श्रौत धर्म : श्रूतीमध्ये म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या तीन अग्नींच्या साहाय्याने करावयाच्या यज्ञांच्या स्वरूपातील धर्म.[⟶ अग्नी]. धर्माचे लक्षण अनेक प्रकारांनी केले जाते. निसर्गातील सर्व घटना आणि मानवी जीवन यांचे नियंत्रण करणाऱ्या अतिमानवी शक्तीची उपासना करणे आणि अंती तिच्याशी एकरूप होणे, हे धर्माचे सामान्य लक्षण आहे. श्रौत धर्म हा यज्ञप्रधान आहे. वेदांचे मंत्र आणि ब्राह्मण असे दोन भाग आहेत. यज्ञातील कर्म मंत्रपूर्वक करावयाचे असते. ते कसे करावयाचे हे ब्राह्मणगंथांत सांगितलेले असते. ब्राह्मणामध्ये विधी आणि अर्थवाद असे भाग असतात. अर्थवाद हे विधीचे स्तवन करतात. यज्ञविधींचे कमश: आणि सविस्तर विवरण करण्यासाठी श्रौतसूत्रे रचली गेली.

श्रौत कर्माचे नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे चार प्रकार आहेत. त्यांपैकी नित्य कर्माचे स्वर्ग हे फल आहे. स्वर्ग हा द्युलोकात आहे. वेदान्तातील परम पदाशी जुळणारी स्वर्गलोकाची कल्पना उत्तरकालीन मीमांसकांनी केली आहे. यज्ञ करणारा यजमान मृत्यूनंतर स्वर्गलोकात जातो, असा विचार वेदांत मांडला आहे. ऐहिक कामनांच्या पूर्तीसाठीही यज्ञ केले जात असत. या कामना सात्त्विक, राजस, तामस अशा सर्व प्रकारच्या असत. यज्ञ अनेक प्रकारचे आहेत. त्यांच्या स्वरूपावरून आणि विस्तारावरून त्यांचे प्रकार ठरतात. सर्वांत छोटे यज्ञ म्हणजे हविर्यज्ञ. ते सात प्रकारचे आहेत. ज्या यज्ञात सोम वनस्पतीचा रस काढून देवतांना विधिपूर्वक अग्नीत अर्पण केला जातो, त्याला सोमयाग म्हणतात.[⟶ सोमयाग]. ज्या यज्ञात सोमाचा याग एकच दिवस होतो, त्याला ‘ एकाह ’ असे नाव आहे. असे एकाह पुष्कळ आहेत. सूत्रकारांनी सात एकाह सोमयाग सांगितले आहेत. ‘अग्निष्टोम’ हा सर्व सोमयागांचा प्रकृतिभूत याग आहे.ज्यात सोमयाग दोनपासून बारा दिवसांपर्यंत चालतो, त्यांना ‘अहीन ’ असे नाव आहे. याहून अधिक दिवस चालणारे याग म्हणजे सत्रे होत. जनमेजयाच्या सत्रात व्यासांनी महाभारत सांगितले अशी कथा आहे.

