संकल्पस्वातंत्र्य : (फ्री डमऑफ विल ). संकल्प म्हणजे मनाचा असा निश्चय, की ज्याचा परिणाम म्हणून सामान्यत: त्या निश्चयाला अनुरूप अशी क्रिया घडते.‘ सामान्यतः ’ म्हणण्याचे कारण असे की, एखादा संकल्प, त्यानुसार करावयाच्या कृतीपर्यंत येऊन ठेपला, तरी त्यानुसार नेहमीच कृती घडेल, असे नाही. संकल्प करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते की नाही, ह्या प्रश्नाची चर्चा नीतिमीमांसेत केली जाते कारण व्यक्तीला जर संकल्प करण्याचे , निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल , तर व्यक्तीला कराव्या लागणाऱ्या संकल्पानुसार तिच्या हातून जी कृती घडेल , त्या कृतीबद्दल जबाबदार धरता येणार नाही . मग एखादया चांगल्या कृतीबद्दल व्यक्तीची प्रशंसा करणे किंवा तिच्या एखादया वाईट कृतीबद्दल तिला दोषी धरून तिची निंदा करणे वा तिला शिक्षा करणे हे निरर्थक ठरते . माणसाला संकल्प स्वातंत्र्य नसेल , तर त्याच्या कृतीची नैतिकताच नाहीशी होईल .
संकल्प स्वातंत्र्याचा विचार करताना प्रथमदर्शनी दोन बाजू पुढे येतात : एक नियतिवादाची (डिटर्मिनिझम) आणि दुसरी अनियतिवादाची (इनडिटर्मिनिझम).
नियतिवाद असे मानत, की मानवी संकल्प ही एक नियत घटना आहे. व्यक्तीने एखादी कृती करावी की करू नये, ह्याविषयी तिच्या मनाचा निश्चय वा संकल्प काय असेल, हे पूर्वीच ठरून गेलेले असते त्यामुळे व्यक्तीला संकल्पाचे स्वातंत्र्य नाही. आपल्या ह्या मताच्या पुष्टीसाठी नियतिवादी दोन प्रकारचे युक्तिवाद करतात :
( १ ) सृष्टीत घडणाऱ्या या विविध घटनांप्रमाणेच मानवी संकल्प ही सुद्धा एक घटना आहे. सृष्टीतील प्रत्येक घटनेमागे काही कारण वा कारणांचा समुच्चय असतो. कोणतीही घटना केव्हा, कोठे आणि कशी घडणार, हे तिच्या मागच्या कारणावरून ठरत असते. आकाशात चंद्र, सूर्य, पृथ्वी हे ठराविक स्थितीत आले, की चंद्राला ग्रहण लागते. एका विशिष्ट पूर्वस्थितीमुळे हे घडते. त्याचप्रमाणे मानवी संकल्पही त्याच्या पूर्व-पूर्व कारणांनी नियत होत असतो.
( २ ) मनुष्य आपल्या प्रेरणा वा हेतू विचारात घेऊन आपले आचरण करीत असतो. त्यामुळे सर्वात शक्तिशाली अशा प्रेरणेनुसार त्याचा संकल्प ठरेल आणि त्यानुसार तो कृती करील आणि विशिष्ट परिस्थितीत कोणती प्रेरणा सर्वांत शक्तिशाली ठरेल, हे त्या माणसाच्या स्वभावाशी निगडित असेल. त्यामुळे व्यक्तीचा संकल्प कोणत्याही क्षणी नियतच असतो. संकल्प नियत असेल, तर संकल्प स्वातंत्र्य उरतच नाही.
