श्वेतगंधा : (इं. कीपिंग ट्यूबरोज, मादागास्कर जस्मीन, ट्रू स्टेफॅनोटिस; लॅ. स्टेफॅनोटिस फ्लोरिबंडा कुल-ॲस्क्लेपीएडेसी). एक शोभिवंत वेल. ती मूळची मादागास्कर येथील असून भारतात शोभेकरिता व सुगंधी फुलांकरिता बागांमध्ये लावलेली आढळते. तिचे खोड २.५-४.५ मी. उंच, करड्या-तपकिरी रंगाचे असून त्यावरील पाने समोरासमोर, साधी, जाड, गर्द हिरवी, चिवट, टोकदार, गुळगुळीत, दीर्घवृत्ताकृती किंवा आयत- अंडाकृती असतात. त्यांच्या बगलेत मार्च ते सप्टेंबरात चवरीसारख्या पण द्विशाखी वल्लरी येतात.
फुले लहान, खाली नळीसारखी परंतु वर पसरट, २.५ – ५ सेंमी., पांढरी व सुवासिक असतात. पुष्पमुकुट तळाशी फुगीर व टोकास तबकासारखा असून त्यातील तोरण (कोरोना) पाच कर्णिकार उपांगांचे असते. फळे नियमित येतातच असे नाही. ती ७.५-१० सेंमी. लंबगोल, मांसल असून त्यात केसांचा झुबका असलेल्या अनेक बिया असतात. कलमे व बिया यांव्दारे हिची लागवड करतात. तिला भरपूर सूर्यप्रकाश, सकस व खत घातलेली जमीन आवश्यक असते. मात्र ही फार उंचीच्या प्रदेशांत व फार दमट हवामानात वाढत नाही. कुंडीतील वेल अनेक वर्षे चांगली वाढत राहते.
हर्डीकर, कमला श्री.