हे श्रौत यज्ञ करण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याला ‘ आहिताग्नी ’ म्हणतात. आहिताग्नीने विधिपूर्वक श्रौताग्नींची स्थापना केलेली असते. हे अग्नी तीन असतात - गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी अथवा अन्वाहार्यपचन. सभ्य आणि आवसथ्य असे आणखी दोन अग्नीही असतात. आहिताग्नीने आपल्या अग्नीवर संध्याकाळी आणि सकाळी अग्निहोत्र होम द्यावयाचा असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावास्येला ऋत्विजांच्या साहाय्याने इष्टी या प्रकाराचा यज्ञ करावयाचा असतो. यज्ञातील ऋत्विजांची संख्या कमीजास्त असते. सोमयागात सोळा ऋत्विज असतात. रोज करावयाचा अग्निहोत्र होम हे यजुर्वेद या एका वेदाने करावयाचे कार्य आहे. इष्टी आणि इतर काही यज्ञ हे यजुर्वेद आणि ऋग्वेद या दोहोंतील मंत्रांनी करावयाचे असतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तीहींतील मंत्रांच्या साहाय्याने सोमयाग करावयाचा असतो. होता हा ऋत्विज ऋग्वेदा तील मंत्रांनी देवतेची स्तुती करतो. उद्‌गाता सामवेदा तील मंत्रांवर बसविलेली सामे गातो. अध्वर्यू हा यजुर्वेदा तील मंत्रांनी हवनादी प्रत्यक्ष कार्य करीत असतो. ब्रह्मा या ऋत्विजाची कामगिरी या तीन वेदांपैकी कोणत्याही वेदाच्या ऋत्विजाकडे असते. ब्रह्म्याला तीनही वेदांच्या कर्माचे ज्ञान असायला हवे. अथर्ववेद्यांच्या परंपरेत मात्र ब्रह्मा हा अथर्ववेदी असावा, असा आग्रह दिसतो. या प्रमुख ऋत्विजांना प्रत्येकी तीन साहायक ऋत्विज असतात. इतरही काही साहायक लागतात. काही यज्ञ यजमानाच्या नेहमीच्या अग्निशालेत होतात. बरेचसे यज्ञ बाहेर मोकळ्या जागेत संपन्न होतात.

धर्मशास्त्रानुसार वेदाधिकार जसा त्रैवर्णिकांना आहे, तसा यज्ञाधिकारही त्यांनाच आहे. रथकार आणि निषादस्थपती यांना श्रौताग्नींची स्थापना करण्याचा आणि विशिष्ट यज्ञ करण्याचा अधिकार होता. यज्ञ करण्याचा अधिकार लोकांना असला, तरी ऋत्विज होण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता. धर्मशास्त्राप्रमाणे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिगह अशी सहा प्रकारची कर्तव्ये ब्राह्मणांना सांगितली आहेत. विवाहानंतर योग्य वेळी श्रौताग्नींचे आधान करावयाचे असते आणि त्यानंतर विशिष्ट क्रमाने याग करावयाचे असतात. यजमान आणि यजमानपत्नी अशा दोघांनी मिळून याग करावयाचा असतो. श्रौताग्नींची उपासना त्या दोघांची आहे. रोजचा अग्निहोत्र होम करताना दोघांनी उपस्थित असावे लागते. यजमान परगावी गेल्यास यजमानपत्नी तरी उपस्थित असलीच पाहिजे. दोघांनाही परगावी जावयाचे असल्यास श्रौताग्नी बरोबर घेऊन जावे लागते. दोघांपैकी जो आधी मृत्यू पावेल, त्याचा अंत्यसंस्कार श्रौताग्नींनी करावयाचा असतो. देवतेसाठी त्याग हे यज्ञाचे मूळ स्वरूप आहे. आत्मत्याग हा सर्वश्रेष्ठ, त्याच्या खालोखाल महत्त्व प्रतिनिधीच्या त्यागाचे आहे. पितृमेध किंवा अंत्यसंस्कार ही अग्नीला द्यावयाची पुरूषाहुती आहे.

