श्व्हार्त्स, मेल्व्हिन : (२ नोव्हेंबर १९३२ – २८ ऑगस्ट २००६). अमेरिकन भौतिकीविज्ञ. विद्युत् भार शून्य आणि द्रव्यमान जवळजवळ शून्य (इलेक्ट्रॉनाच्या १/१०,००० पट) असलेल्या ⇨ न्यूट्रिनो या मूलकणांसंबंधी संशोधन करून म्यूऑनीय न्यूट्रिनो या ⇨मूलकणांचा शोध लावल्याबद्दल श्व्हार्त्स यांना ⇨ लीऑन मॅक्स लेडरमन आणि ⇨ जॅक स्टाइनबर्गर यांच्याबरोबर १९८८ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
श्व्हार्त्स यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांनी कोलंबिया विदयापीठात भौतिकीचे अध्ययन केले आणि १९५८ मध्ये पीएच्.डी. पदवी संपादन केली. याच विदयापीठात त्यांनी अध्यापन केले (१९५८-६६). नंतर ते स्टॅनफर्ड विदयापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते (१९६६-८३). त्यांनी संगणक-सुरक्षितता प्रणालीचा अभिकल्प (आराखडा) तयार करण्याकरिता १९७० साली ‘ डिजिटल पाथवेज’ ही कंपनी कॅलिफोर्नियामधील सिलिकॉन व्हॅली येथे स्थापन केली आणि तिचे अध्यक्ष झाले.१९९१ मध्ये ते ब्रूकहॅवन राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये उच्च ऊर्जा आणि अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे सहसंचालक आणि पुन्हा कोलंबिया विदयापीठात भौतिकीचे प्राध्यापक झाले.१९९४ मध्ये ते भौतिकीचे आय्. आय्. राबी प्राध्यापक झाले. २००० मध्ये ते राबी गुणश्री प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
श्व्हार्त्स यांनी कोलंबिया विदयापीठातील लेडरमन व स्टाइनबर्गर या सहकाऱ्यांबरोबर बुकहॅवन राष्ट्रीय प्रयोगशाळेत न्यूट्रिनोंसंबंधी संशोधन केले (१९६०-६२). न्यूट्रिनोची द्रव्याबरोबर (प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्याबरोबर) बहुतकरून परस्परक्रिया होत नाही, त्यामुळे प्रयोगशाळेतील संशोधनामध्ये त्याचे अभिज्ञान (ओळख पटविण्याचे काम) करणे अत्यंत अवघड काम होते (असा अंदाज करण्यात आला होता की, पृथ्वीच्या व्यासाइतके अंतर द्रव्यामधून जात असताना सरासरीने १०१० न्यूट्रिनोंपैकी फक्त एक न्यूट्रिनो द्रव्यातील प्रोटॉन अथवा न्यूट्रॉनाबरोबर परस्परक्रिया करू शकतो). या तिन्ही संशोधकांनी शेकडो अब्ज न्यूट्रिनोंची संख्या असलेली शलाका तयार करून आणि ती शलाका घन द्रव्याच्या अभिज्ञातकातून पाठवून न्यूट्रिनो परस्परक्रियेची सांख्यिकीय संभाव्यता वाढविता येईल, अशी योजना तयार केली. हे साध्य करण्याकरिता या शास्त्रज्ञांनी उच्च ऊर्जायुक्त प्रोटॉनांचा प्रवाह निर्माण करण्याकरिता ⇨ कणवेगवर्धका चा वापर केला. या प्रोटॉनांचा धातुरूप बेरिलियम या लक्ष्यावर भडिमार केला असता विविध कणांचे (मूलकणांचे) प्रवाह निर्माण झाले. यांमधील पायॉन (पाय-मेसॉन) कण प्रवास करीत असताना त्यांचा क्षय होऊन म्यूऑन (म्यू-मेसॉन) आणि न्यूट्रिनो हे कण निर्माण झाले (π → μ + v). बेरिलियम लक्ष्यापासून उत्तेजित झालेल्या या कणांचा प्रवाह नंतर १३.४ मी. (४४ फूट) जाडीच्या पोलादाच्या अटकावामधून (अडथळ्यामधून) पाठविला असता न्यूट्रिनोंव्यतिरिक्त इतर सर्व कण गाळले गेले. तद्नंतर ही शुद्ध न्यूट्रिनोंची शलाका मोठया ॲल्युमिनियम अभिज्ञातकातून पाठविली असता काही थोड्या न्यूट्रिनोंची ॲल्युमिनियम अणूंशी परस्परक्रिया झाली. या परस्परक्रियेचे विश्लेषण केले असता एक नवीन प्रकारचा न्यूट्रिनो असल्याचा शोध लागला. हा मूलकण म्यूऑनीय न्यूट्रिनो (Vμ) म्हणून ओळखला जाऊ लागला. जेव्हा म्यूऑनीय न्यूट्रिनोची द्रव्याबरोबर (प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्याबरोबर) परस्परक्रिया होते, तेव्हा इलेक्ट्रॉनाऐवजी म्यूऑन बाहेर पडतात.
श्व्हार्त्स यांचे आयडाहो फॉल्स येथे निधन झाले.
पहा : मूलकण.
सूर्यवंशी, वि. ल.