सँता ॲना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर व ऑरेंज परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,२४,५२८ (२०१०). दक्षिण कॅलिफोर्नियात सँता ॲना पर्वतश्रेणीच्या पश्चिमेकडील पायथ्यालगत, सँता ॲना नदीकाठी हे वसले आहे. ते लाँग बीचच्या पूर्वेस २४ किमी. तर लॉस अँजेल्सच्या आग्नेयीस ५४ किमी. वर आहे. विल्यम स्पर्जन याने १८६९ मध्ये याची स्थापना केली. १८७८ मध्ये दक्षिण पॅसिफिक लोहमार्गाने ते लॉस अँजेल्सशी जोडले गेल्यामुळे सँता ॲना नदीच्या सुपीक व जलसिंचित खोऱ्यातील ते एक महत्त्वाचे कृषिउत्पादन केंद्र बनले. सन १८८६ मध्ये त्यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. दुसऱ्या महायुद्घानंतरच्या काळात येथे औद्योगिकीकरणास चालना मिळाली. ॲनाहीम-सँता (ॲना-गार्डन ग्रोव्ह) या महानगरीय विभागातील हे एक प्रमुख शासकीय, व्यापारी, वित्तीय, वैद्यकीय व औद्योगिक केंद्र आहे. शहरात इलेक्ट्रॉनिकी साहित्य, विद्युत्सामग्री , अणुकेंद्रीय व विमानांचे सुटे भाग, प्लॅस्टिक, रबरी वस्तू, तंतुकाच, एंजिने, रेडिओ, खेळाचे साहित्य, धातूच्या वस्तू इत्यादींच्या निर्मितीचे कारखाने आहेत. येथील विमा व्यवसाय मोठा आहे. शहरात रँचो सँटिआगो कम्युनिटी कॉलेज (मूळचे सँता ॲना कॉलेज -स्थापना १९१५) असून चार्ल्स डब्लू बॉर्क्स मेमोरियल, द ऑरेंज कौंटी हिस्टॉरिकल सोसायटी व मूव्हिलँड ऑफ द एअर ही वस्तुसंग्रहालये आहेत. यांमध्ये जुन्या ऐतिहासिक वस्तू, अमेरिकन इंडियन आदिवासींच्या कलावस्तू व जुन्या विमानांचे अनेक नमुने जतन केले आहेत. शहराच्या दक्षिणेस एल् टोरो या नाविक दलाचे केंद्र आहे. शहराच्या जवळपास अनेक कॅन्यन, किनारी खडक, पुळणी व तेलक्षेत्रे आहेत.
देशपांडे, सु. र.