातो. हत्तीशी साठमाराची झुंज लावणे, हा प्राचीन व मध्ययुगीन काळातील राजेरजवाड्यांचा एक करमणुकीचा खेळ होता. त्यासाठी भारी खुराक देऊन हत्ती तयार करीत व साठमारीच्या खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व ‘माजूम’ (साखर, बदाम, पिस्ते इ. घालून बनविलेल्या भांगेच्या वड्या) खायला घालून बेफाम करीत. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. ⇨छत्रपती शाहू महाराजांनी मस्तवाल हत्तीला खेळविणारी माणसे खास प्रशिक्षण देऊन तयार केली होती. हे मल्ल हत्तीचा मोहरा चुकवून कधी कधी त्याच्या पोटाखाली शिरत व त्याला जोरदार गुद्दे मारून हैराण करीत.
हत्तीच्या झुंजीसाठी पूर्वी खास मैदान तयार करीत असत, त्याला ‘अग्गड’ अशी संज्ञा होती. त्याला साठमारीचा आखाडाही म्हणत. अशा प्रकारचे अग्गड बडोदे येथे असून साठमारीचे आखाडे कोल्हापूरमध्ये व कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे छ. शाहू महाराजांनी बांधून घेतले होते. बडोदे येथील अग्गड सु. ३५० फुट (सु. १०६·६८ मी.) लांब व सु. २२० फुट (६७ मी.) रुंद अशा विस्तीर्ण जागेत असून त्याच्या मैदानाभोवती चारी बाजूंना २५ फुट (७·६२ मी.) उंचीचा तट बांधलेला होता व त्यात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली होती. मस्त हत्तीस अग्गडात आणण्यासाठी उत्तर-दक्षिणेस दोन मोठे दरवाजे ठेवलेले होते. हत्ती आत येताच भिंतीत बसविलेले वजनदार अडसर सरकवून ते बंद करीत. याशिवाय तटाच्या भिंतीत काही ठराविक अंतरा-अंतरांवर एकेकटा मनुष्य आत-बाहेर ये-जा करू शकेल अशी लहान दारे [ ७ फुट (२·१३ मी.) उंचीच्या कमानी] ठेवलेली आहेत. मैदानाच्या मध्यभागी एक गोलाकार पण आतून मोकळा असा ४० फुट (१२·१९ मी.) व्यासाचा लहान बुरुज केलेला असून, त्याच्या आत जाण्यासाठी लहान कमानी दरवाजे ठेवलेले आहेत. मस्त हत्ती साठमाराच्या अगदी जवळ आल्यास बचावाचा आपत्कालीन मार्ग म्हणून साठमार त्या कमानीतून बुरुजात शिरतात व दुसऱ्या बाजूने बाहेर पडून स्वतःचा बचाव करतात. तसेच अग्गडाच्या एका बाजूस ३५ फुट (१०·६६ मी.) व्यासाचा गोल कट्टा केलेला असून त्याच्याभोवती गोल फिरण्यानेही हत्तीपुढे पळणाऱ्या साठमाराचा बचाव होऊ शकतो कारण हत्ती समोर व सरळ रेषेत वेगाने धावू शकतो तथापि त्याच्या बोजड शरीरामुळे तो वक्र गोलाकार रेषेत धावू शकत नाही. ह्याचा फायदा साठमाराला वाकडेतिकडे धावून घेता येतो. खंडेराव महाराज गायकवाड यांनी बडोदे येथे या खेळांसाठी खास अग्गड बांधवून घेतले होते व सयाजीराव गायकवाडांनी सभोवतीच्या भिंतीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधली होती. खंडेराव महाराजांच्या काळी बडोदे संस्थानात मस्तवाल व दंगेखोर हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वीस-वीस माणसांचे तीन बेडे (गट) ठेवले होते. हे तीन बेडे मिळून माणसांची व त्यांच्या हत्यारांची संख्या साठ होत असल्याने त्यांच्यापैकी प्रत्येक माणसास ‘साठमार’ असे नाव पडले. हे साठमार अग्गडात मोकळ्या सोडलेल्या मस्तवाल हत्तीपुढे धावून जो खेळ करून दाखवत, त्यास साठमारी असे नाव प्रथमतः देण्यात आले. पुढे हत्तींच्या टकरा, डागदारी इ. प्रकारांचाही या खेळात समावेश करण्यात आला. साठमारीच्या खेळात मस्तवाल व बेफाम हत्तीला आटोक्यात आणण्यासाठी भाले, चिमटे, आकड्या, पोच्या, बेड्या इ. हत्यारांची मदत घेतली जात असे.
