सॅल्सिफाय : (इं. ऑयस्टर प्लँट, व्हेजिटेबल ऑयस्टर लॅ. ट्रॅगोपोगॉन पॉरिफोलियस कुल – कंपॉझिटी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] तीन भिन्न व एकाच कुलातील वनस्पती या सामान्य इंग्रजी नावाने ओळखल्या जात असून त्यासंबंधी स्वतंत्र वर्णने खालीलप्रमाणे आहेत.
सॅल्सिफाय : (ऑयस्टर प्लँट). ही सु. १.२५ मी. उंच, द्विवर्षायू (दोन वर्षे जगणारी) व दुधी ⇨ चीक असलेली ⇨ ओषधी मूलतः आग्नेय यूरोपातील व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून उत्तर अमेरिकेत सुस्थापित (स्वाभाविकीकरण) झालेली आहे इतरत्र काही ठिकाणी (उदा., गेट ब्रिटन) व उत्तर अमेरिकेतही ती एक त्रासदायक तणाप्रमाणे आढळते, तर काही देशांत ती लागवडीत आहे. ट्रॅगोपोगॉन या तिच्या प्रजातीत एकूण ६० जाती असून भारतात तीन जाती आढळतात. भारतात दख्खनमध्ये, सिमला व पश्चिम तिबेट येथील बागांत ही लावतात. सकस, भुसभुशीत व खोल जमिनीत हिचे पीक चांगले येते. पावसाळ्यात बी पेरल्यावर ३-४ महिन्यांनी जमिनीत साधारण बोटाइतके जाड, मांसल व २०-२५ सेंमी. लांब असलेले खाद्य मूळ तयार होते पहिल्या पानांचा एक गुच्छ जमिनीवरच असतो पुढे जमिनीवरच्या सरळ खोडावर गवतासारखी बिनदेठाची पाने येतात तसेच लांब देठांवर जांभळे सु. १० सेंमी. व्यासाचे ⇨ सूर्यफुला सारखी संरचना असलेले स्तबक प्रकारचे [⟶ पुष्पबंध] फुलोरे येतात. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी (ॲस्टरेसी) अथवा सूर्यफूल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. संकृत्स्न (शुष्क, एकबीजी, न तडकणारे, अधःस्थ इ. प्रकारचे) फळ टोकास केसाळ संवर्तयुक्त असते त्यामुळे त्याचा प्रसार वाऱ्याने होतो. मुळे शिजवून व भाजून खातात. मुळांना कालवाचा (ऑयस्टर या शिंपली प्राण्याचा) वास येतो, त्यामुळे इंग्रजी नाव त्या प्राण्यांवरून पडले आहे. तथापि ती मुळे साजूक व पथ्यकर असतात पित्तविकार व कावीळ यांवर ती गुणकारी असतात. ट्रॅ. प्रॅटेन्सिस ही जाती पश्चिम हिमालयात आढळते हिला पिवळी फुले येतात मुळांचा काढा औषधी असतो.
स्पॅनिश सॅल्सिफाय : (गोल्डन मिसल स्पॅनिश ऑयस्टर प्लँट लॅ. स्कोलिमस हिस्पॅनिकस). ही बहुवर्षायू(अनेक वर्षे जगणारी)ओषधीय जाती सॅल्सिफायपेक्षा सौम्य व खाद्य मुळांची ओषधी आहे तिला काटेरी पाने असतात. ती दक्षिण फ्रान्स व भूध्य सामुद्रिक प्रदेश येथे आढळते. तिच्या प्रजातीतील तीनही जाती मुलतः भूध्य सामुद्रिक आहेत. शेकडो वर्षांपूर्वीपेक्षा आज तिची लागवड फार कमी आहे. तिची मुळे शिजवून खातात.
परांडेकर, शं. आ. आफळे, पुष्पलता द.
