सांचेथ, ओस्कार आऱ्यास : (१३ सप्टेंबर १९४०–८ मे २०१०). लॅटिन अमेरिकेतील कोस्टा रीकाचे राष्ट्राध्यक्ष (१९८६–९०) आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी (१९८७). त्यांचा जन्म एरेद्या (सॅन होसेजवळ)या गावी सधन कुटुंबात झाला. वडिलांचे कॉफीचे मळे होते आणि ते प्रथमपासून सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. ओस्कार आऱ्यास यांचे सुरुवातीचे शिक्षण एरेद्या येथे झाले. पुढे त्यांनी कोस्टा रीका (सॅन होसे) या राष्ट्रीय विद्यापीठातून पदवी संपादन केली. त्यानंतर शासकीय अनुदान घेऊन ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (१९६३). तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एसेक्स विद्यापीठ येथे अध्ययन केले.‘हू रुल्स इन कोस्टा रीका’ या शीर्षकाचा प्रबंध सादर करून त्यांनी एसेक्स विद्यापीठाची पीएच्.डी.पदवी प्राप्त केली. पुढे हा प्रबंध पुस्तकरूपात प्रसिद्घ झाला (१९७०). इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांचा मार्गारिता या युवतीशी परिचय झाला. त्याची परिणती पुढे विवाहात झाली. त्यांना दोन मुले आहेत.

विद्यार्थिदशेतच सांचेथ विविध संघटनांत सक्रिय होते आणि त्या वेळीच ते सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. त्यांनी इंग्लंडहून मायदेशी परतल्यावर सेंटर लेफ्ट नॅशनल लिबरेशन पार्टी या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. तत्पूर्वी त्यांनी जॉन एफ्. केनेडी (कार. १९६०–६३) यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला होता. त्यांच्या ‘हू रुल्स इन कोस्टा रीका’ या प्रबंधात त्या वेळच्या कोस्टा रीकाच्या राजकीय परिवर्तनावर अभ्यासपूर्ण चर्चा होती, म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष योस फ्युबिरेस यांनी सांचेथ यांना आर्थिक मंडळात काम करण्यासाठी आमंत्रित केले (१९७०). पुढे ऑगस्ट १९७२ मध्ये त्यांची नियोजन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियोजन कार्य १९७५ मध्ये सुपूर्त करण्यात आले. दरम्यान नॅशनल लिबरेशन पक्षाचे सचिवपदही त्यांना देण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची १९७९ मध्ये पाच वर्षांकरिता नियुक्ती झाली. या पदावर पुन्हा १९८३ मध्ये त्यांची फेरनिवड झाली तथापि अध्यक्षीय निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी या पदाचा जानेवारी १९८६मध्ये राजीनामा दिला. कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत करिश्मा नसतानाही ते अहिंसात्मक शांततेच्या धोरणावर फेब्रुवारी १९८६ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.त्यांचा प्रथमपासून निकाराग्वाबरोबरच्या संघर्षास विरोध होता आणि कोस्टा रीकात शांतता नांदावी या मताचे ते होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तत्काळ मध्य अमेरिकेत निर्माण झालेली अशांतता अलिप्ततावादाची भूमिका अंगीकारून शमविण्याचे नियोजनपूवर्क प्रयत्न केले. यामुळे अमेरिका नाराज झाली कारण तिचे हितसंबंध त्यात गुंतले होते. त्याकडे दुर्लक्ष करून अमेरिकेतील कोस्टा रीका, ग्वातेमाला, निकाराग्वा, एल् साल्वादोर आणि हाँडुरस या पाच देशांत ७ ऑगस्ट १९८७ रोजी सांचेथ यांनी यादवी युद्घ समाप्त करण्यासाठी आपापसांत शांतता करार केला.त्यामुळे तीस वर्षे चाललेले प्रदीर्घ यादवी युद्घ संपुष्टात येऊन मध्य अमेरिकेत सामंजस्य व शांतता निर्माण झाली कारण या यादवी युद्घाने जवळजवळ दोन लाख नागरिकांचे बळी घेतले होते.या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार लाभला. साहजिकच त्यांच्या शांतताविषयक धोरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. त्यांनी नोबेलची सर्व रक्कम मध्य अमेरिकेत व जगात शांततेचा पुरस्कार करण्यासाठी वापरेन, असे अभिवचन दिले.या लहान देशाजवळ स्वतःचे लष्कर नाही, पण शांततामय सहजीवन तो व्यतीत करतो.त्यामुळेच त्यास ‘लोकशाहीचा स्वर्ग’ म्हणतात.

चौधरी, जयश्री