सँडबर्ग, कार्ल: (६ जानेवारी १८७८–२२ जुलै १९६७). अमेरिकन कवी, कादंबरीकार व इतिहासकार. जन्म अमेरिकेतील गेल्सबर्ग (राज्य इलिनॉय) येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात स्वीडिश मातापित्यांच्या पोटी झाला. गेल्सबर्गला थोडे शिक्षणघेतल्यानंतर चरितार्थासाठी त्याला शाळा सोडून मजुरी करावी लागली मात्र १८९८ मध्ये स्पॅनिश-अमेरिकन युद्घ सुरु झाल्यावर तो अमेरिकन सैन्यात भरती झाला. त्याने युद्घाचे वार्तांकन केले. नंतर १८९८ च्या सप्टेंबर मध्ये त्याने लोम्बार्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु १९०२ मध्ये ऐन परीक्षेच्या वेळी तो भ्रमंतीला बाहेर पडला, त्यामुळे तो पदवीधर झाला नाही. लोम्बार्ड महाविद्यालयातील फिलिप राइट या इंग्लिश विषयाच्या प्राध्यापकाने सँडबर्गचे पहिले पुस्तक इनरेक्लेस एक्स्टसी (१९०४) प्रकाशित केले. त्याने किरकोळ नोकऱ्या करीत प्रचंड भ्रमंती केली आणि अखेर शिकागोत Lyceumite या नियतकालिकाचा सहसंपादक म्हणून रुजू झाला. त्याने लिलीयन स्टिचन या युवतीबरोबर लग्न केले (१९०८). कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्याने मिलवॉकी येथील जर्नल अँड डेलीमधून स्तंभलेखन केले. त्याची ‘सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी’चा एक संघटक म्हणूनही निवड झाली. मिलवॉकीच्या महापौरांचा सचिव म्हणूनही १९१०-१२ मध्ये त्याने काम केले. तो शिकागोत सिस्टिम नावाच्या व्यावसायिक मासिकाचा संपादक झाला (१९१३)आणि नंतर शिकागो डेली न्यूज या वृत्तपत्राच्या संपादक मंडळात सामील झाला (१९१४). विख्यात अमेरिकन कवी ⇨ वॉल्ट व्हिटमन ह्याचा त्याच्यावर प्रभाव होता. त्याच्या काही कविता पोएट्री या मासिकात प्रकाशित झाल्या. त्याला पोएट्री या मासिकाचे लेव्हिन्सन पारितोषिक मिळाले (१९१४). पुढे १९१६ मध्ये शिकागो पोएम्स हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्घ झाला. शहरातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनाची वास्तववादी चित्रे त्याने या काव्यसंग्रहातील कवितांतून त्याच्या रोखठोक भाषेत आणि मुक्तछंदात रंगविली. त्याच्या कवितेचा ठसा वाचकांवर त्वरित उमटला. कॉर्नहस्कर्स (१९४८), स्मोक अँड स्टील (१९२०) आणि द पीपल, येस् (१९३६) हे त्याचे नंतरचे काही काव्यसंग्रह. यांपैकी कॉर्नहस्कर्स या त्याच्या काव्यसंग्रहाला पोएट्री सोसायटी प्राइझ मिळाले. पहिल्या महायुद्घाच्या काळात त्याला वृत्तपत्रसंस्थेने विशेष वार्ताहर म्हणून स्वीडन व नॉर्वेला पाठविले (१९१७). यूरोपमधून परत आल्यानंतर त्याने तेरा वर्षे शिकागो डेली न्यूजसाठी काम केले. द पीपल, येस् हा त्याचा सर्वश्रेष्ठ काव्यसंग्रह मानला जातो. त्यात लोकशक्तीचा गौरव आहे. त्याने लोकगीतेही रचली आणि लोकांपुढे प्रत्यक्ष सादर केली. ह्या त्याच्या कार्यक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. द अमेरिकन साँगबॅग (१९२७) आणि न्यू अमेरिकन साँगबॅग (१९५०) हे त्याच्या लोकगीतांचे संग्रह उल्लेखनीय आहेत. त्याच्या संपूर्ण कवितेचे संकलन १९५० मध्ये प्रसिद्घ झाले.
अब्राहम लिंकनचे चरित्र ही त्याची एक विशेष उल्लेखनीय अशी वाङ्मयीन कामगिरी. खूप परिश्रम घेऊन त्याने अब्राहम लिंकनचे चरित्रग्रंथ लिहिले. ते असे:अब्राहम लिंकन : द प्रेअरी यिअर्स, २ खंड (१९२६) आणि अब्राहम लिंकन : द वॉरयिअर्स, ४ खंड (१९३९). अब्राहम लिंकन : द वॉरयिअर्सला १९४० सालचे, इतिहासलेखनाचे पुलिट्झर पारितोषिक देण्यात आले.
लहान मुलांसाठीही त्याने चार पुस्तके लिहिली : रूटाबाग स्टोरीज (१९२२),रूटाबागा पिजन्स (१९२३), रूटाबागा कंट्री (१९२९) आणि पटॅटो फेस (१९३०).
ह्यांखेरीज एक कादंबरी – रिमेम्ब्रन्स रॉक (१९४८) आणि आत्मचरित्र – ऑलवेझ द यंग स्ट्रेंजर्स (१९५३) यांचे लेखनही त्याने केले. रिमेम्ब्रन्स रॉक मध्ये अमेरिकेचा दुसऱ्या महायुद्घापर्यंतचा इतिहास आहे. ऑलवेझ द यंग स्ट्रेंजर्स ह्या आत्मचरित्रात त्याच्या आरंभीच्या कष्टमय जीवनाचे वेधक चित्रण आढळते.
अमेरिकन जनता व तिच्या श्रद्घा ह्यांचा एकनिष्ठ पूजक अशी त्याची ख्याती होती.
फ्लॅट रॉक (नॉर्थ कॅरोलायना) येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Callahan, North, Carl Sandburg, Lincoln of Our Literature, New York, 1970.
2. Perry, Lilla S. My Friend Carl Sandburg, Scarecrow, 1981.
नाईक, म. कृ.
“