कोल्हापुरातील खासबागेनजीकच्या साठमारीचा आखाडा औरसचौरस असून २०० फुट (६०·९६ मी.) लांब व २०० फुट (६०·९६ मी.) रुंद असा आहे. सामान्यतः साठमारीचा आखाडा वर्तुळाकार असतो व त्याचा व्यास २०० फुट (६०·९६ मी.) असतो. त्याच्या सभोवती १५ फुट (४·५७ मी.) उंचीचा भक्कम दगडी कोट बांधलेला असतो. जुन्या वाड्यात ज्याप्रमाणे भिंतीतून जिने असतात, त्याप्रमाणे तटबंदीच्या ठराविक अंतरावर एक माणूस शिरेल एवढीच दिंडी व आतून कोटावर जाता येईल, असा कोटाच्या भिंतीतून जिना ठेवलेला असतो. ६०·९६ मी. व्यासाचा जो आखाडा तयार होतो, त्यास खेळाचे ‘रंगण’ म्हणतात. या रंगणामध्ये पोकळ व बळकट असे गोल बुरुज बांधलेले असतात. त्या बुरुजाला आरपार जाणाऱ्या दिंड्या असतात. या खेळाचे सर्वसाधारण स्वरूप असे : मस्त हत्तीस अग्गडात एका कमानीजवळ आणून उभे करतात. नंतर जवळच्या कमानीत उभे राहून एक-दोन साठमार हत्तीच्या मागच्या पायात बांधलेले साखळदंड सोडतात. त्याचवेळी हत्तीच्या पुढच्या एका पायात असलेली काट्यांची पोची साठमार आकडीने काढतात. बिगुलाचा इशारा होताच हत्तीस मोकळे सोडण्यात येते. नंतर आजूबाजूस उभ्या असलेल्या साठमारांपैकी एकजण हत्तीच्या पुढे जातो व आपल्या जवळचा भाला अगर डोक्यावरचा रंगीत फेटा सोडून हत्तीपुढे नाचवून त्याला डिवचतो. चिडलेला हत्ती त्या साठमारामागे धावू लागताच, दुसरा साठमार त्याला दुसरीकडून चिडवून आपल्या अंगावर घेतो. इतक्यात तिसरा साठमार हत्तीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत त्याला आपल्यामागे धावण्यास भाग पाडतो. हत्तीला चिडवून आपल्या अंगावर घेणे व त्याला हुलकावण्या देऊन पळावयास लावणे, ह्यात साठमाराचे साहस, कौशल्य व चपळपणा पणास लागतो. हत्तीही चिडून चिडविणाऱ्याच्या मागे सैरावैरा धावू लागतो. याप्रमाणे हत्तीला सर्व मैदानभर पळावयास लावून खेळवितात.
अशा रीतीने साठमारीचा हा खेळ बराच वेळ अग्गडभर अनेक साठमारांकडून खेळविण्यात येतो. हत्ती जरी स्थूल व अवाढव्य प्राणी असला, तरी त्याची सरळ दौड मनुष्यापेक्षा जास्त वेगवान असते. म्हणून हे साठमार त्याला एकाच माणसाच्या मागे एकसारखे धावू देत नाहीत. त्याच्या बचावासाठी दुसरा साठमार हत्तीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊन त्याला आपल्या अंगावर घेतो. अशा संकटप्रसंगी कित्येकदा साठमारास आपला भाला व फेटा जागच्या जागीच टाकून पलायन करावे लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागतो तर काही प्रसंगी अग्गडात दारुचे बाण सोडून व त्याच्या धुराच्या साहाय्याने हत्तीस घाबरवून साठमारास वाचवावे लागते. एखाद्या साठमाराच्या अगदी जीवावरच बेतल्यास हत्तीच्या मागच्या पायांत चिमटे टाकून त्याला जेरबंद करतात व खेळ थांबवितात. हत्तीच्या पायांत चिमटे टाकण्याचे कामही अतिशय जोखमीचे असते. कारण बिथरलेला हत्ती अचानक मागे वळून चिमटे टाकणाऱ्या साठमारावरही हल्ला चढविण्याचा संभव असतो. बडोदे व कोल्हापूर येथील साठमारीमध्ये मैदानपरत्वे थोडा फरक आढळतो कारण कोल्हापूरच्या साठमारीत मैदानाऐवजी बरेच बुरुज आहेत.
डागदारी : घोड्यावर बसून मस्त हत्तीस खेळविणाऱ्या घोडे स्वारास ‘डागदार’ व या खेळाच्या प्रकारास ‘डागदारी’ असे नाव आहे. त्यासाठी घोडे मुद्दाम शिकवून खास तयार करावे लागतात. हत्तीजवळ वारंवार नेऊन ह्या घोड्यांची हत्ती विषयीची भीती नाहीशी करावी लागते कारण हत्तीला बुजणारा घोडा या खेळात निरूपयोगी ठरतो. शिवाय डागदारीचा घोडा चांगला पाणीदार व चपळ असावा लागतो. त्याचप्रमाणे या घोड्यावर बसणारा स्वारही चांगला हिंमती आणि बळकट असावा लागतो. डागदार तयार होऊन अग्गडात आल्यानंतर मस्त हत्तीस मोकळा सोडतात. डागदार हत्तीला चिडविण्यासाठी त्याच्यासमोर जातो. तो जवळ येताच हत्तीही चिडून एकदम त्याच्या मागे धावतो. या प्रमाणे हत्तीची व घोड्याची शर्यत लागते. कित्येकदा तर घोड्याच्या अगदी शेपटीजवळच हत्तीची सोंड येऊन पोहोचते. आता घोडेस्वार हत्तीच्या सोंडेत सापडणार, तोच तो घोड्यास टाच देऊन हत्तीपासून लांब निसटून जातो. पाठलाग व हुलकावणी अशा प्रकारे हा खेळ बराच वेळ चालतो. डागदारी व साठमारी ह्या मर्दानी खेळांच्या दोन्ही प्रकारांत खेळाडूचे साहस, हिंमत, शक्ती, कौशल्य, चपळपणा इ. गुणांची चांगलीच कसोटी लागते. अशा प्रकारे हे साठमारी व डागदारी असे दोन्ही प्रकारचे मर्दानी खेळ अत्यंत प्रेक्षणीय व रोमहर्षक ठरले आहेत.
संदर्भ : १. मुजुमदार, द. चिं. संपा. व्यायामज्ञानकोश, दुसरा खंड, बडोदे, १९३७.
२. सूर्यवंशी, कृ. गो. राजर्षी शाहू : राजा व माणूस, पुणे, १९८४.
इनामदार, श्री. दे.
“