सांग्रामिकी : (मिलिटरी इन्कॅम्पमन्ट). लष्करी सैन्याची छावणी. ‘सांग्रामिकम्’ या पुल्लिंगी संस्कृत विशेषणाचे सांग्रामिकी हे स्त्रीलिंगी रूप होय (संस्कृत शब्दार्थ कौस्तुभ). त्याचा अर्थ युद्घविषयक वा युद्घासंबंधी असा आहे. शब्दस्तोत्रममहानिधि, शब्दकल्पद्रुम, गीर्वाणलघुकोश, संस्कृत शब्दार्थ कौस्तुभ आदी संस्कृत शब्दकोशांत लष्करी छावणी, सेनाध्यक्ष, संग्रामसंबंधी, संग्रामकुशल इ. भिन्न शब्दार्थ या संज्ञेविषयी आढळतात. ते सर्व लष्करी छावणीशी निगडित आहेत. प्राचीन संस्कृत वाङ्‌मयातूनही या संकल्पनेचे उल्लेख आढळतात. कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत, कामंदकीय नीतिसार आदी ग्रंथांतून सांग्रामिकम्, शिबि (वि) रम्, कटकम् या संज्ञा लष्करी सैनिकी छावणीसाठी वापरलेल्या आढळतात. शक्यतो जलाशयाच्या जवळ, शत्रूला सहजासहजी हल्ला करता येणार नाही, अशा दुर्गम भागात त्या वसविलेल्या असत. कौटिलीय अर्थशास्त्रा त या छावणीविषयी तपशीलवार माहिती ‘सांग्रामिकम्’ या शीर्षकार्थाच्या दहाव्या प्रकरणात आढळते. त्यात म्हटले आहे की, ‘स्थान (दीर्घ मुक्काम), आसन (थोडा मुक्काम), गमन (फक्त रात्रीचा मुक्काम) यांचा हिशोब करून छावण्यांचे नियोजन करावे. स्वारीवर जितके अन्नधान्य व इतर सामग्री लागेल, त्याच्या दुप्पट बरोबर वाहून नेण्याची व्यवस्था करावी. ते शक्य नसल्यास सैन्यावरच ते काम सोपवावे अथवा वाटेत अंतराअंतरावर साठे करून ठेवावेत. वास्तुशास्त्रज्ञांनी पसंत केलेल्या जागी सैन्याचा नायक, सुतार व मुहूर्त पाहणारे यांनी सैन्याची छावणी वर्तुळाकार, लंबचौरस अथवा चौरस अथवा जागा जशी असेल तशा आकाराची, चार दरवाजे, सहा रस्ते आणि नऊ विभाग असलेली अशी आखून घ्यावी. ती खंदक, तट, भिंत, दरवाजे व बुरूज यांनी संपन्न अशी धोक्याच्या प्रसंगी व मुक्काम करावयाचा असेल तेव्हा उभारावी. तिच्या मधल्या भागात शंभर धनुष्ये, राजवाडा आणि सरहद्दीवर राजनिवासाचे रक्षण करणाऱ्या सैन्याचा तळ ठेवावा. जागोजागी पाण्याची सोय करावी’. युद्घावर निघालेले सैन्य इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी ठिकठिकाणी छावणी करून मुक्काम करीत असत. मोहिमेच्या मार्गातील गावे व अरण्ये यांत करावयाचे मुक्काम गवत, लाकूडफाटा व पाणी हे उपलब्ध होतील त्या अनुरोधाने निश्चित करून छावण्यांत जीवनावश्यक वस्तूंखेरीज पुरेसा दारूगोळा, जनावरांचे भक्ष, उपयुक्त शस्त्रास्त्रे आणि धान्याचा भरपूर साठा असे. संकटाच्या व हल्ल्याच्या वेळी सैन्याने रक्षण कसे करावे, याची व्यूहरचना छावणीच्या स्थापनेपासूनच विचारात घेतली जाई. साधारणतः सैन्य आठ महिने मुलूखगिरीवर जाई व चार महिने पावसाळ्यात छावणीत असे. लष्करी मोहिमा दूरवरच्या प्रदेशात असल्यास अशा छावण्या अपरिहार्य ठरत.