नियतिवादामुळे नैतिक विचारात अडचणी येतात. प्रत्येकाचा संकल्पच जर नियत, म्हणजे आधीच ठरून गेलेला असेल, तर चांगले आणि वाईट आचरण असा फरकच करता येणार नाही. चांगले आणि वाईट, सज्जन, दुर्जन ह्या शब्दांनाही नैतिक अर्थ येणार नाही तथापि काही तत्त्वज्ञांच्या मते नियतिवादामुळे नैतिक विचारात अडचणी येत नाहीत. काही गोष्टींना आंतरिक मूल्य असते. उदा., एखादया कलेच्या आस्वादाचा अनुभव. नियतिवाद स्वीकारल्यानंतरही ह्या आंतरिक मूल्याला बाधा येत नाही. त्याचा चांगलेपणा टिकूनच राहतो. त्यांचा दुसरा मुद्दा असा की, संकल्प नियत असले, तरी नैतिक जबाबदारीला महत्त्व आहेच. योग्य कृतीची प्रशंसा होते, तेव्हा ती कृती करणाऱ्या व्यक्तीला उत्तेजन मिळते आणि अयोग्य कृती दोषार्ह ठरते, तेव्हा ती कृती करणारी व्यक्ती अनुत्साही होते हे आपण पाहतो. त्यामुळे प्रशंसा आणि टीका ह्यांचा योग्य वा अयोग्य कृती करणाऱ्या व्यक्तींच्या मनांवर त्यांच्या होणाऱ्या परिणामांचा कार्यकारणभाव स्पष्ट होतो. नियतिवाद असला, तरी प्रशंसेला आणि टीकेला स्थान असणारच आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारीची संकल्पनाही राहते. पण हे दोन्ही युक्तिवाद मान्य होण्यासारखे नाहीत. कलेचे मूल्य हे नैतिक मूल्य नसल्यामुळे त्याची सत्कृत्याच्या चांगुलपणाशी तुलना करता येणार नाही. सत्कृत्य हे आधी ठरल्यानुसार व्यक्तीच्या हातून घडणार असेल, तर त्याला नैतिक चांगुलपणा चिकटविता येणार नाही. तसेच हातून घडलेल्या कृत्यानुसार व्यक्तीच्या वाट्याला येणाऱ्या निंदा-प्रशंसेने तिच्या मनावर होणारे परिणाम महत्वाचे नव्हेत, तर नियतिवाद स्वीकारल्यावर त्या निंदा-प्रशंसेला काही अर्थ उरतो का, हा प्रश्न आहे. इथे कृतीची युक्तायुक्तता निरर्थकच ठरते.
⇨जॉर्ज एडवर्ड मुर ह्या ब्रिटिश तत्त्वज्ञाचे मत असे की, व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या कृतीपेक्षा वेगळी अशी कृती करणे, त्या व्यक्तीला शक्य असेल, तरच युक्तायुक्ततेला अर्थ आहे. जर अनेक शक्य अशा कृतींचे पर्याय समोर असतील, तर ज्या कृतीचे परिणाम सर्वांत चांगले होतील – प्रमाणात सिद्ध होतील, ती कृती युक्त होय. ह्याचा अर्थ असाही होतो, की ज्या कृती केल्या गेलेल्या नाहीत, त्या करणे शक्य होते. जी कृती घडली, तिच्यापेक्षा वेगळी कृती घडणे शक्यच नव्हते, ही नियतिवादी भूमिका मुर नाकारतो. पुन्हा नघडणाऱ्या गोष्टींचेही दोन प्रकार असतात. उदा., एखादी धडधाकट व्यक्ती अर्ध्या तासात एक किमी. अंतर चालली नाही. ही गोष्ट अशी आहे, की जी करता येण्यासारखी होती पण ती व्यक्ती एका मिनिटात दोन किमी. अंतर चालली नाही. ही गोष्ट अशी आहे, की ती शक्यच नव्हती. ह्यांतली पहिली गोष्ट – त्या व्यक्तीने ठरविले असते, तर ती व्यक्ती एक किमी. अंतर अर्ध्या तासात चालू शकली असती – स्वीकारणे म्हणजेच संकल्प स्वातंत्र्याला मान्यता देणे. नैतिक विचारात या अर्थाचे कृतिस्वातंत्र्य गृहीत आहे.
अनियतिवादयांच्या मते आपले संकल्प आपण निवडत असतो, असे आपल्या अनुभवास येत असते. तो आपण प्रमाण मानला पाहिजे. शिवाय नियतत्व म्हणजे स्वैरतेचा अभाव. प्रत्यक्षात आपण स्वैरपणे निवड करीत असतो. अनियतिवादी असे मानतात की, मानवी संकल्प कार्यकारणाच्या कक्षेबाहेर असतो. तो पूर्णत: अनियत असतो. व्यक्तीच्या मनात कोणताही संकल्प कोणत्याही क्षणी आकार घेऊ शकतो पण संकल्प कोणत्याही क्षणी आकार घेऊ शकत असेल, तर व्यक्ती त्या संकल्पाची नियती ठरू शकत नाही. ‘ तोसंकल्प माझा ’ असे व्यक्ती म्हणू शकत नाही. असा संकल्प यदृच्छेच्या आधीन आहे, असेच मानावे लागते. ह्यातून मानवी स्वातंत्र्याचे समर्थन होणार नाही. त्यामुळे नैतिक-अनैतिक असा भेद राहत नाही.
