श्लेस्विग होलस्टाइन : पश्चिम जर्मनीतील एक प्रांत. याचे क्षेत्रफळ १५,७१० चौ. किमी. आहे. याच्या उत्तरेस डेन्मार्क, पूर्वेस बाल्टिक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र आणि दक्षिणेस एल्ब नदी आहे. या प्रांतात बाल्टिक व उत्तर समुद्रांतील अनेक बेटांचा समावेश होतो. त्यांपैकी हेल्गोलँड बेट हे प्रमुख असून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये लष्करी दृष्ट्या त्याला फार महत्त्व होते. कील हे राजधानीचे ठिकाण असून या प्रांतातील सर्वांत मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीचा बाल्टिक समुद्रावरील मोठा नाविक तळ येथे होता.
इ. स.१८६७ ते१९४५ पर्यंत श्लेस्विग होलस्टाइन हा प्रशियाचा प्रांत होता आणि या प्रांतात बहुसंख्येने लो सॅक्सन व फिझियन लोकवस्ती होती. परंतु१९४५ नंतर त्यांचे प्रमाण कमी होऊन जर्मन लोकवस्ती वाढू लागली. श्लेस्विग होलस्टाइन प्रांताचा मुख्य भूभाग हा उत्तर जर्मनी मैदानाचाच एक भाग आहे. त्याचा पूर्वेकडील भाग थोडासा डोंगराळ असून बाकीचा पुष्कळसा उत्पादित आहे, तसेच मध्यवर्ती भाग हा मोठया प्रमाणात ओसाड आहे. पश्चिम किनारी भाग सुपीक पाणथळीचा आहे. आयडर व ट्रेव्ह या मुख्य नदया आहेत. या प्रांताच्या आर्थिक जीवनाचा मुख्य पाया शेती हाच आहे. ७६% जमीन लागवडीखाली असून ८% भूभाग जंगली आहे. शेती व्यवसायाबरोबर पशुपालन व दुग्धव्यवसाय हे मुख्य उदयोग आहेत. येथील दूध व दुधाचे पदार्थ यूरोपमधील सर्व बाजारपेठेत विकले जातात. येथील ‘ होलस्टाइन गायी ’ जगभर प्रसिद्ध आहेत. कील बंदरातून मोठया प्रमाणात मासेमारी व सागरी व्यापार चालतो. येथे मर्यादित प्रमाणात तेल-उदयोग चालतो.
कुंभारगावकर, य. रा.