श्वेतपत्रिका : (व्हाइट पेपर). शासनाच्या अधिकृत निवेदनाचे माहितीपत्रक. एखादया महत्त्वाच्या विषयाबाबत केलेले धोरणविषयक निवेदन किंवा सादर केलेली माहिती, असे याचे सर्वसाधारण स्वरूप असते. श्वेतपत्रिका हे ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीमधून विकसित झालेले एक साधन आहे. राजाच्या आदेशानुसार संसदेच्या लोकप्रतिनिधी-सभागृहाला (हाउस ऑफ कॉमन्स) सादर केलेला हा दस्तावेज असतो. श्वेतपत्रिका ही संकल्पना नक्की केव्हापासून अस्तित्वात आली, हे सांगणे कठीण आहे. सुरूवातीला शासनाच्या अधिकृत प्रकाशनातील किंवा निवेदनातील चुकांची दुरूस्ती करणारे,शुद्धिपत्रक असे त्याचे स्वरूप होते.१९४० नंतर त्याला सध्या प्रचलित असलेला श्वेतपत्रिकेचा अर्थ व दर्जा प्राप्त झाला, असे मानले जाते.
इंग्लंडमध्ये विविध शासकीय समित्यांचे अहवाल, व्यापार-उदयोगक्षेत्रांतील सांख्यिकी धोरणविषयक अहवाल आणि वृत्तांत प्रकाशित करून संसदेला सादर करण्याची परंपरा आहे. या सर्व दस्तऐवजांचे सादरीकरण गडद निळ्या वेष्टनाच्या पुस्तक/ पुस्तिकांच्या स्वरूपात केले जाते. त्यास ‘ ब्ल्यू बुक ’ (नील पुस्तिका) म्हणतात. त्यात बराच तपशील दिलेला असतो परंतु श्वेतपत्रिकेचे स्वरूप थोडे वेगळे असते. श्वेतपत्रिका तुलनेने त्रोटक आणि पांढऱ्या रंगाच्या वेष्टनातून सादर केली जाते. असे म्हटले जाते की, एकदा सरकारने सभागृहात निवेदन करताना घाईगर्दीत संबंधित दस्तावेज परंपरागत निळ्या वेष्टनात सादर करण्याऐवजी पांढऱ्या रंगाच्या वेष्टनात सादर केला. त्यामुळे अशा दस्तावेजांना श्वेतपत्रिका म्हणण्याची प्रथा पडली. अर्थात श्वेतपत्रिकेची अन्य काही वैशिष्टयेही आहेत. ती अशी : (१) संसदेने केलेल्या कायद्यांबाबत किंवा एखादया महत्त्वाच्या प्रकरणात सरकारने काय कृती केली किंवा शासनाची या संदर्भातील अधिकृत भूमिका काय आहे, याचे हे निवेदन असते. (२) श्वेतपत्रिकांचे स्वरूप गोपनीय नसते. शासनाची अधिकृत भूमिका किंवा शासनाकडून मिळालेली अधिकृत माहिती म्हणून त्यातील तपशिलांचा आधार कोणालाही घेता येतो. (३) श्वेतपत्रिकेतील निवेदन हा मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय नसतो, तर ते संभाव्य धोरणाबाबतचे निवेदन असते. (४) श्वेतपत्रिकेचा उद्देश शासनाच्या विचाराधीन असलेल्या विषयाबाबत व्यापक चर्चा घडवून आणणे, तसेच सभासदांचे त्याबाबतचे विचार समजावून घेणे हा असतो. (५) शासनाला आपली भूमिका स्पष्ट करणे, तिचे समर्थन करणे किंवा संसदेला तोवर अज्ञात असलेली माहिती देणे, हादेखील श्वेतपत्रिका सादर करण्यामागचा उद्देश असतो.
आता बहुतेक सर्वच राष्ट्रांनी श्वेतपत्रिकेची पद्धत स्वीकारलेली असून अनेकदा लोकांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून शासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली जाते. तसेच सरकारतर्फेही अशा प्रकारची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येत.
दाते, सुनील