यज्ञासाठी काही साधनसामग्री लागते. मोठया यज्ञासाठी अधिक सामगीची आवश्यकता असते. देवतांसाठी अग्नीत हवी द्यावयाचे असतात. आहुतीसाठी आज्य म्हणजे गाईच्या दुधापासून काढलेले तूप लागते. इष्टी या यज्ञप्रकारासाठी पुरोडाश हा मुख्यतः हवी असतो. यव (सातू) किंवा वीही (भात) यांच्या पिठात गरम पाणी ओतून केलेला पिठाचा गोळा अग्नीत भाजतात, हा पुरोडाश होय. शिजविलेला भात हाही हवी असतो. शेतात पेरून उगवणारी सात धान्ये आणि अरण्यात आपोआप उगवणारी सात धान्ये हीही हविर्द्रव्ये आहेत. पशुयागात पशूची विशिष्ट अंगे काढून ती शिजवून हवी म्हणून देण्यात येतात. पशूंमध्ये अज म्हणजे बोकड हा मुख्य आहे. याखेरीज अजा, मेष, मेषी, गाय, बैल आणि अश्व यांचेही याग सांगितलेले आहेत. इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून प्रचारात आलेल्या कलिवर्ज्य प्रकरणानुसार कलियुगात गाय आणि बैल यांचे याग निषिद्ध मानण्यात आले आहेत. मनुष्याची गणनाही ब्राह्मणगंथांनी पशूंत केली आहे. पुरूषमेध यागात पुरूष हे पशू सांगितले आहेत मात्र त्यांच्या यागाचे विधान नाही. सोमयागात सोम हे मुख्य हविर्द्रव्य आहे. सोम वनस्पती कोणती यांसंबंधी विविध मते मांडण्यात आली आहेत. हिमालयाच्या वायव्येकडील भागात तसेच अफगाणिस्तान आणि इराणमधील पर्वतीय प्रदेशांत सोम वनस्पती वाढते. वैदिक आर्य भारतात पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे गेले. तेव्हा मूळचा सोम मिळेनासा झाल्यामुळे तशा प्रकारची दुसरी वनस्पती सोम म्हणून वापरण्याची रूढी पडली. सोम पूर्वी जेथे वाढत असे, तेथे सध्याही वाढतो. सोम वनस्पतीचे वनस्पतिशास्त्रातील नाव एफेड्रा वल्ग्यारिस असे आहे. तेथील प्रदेशात आजही ही वनस्पती ‘ हुम् ’ या नावाने ओळखली जाते.


 कुंभाराने बनविलेली अनेक प्रकारची भाजलेली मृत्पात्रे यज्ञात उपयोगात येतात. सुताराने बनविलेली अनेक पात्रे आणि वाहने वापरली जातात. चांभाराने कमावलेली कातडी, विणकराने विणलेली वस्त्रे, बुरूडाचे बुरडी काम, लोहाराने केलेल्या ब्राँझच्या आणि लोखंडाच्या वस्तू, सोनाराने केलेले चांदी, सोन्याचे जिन्नस इ. अनेक वस्तू यज्ञासाठी लागतात. यज्ञात ऋत्विजांना दक्षिणा द्यावयाची असते. मुख्यतः गाय ही दक्षिणा सांगितली आहे. याशिवाय लौकिक जीवनात वापरात येणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू दक्षिणा म्हणून सांगितल्या आहेत. दक्षिणांमध्ये असेही काही पदार्थ आहेत की, ते स्वीकारणाऱ्याला त्यांचा काहीही उपयोग होत नाही. अशा प्रकारच्या दक्षिणा यज्ञविधीच्या स्वरूपाला अनुसरून सांगितलेल्या असतात.

यज्ञधर्म हा वैयक्तिक तसा सामूहिकही आहे. यज्ञाचे फल यजमानाला मिळावयाचे असते आणि सर्व ऋत्विज त्याच्यासाठी आपापले काम करीत असतात. त्या त्या वेदाचे अध्ययन केलेले ऋत्विज, वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे लौकिक जीवनाला उपयोगी पडणारे आणि यज्ञात वापरात येणारे विविध पदार्थ निर्माण करणारे व्यावसायिक, या सर्वांचा म्हणजे साऱ्या गावाचा आणि परिसराचा, यज्ञानुष्ठानाशी कमीजास्त प्रमाणात संबंध येत असे. यामुळे एकतेच्या भावनेचा आपोआप परिपोष होत असे. यज्ञधर्म वेदकाळात आणि वेदोत्तर काळात शेकडो वर्षे कमीजास्त प्रमाणात प्रचारात होता. त्या काळात लोकसंघटनेचे मोठे कार्य यज्ञधर्माने केले.

