सॅन अँटोनिओ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील टेक्ससयेथे एक औद्योगिक-ऐतिहासिक महानगर आणि अमेरिकेच्या पाचव्या भूसेनेचे प्रमुख केंद्र. लोकसंख्या शहर – ११,४४,६४६ व उपनगरांसह १५,९२,३८३ (२०००). राज्यातील हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर बक्सर कौंटीच्या राजधानीचे ठिकाण असून ते ह्यूस्टनच्या पश्चिमेस ३०४ किमी. आणि ऑस्टिनच्या नैऋत्येस सु. १३३ किमी.वर सॅन अँटोनिओ नदीकाठी वसले आहे. या शहरावर स्पॅनिश-मेक्सिकन संस्कृतींची छाप असून शहरात स्पॅनिश व इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर व्यवहारात आढळतो.
टेक्ससच्या इतिहासाचे हे नाभीस्थान मानतात. स्पॅनिश समन्वेषकांच्या तुकडीने १३ जून १६९१ रोजी सॅन अँटोनिओ नदीचा शोध लावला. तिच्या वरच्या टप्प्यातील यानाग्वाना या अमेरिकन इंडियन स्थळाला त्यांनी सॅन अँटोनिओ दे पॅड्युआ हे नाव सेंट अँटोनिओच्या सन्मानार्थ दिले परंतु १७१८ पर्यंत या स्थळी कायमस्वरुपी अशी वसाहत झाली नव्हती. स्पॅनिश वसाहतवाल्यांनी याचे लष्करी महत्त्व विचारात घेऊन, या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक कॅथलिक संघाची (फ्रॅन्सिस्कन मिशन) स्थापना केली आणि फादर अँटोनिओ ऑलिव्हर्सने तेथे कायमस्वरुपी वसाहत स्थापन केली (१७१८). तिच्या संरक्षणार्थ तेथे ॲल्मो नावाचा किल्ला फ्रॅन्सिस्कन मिशनने बांधला (१७२२). हे ठिकाण मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत (१८२१) स्पेनच्या आधिपत्याखाली होते. पुढे तेथे अमेरिकन वसाहतवाल्यांनी वस्ती केली आणि मेक्सिकन हुकूमशाहीविरुद्घ बंड केले. त्यांनी मेक्सिकन सैन्याचा पराभव केला, तेव्हा सांता आना या मेक्सिकन हुकूमशहाच्या नेतृत्वाखालील सैन्याने ही क्रांती चिरडून टाकून ॲल्मो किल्ल्यातील क्रांतिकारकांची कत्तल केली आणि किल्ला काबीज केला (६ मार्च १८३६) तथापि क्रांतिकारकांच्या सॅम ह्यूस्टन या नेत्याने पुन्हा टेक्ससच्या सैन्याची जुळवाजुळव करून सांता आनाचा पराभव केला. तेव्हा टेक्सस हे प्रजासत्ताक झाले आणि सॅन अँटोनिओ शहराचा ५ जून १८३७ रोजी त्यात समावेश करण्यात आला. ॲल्मो किल्ला हे स्वातंत्र्याचे प्रतीक ठरले. सुरुवातीस अमेरिकन इंडियन आणि मेक्सिकन टोळ्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे सॅन अँटोनिओ ओसाडच राहिले मात्र १८४५ मध्येटेक्ससचा अंतर्भाव अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत झाल्यानंतर सॅन अँटोनिओ येथे वस्ती वाढू लागली. यादवी युद्घानंतर (१८६२)त्याचा गो-शहर (काऊ टाउन) म्हणून विकास झाला आणि १८७७ मध्ये तेथे पहिला रेल्वेमार्ग झाल्यानंतर त्याचे व्यापारी महत्त्व वाढले. १९६८ मध्ये येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी प्रदर्शन (हेमीस-फेअर) भरले होते. त्याला जगातील लक्षावधी लोकांनी भेट दिली.