मध्ययुगात विशेषतः शिवकालात दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेत (१६७७-७८) छ. शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी या प्रदीर्घ प्रवासात छावण्या वसविल्या होत्या मात्र या छावण्यांचे स्वरूप तंबू, डेरे, राहुट्या असे साधे आणि फक्त लष्करी सैनिकांपुरते मर्यादित होते. त्यांत बायकामुले व अन्य थाट माट नव्हता जो पुढे औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीत विशेषतः ब्रह्मपुरी (सोलापूर जिल्हा), पेडगाव (बहादुरगड-अहमदनगर जिल्हा), संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा), गल्गली (विजापूरजवळ कृष्णाकाठी ) या छावण्यांत दृष्टोत्पत्तीस आल्याची ऐतिहासिक नोंद आहे. महाराजांच्या छावण्यांपैकी अनंतपूर (कर्नूलच्या पूर्वेस ६४ किमी.), पेड्डापोलम् (चेन्नईच्या पश्चिमेस ११ किमी.), तिरूमलवाडी (तंजावरच्या उत्तरेस १६ किमी.) या काही प्रसिद्घ छावण्या असून तिरूमलवाडी येथील छावणीत त्यांचा दीर्घकाळ (पावसाळ्याचे चार महिने) मुक्काम होता आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी व त्यांचे मंत्री यांनी महाराजांसोबत काही दिवस मुक्काम करून तंजावर राज्याच्या वाटणीसंबंधी वाटाघाटी केल्या. त्या व्यंकोजींनी अमान्य करून एके दिवशी गुप्तपणे पलायन केले. कोलेरन येथील छावणीत त्यांच्यासोबत एम्. जर्मेन हा पाश्चात्त्य प्रवासी काही दिवस राहिला होता. त्याने लिहिलेल्या प्रवासवृत्तांतात महाराजांच्या छावणीविषयीची चक्षुर्वैसत्यम् हकिकत आढळते. तो म्हणतो, ‘महाराजांच्या छावणीत दोन प्रमुख तंबू असून एकात राजे व दुसऱ्यात त्यांचा मंत्री राहतो पण दोन्ही तंबू सारखेच, साध्या कापडाचे (गोणपाटाचे) असून त्यांत कोणताही थाटमाट नाही बायका तर नाहीतच !’ मराठ्यांच्या छावण्यांत पुढे पहिला बाजीराव याने महाराजांचेच अनुकरण केल्याचे दिसते. त्याच्या निजामुल्मुल्कवरील स्वारीच्या वेळी मुंगी-शेगांव आणि दोराहसराई येथील छावण्यांत महत्त्वपूर्ण तह झाले. पानिपतचे तिसरे युद्घ (१७६१) ही मराठी अंमलातील शोकांतिका होय पण या युद्घाच्या वेळी मराठ्यांच्या लष्करी छावण्यांतील तयारी लक्षणीय होती. यासुमारास मराठ्यांची यमुनेच्या उत्तर तीरावर छावणी होती. त्यावेळी पानिपत गावाभोवती तोफखाना पसरून सदाशिवभाऊने छावणी केली होती व भोवताली खंदक खणून त्यात यमुनेच्या कालव्याचे पाणी सोडले व शत्रूच्या रोखाने तोफा लावल्या. किल्ल्यात छावणी बंदिस्त करून भाऊ शत्रूच्या हल्ल्याची वाट पहात राहिला पण अब्दालीने अचानक दुसरीच खेळी करून मराठ्यांना चकविले, असा वृत्तांत तत्कालीन पत्रव्यवहारांतून मिळतो.

पेशवाईच्या अधःपतनानंतर (१८१८) इंग्रजांनी काही प्रमुख शहरांतून स्वयंसंरक्षणार्थ लष्करी छावण्या उभारल्या. त्या कँटोनमेंट या नावाने प्रसिद्घ आहेत. त्या दारूगोळा, धान्यसाठा, शस्त्रधारी पलटण आणि जीवनावश्यक सोयीसुविधांनी सुसज्ज केल्या. त्यांची संदेशवहनपद्घती आणि वाहतूक व्यवस्था लष्कराच्या सत्वर हालचालींना पूरक होती. अशा छावण्या पुणे, सातारा, सोलापूर, जालना, औरंगाबाद, हिंगोली आदी महाराष्ट्रातील शहरांतून उभारल्या होत्या. तसेच उत्तर हिंदुस्थानात अंबाला, बरेली, बराकपूर, मीरत आदी ठिकाणी आणि काही दक्षिण हिंदुस्थानातही उभारल्या होत्या. यांपैकी मीरत येथील छावणी सर्वांत मोठी व लष्करी तळसदृश होती. स्वातंत्र्योत्तर काळात या छावण्यांपैकी काहींचे स्थानिक स्वराज्य संस्थांत रूपांतर झाले.

आधुनिक युद्घतंत्राच्या जटिलतेत सांग्रामिकी या संकल्पनेला व्यापक अर्थ प्राप्त झाला असून तिचा संबंध फक्त लष्करी हालचाली आणि सैन्याची देखभाल एवढ्यापुरता मर्यादित राहिला नसून युद्घतंत्राशी संबंधित सर्व गोष्टींचा तीत अंतर्भाव होतो. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानामुळे तीत आमूलाग्र बदल झाले आहेत.

पहा : कँटोनमेंट रसदयंत्रणा, सैनिकी शिबीर

देशपांडे, सु. र.