ब्लॅक सॅल्सिफाय : (व्हायपर्स ग्रास लॅ. स्कॉझार्नेरा हिस्पॅनिका). ही एक मी. उंच व बहुवर्षायू ओषधी भूध्य सामुद्रिक प्रदेश, दक्षिण यूरोप ते मध्य आशियापर्यंतच्या प्रदेशात आढळते. तिच्या स्कॉर्झो नेरा या प्रजातीत एकूण सु. १५० जाती असून त्यांपैकी चार भारतात आढळतात. त्यांपैकी बहुतेक बहुवर्षायू परंतु काही वर्षायू आहेत, त्या सर्वांना लांब देठाचे स्तबक फुलोरे येतात. काही देशांत हिला व्यापारी महत्त्व आहे. भारतात भाजीकरिता ती लागवडीत आहे. पाने लांब व रुंद, अखंड आणि खोडास तळाशी वेढणारी असून मूळ जाड, मांसल, आत पांढरे परंतु बाहेरुन काळे असते. स्तबक पिवळे छदमंडल (फुलोऱ्यांवरील लहान फुलांच्या किंवा पुष्पकांच्या गुच्छाखालील उपांगांचे वर्तुळ) अनेक वलयांचे असून सर्व पुष्पके जिव्हाकृती (सपाट जिभेप्रमाणे) असतात. बिया पांढऱ्या असतात. हे लागवडीस कठीण मुळांची चव सॅल्सिफायपेक्षा चांगली असून पाने व मुळे यांचा कोशिंबीर किंवा भाजीकरिता उपयोग करतात. सिसिलीमध्ये (इटली) मोठ्या प्रमाणावर लागवडीत असलेली एक अधिक गोड जाती (स्कॉ. डेलिकोझा) भारतात यशस्वी रीत्या लागवडीत आणण्याचे प्रयत्न झाले आहेत परंतु लागवडीतील प्रमाण अत्यल्प आहे. भूक वाढविण्यास ब्लॅक सॅल्सिफायची मुळे उपयुक्त असतात मुळात इन्युलिन असते ही मूत्रल (लघवी साफ करणारी), ज्वरनाशक व स्वेदक (घाम आणणारी) आहे. कॉफीऐवजी याची मुळे वापरतात. ‘रशियन जायंट’ आणि ‘व्हल्कन’ हे दोन पकार उपलब्ध आहेत.
लागवड, संघटन इत्यादी : खोल जमिनीत व उघड्यावर स्कॉ. हिस्पॅनिका ही वनस्पती चांगली वाढते. डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये सु. ३० सेंमी. अंतरावर बी पेरतात नंतर रोपांमधील अंतर १५-२० सेंमी. ठेवून त्यांची कायम लागवड करतात. पुढील हिवाळ्यानंतर मुळे काढून घेण्याइतकी तयार होतात ती थंड जागी वाळत ठेवल्यास टिकून राहतात व त्यांचा केव्हाही उपयोग करता येतो. प्रत्यक्ष शिजविण्यापूर्वी साल काढून ती पाण्यात भिजत ठेवावी लागते त्यामुळे कडूपणा कमी होतो. तुतीच्या पानांपेक्षा सॅल्सिफायच्या पानांत ॲमिनो अम्ले अधिक असल्याने रेशमी किड्यां ना ती अधिक उपयुक्त खाद्य ठरतात. पश्चिम हिमालयात काश्मीर ते कुनवार (हिमाचल प्रदेश) (सस. २,७००–४,५०० मी. उंचीवर) स्कॉ. डायव्हॅरिकेटा ही जाती आढळते तिचे स्तबक चितीय (उभे व गोलसर) असून फुले पिवळी असतात हिची काष्ठमय मुळे व पाने भाजीप्रमाणे खाण्यास वापरतात.
पहा : कंपॉझिटी.
परांडेकर, शं. आ. पराडकर, सिंधू अ.
संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
3. Uphof, J. C. Dictionary of Economic Plants, New York, 1968.
“