ही वसाहत प्रथम लष्करी ठाणे म्हणून वसविली गेली. ते महत्त्व आजपर्यंत टिकून आहे. टेक्सस हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य झाल्यापासून या ठिकाणी अमेरिकन भूसेनेचा तळ आहे. येथील फोर्ट सॅम ह्यूस्टन (१८७९) हे अमेरिकेच्या पाचव्या भूसेनेचे मुख्य ठाणे असून त्यास आवश्यक असणारी आरोग्यसेवा देण्यासाठी तेथे ‘ ब्रुक आर्मी मेडिकल सेंटर’ उभारण्यात आले आहे. शहराच्या केली, ब्रूक्स, रॅन्डॉल्फ व लॅकलँड या उपनगरांत वायुदलाचे विमानतळ आहेत. या ठिकाणी वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची विद्यालये आहेत. तसेच शहरात टेक्सस मिलिटरी इन्स्टिट्यूट आहे. जन. डग्लस मॅक्आर्थर हे या संस्थेचे विद्यार्थी होते. याशिवाय सेंट मेरीज युनिव्हर्सिटी (१८५२), उच्च शिक्षणासाठी ट्रि निटी युनिव्हर्सिटी (१८६९), इनकार्नेट वर्ल्ड कॉलेज (१८८१), अवर लेडी ऑफ द लेक युनिव्हर्सिटी (१८९६), सॅन अँटोनिओ कॉलेज (१९२५), युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस (१९७३) वगैरे शैक्षणिक संस्था येथे आहेत. शहरात मोठे ग्रंथालय असून त्याच्या फिरत्या शाखा उपनगरांत आहेत. या ग्रंथालयाच्या जवळच र्हट्झबर्ग सर्कस म्यूझीयम आहे. तीत अमेरिकेतील विविध ठिकाणी झालेल्या सर्कशींतील निवडक वस्तू आणि तत्संबंधीची कागदपत्रे ठेवली आहेत. यांव्यतिरिक्त मेमोरिअल विट म्यूझीयम, मॅक्ने आर्ट इन्स्टिट्यूट, सॅन अँटोनिओ आर्ट म्यूझीयम ही अन्य वस्तुसंग्रहालये असून त्यांत वसाहतकालीन अवशेषांपासून आधुनिक चित्रकलेपर्यंतच्या अनेक वस्तू आहेत. येथील ‘बकहॉर्न हॉल ऑफ हॉर्न्स’ प्रसिद्घ असून त्यात जगातील शिंगे असणाऱ्या सर्व प्राण्यांची शिंगे संग्रहित केली आहेत. ब्रॅकनरिज पार्कमध्ये सॅन अँटोनिओ प्राणिसंग्रहालय आहे. सॅन फेर्नांदो कॅथीड्रल (१८७३) हे येथे रोमन कॅथलिक आर्चबिशपचे प्रमुख स्थान असून येथे स्पॅनिश राज्यपालांचा राजवाडा (लाव्हिलिटा) आहे. शहरात पंधरा नभोवाणीकेंद्रे (तीनस्पॅनिश) असून पाच दूरदर्शन केंद्रे(पैकी एक स्पॅनिश) आहेत. एक्स्प्रेस (१८६५), न्यूज (१९४८) आणि लाइट (१८८९) ही येथून प्रसिद्घ होणारी प्रमुख दैनिके असून अकरा साप्ताहिकांपैकी एक स्पॅनिश आहे.
सॅन अँटोनिओ हे पशुप्रधान शेतीचे केंद्र असून तेथे मेंढपाळीचा मोठा व्यवसाय चालतो. अमेरिकेतील एकूण लोकर उत्पादनापैकी २५ टक्के लोकरीचे उत्पादन या परिसरात होते आणि विशेषतः मोहेर लोकर प्रसिद्घ आहे. मोहेर लोकरीचे देशातील ८५ टक्के उत्पादन या भागात होते. याशिवाय वस्त्रनिर्मिती, अन्नप्रक्रिया व तेलशुद्घीकरण हे प्रमुख उद्योग शहरात चालतात. विमान-मोटारी यांचे सुटेभाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, शीतकरणाची उपकरणे इत्यादींचेही लहानमोठे कारखाने शहरात आहेत. बँकिंग व्यवसाय आणि वस्तूविनिमयाची ही मोठी बाजारपेठ आहे.
देशपांडे, सु. र.