नियतिवाद आणि अनियतिवाद ह्या दोन मतांपेक्षा वेगळे असे आणखी एक मत म्हणजे आत्मनियतत्त्ववाद (सेल्फ डिटर्मिनिझम). ह्या मतानुसार स्वातंत्र्य म्हणजे स्वैरता नव्हे. स्वातंत्र्यातही नियतत्व असते पण ते व्यक्तीचे स्वत:चे असते. व्यक्ती स्वत: स्वत:चा संकल्प करते. तो परिस्थितीनेही नियत होत नाही. त्यामुळे चांगले-वाईट साधुत्व दुष्टपणा असे नैतिकतेवर आधारित भेद करणे शक्य होते. मग कर्तव्याची भाषाही करता येते. व्यक्तीचे अमुक एक कर्तव्य आहे, असे म्हटल्यावर ते कर्तव्य म्हणजे त्या व्यक्तीची एक जबाबदारी ठरते. ती पार पाडल्याबद्दल प्रशंसा वा पार न पाडल्याबद्दल निंदा, त्या व्यक्तीला पत्करावी लागते तथापि एखादी व्यक्ती मी स्वत:च स्वत:चा संकल्प करते, असे म्हणते, तेव्हा ‘ मी ’ म्हणजे कोण ? हा प्रश्न उपस्थित होतो. माणसाच्या व्यक्तित्वात जसा विवेक असतो, तसेच विकारही असतात. माणूस विचारपूर्वक एखादा चांगला निर्णय घेतो पण नंतर तो कोणत्यातरी विकाराच्या प्रभावाने फिरवितो. ह्या दोन्ही गोष्टी एकच व्यक्ती करते. मग ह्या व्यक्तीमधला खरा ‘ स्व ’ किंवा ‘ मी ’ कोणता ? त्या व्यक्तीचा विवेक हेच त्या व्यक्तीच्या ‘ स्व ’ चे वा ‘ मी ’ चे खरे स्वरूप होय,असेम्हटले पाहिजे. त्यामुळे विकारांच्या प्रभावाखाली केला जाणारा संकल्प हा स्वतंत्र संकल्प नव्हे कारण त्याला विवेकाचे – ‘ मी ’ च्या खऱ्या स्वरूपाचे – पाठबळ नसते. तेव्हा संकल्प स्वातंत्र्य वा आत्मनियतत्त्व म्हणजे विवेकाकडून होणारे नियतत्त्व होय. ह्याचाच अर्थ स्वतंत्रसंकल्प म्हणजे ‘ मी ’ ज्याचे कारण आहे, तो संकल्प.
माणूस आपल्या स्वतंत्र निवडीने आपल्या अस्तित्वाला आशय देऊ शकतो, हे अस्तित्ववादी विचारसरणीचे एक मध्यवर्ती सूत्र आहे.
मनुष्याने स्वत:च स्वत:चा उद्धार करावा स्वत:ला खचू देऊ नये कारण आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू असतो असे गीतेत सांगितले आहे (६ .५). त्याच प्रकारचा उपदेश धम्मपदातही आहे.
तेथे असे म्हटले आहे, की आपणच आपले मालक असून आपल्या आत्म्या खेरीज आपल्याला तारणारा दुसरा कोणीही नाही म्हणून एखादा व्यापारी ज्याप्रमाणे आपल्या चांगल्या घोड्याचे संयमन करतो, त्याप्रमाणे आपणच आपले नीट संयमन केले पाहिजे (धम्मपद – ३८०). हयात मनुष्याला संकल्प स्वातंत्र्य असल्याचे अनुस्यूत आहे.
संदर्भ: १.टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीता रहस्य पुणे, १९७४.
२.दीक्षित, श्रीनिवास, नीतिमीमांसा, पुणे, १९८२.
कुलकर्णी, अ. र.