यज्ञविधी म्हणजे मोठा पसारा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात मोठया प्रमाणात असलेले यातूंचे मिश्रण. यातू म्हणजे निसर्गावर किंवा काही काल्पनिक योनींवर गूढ रीतीने प्रभुत्व मिळवून त्यांच्या व्दारे विशिष्ट घटना घडवून आणण्याची क्लृप्ती. यातूमध्ये कारण आणि कार्य यांच्या संबंधांची भांत कल्पना असते. विज्ञानामध्ये कार्यकारणसंबंध तर्कशुद्ध असतो. अर्थात यातू ही विज्ञानाच्या मार्गावरील एक पायरी आहे. यातू आणि धर्म यांच्या मिश्रणाने यज्ञविधी बनलेला असतो. स्वर्गप्राप्ती हे यज्ञाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, हे आपण मागे पाहिलेच आहे. यज्ञाच्या अनुष्ठानातून ‘ अपूर्व ’ उत्पन्न होते आणि त्याच्यामुळे मृत्यूनंतर यजमानाला स्वर्ग प्राप्त होतो, असा मीमांसकांचा सिद्धान्त आहे. त्यांच्या मते ईश्वराला अस्तित्व नाही आणि देवता गौण आहेत. परंतु वेदांतील मंत्र ब्राह्मणभागाचे नीट अवलोकन केले असता यज्ञात देवतांना विशिष्ट स्थान आहे, हे मान्य करावे लागते. यजमान देवतांविषयी निष्ठा बाळगीत असतो. यज्ञातील वत आणि दीक्षा यांना काही प्रमाणात तरी आध्यात्मिक मूल्ये आहेत. नीतिमूल्यांची कदरही यज्ञविधींमध्ये केलेली दिसून येते. मंत्रब्राह्मणात प्रतिपादिलेल्या यज्ञधर्माचे आधिदैविक चिंतन आरण्यकांत केले गेले आणि त्यांतून पुढे उपनिषदांतील तत्त्वज्ञान उत्क्रान्त झाले.

ब्राह्मणगंथ, श्रौतसूत्रे आणि प्रयोगगंथ यांचे अवलोकन केले असता, वेदांतील बंदिस्त यज्ञविधीतही काही प्रमाणात परिवर्तन झाले असल्याचे दिसून येते. या सर्व वाङ्‌मयाने व्यापलेला विस्तृत कालखंड, त्यात झालेली सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरे आणि वेदशास्त्रांचा परस्परांवर पडलेला प्रभाव लक्षात घेता, ही गोष्ट अपरिहार्य होती. तत्त्वज्ञानाचा जसजसा विकास होत गेला, तसतसे यज्ञधर्मांचे स्थूल स्वरूप मागे पडले. त्याग हे यज्ञाचे मूलतत्त्व तेवढे शिल्ल्क राहिले आणि भारतीय समाजाच्या जीवनात निरनिराळ्या स्वरूपांत सांप्रतही ते अनुस्यूत असलेले आढळून येते. श्रौत धर्माचे अनुष्ठान कठीण असल्यामुळे पुढील काळात स्मार्त याग जास्त प्रमाणावर होऊ लागले. गणेश, चंडी यांसारख्या देवतांचे संप्रदाय लोकप्रिय झाले, हेही एक कारण असावे. भक्तिसंप्रदायाचा वाढता प्रभावही यास कारणीभूत ठरला. श्रौत यागांचे अनुष्ठान कमी होत जाऊन अखेर श्रौत धर्म लुप्तप्राय होईल, अशी शक्यता निर्माण झाली. परंतु अलीकडच्या काळात श्रौत धर्माचे एक प्रकारे पुनरूज्जीवन होत असल्याचे दिसत आहे. श्रौत यागांच्या अनुष्ठानाचे प्रमाण महाराष्ट्नात व बाहेरही वाढू लागले आहे. हे श्रौत याग अनेक प्रकारच्या तडजोडी करीत केले जातात तथापि त्यास धर्माभिमानी लोकांचा पाठिंबा मिळत आहे. धार्मिक कर्मकांडांकडे समाजाचा ओढा एकूणच वाढतो आहे, ही वस्तुस्थिती आहे.[⟶ कर्मकांड].

पहा : यज्ञसंस्था.

संदर्भ : १. काशीकर, चिं. ग. श्रौतकोश, दोन खंड, पुणे, १९५८.

             २. काशीकर, चिं. ग. श्रौत धर्माची स्वरूपचिकित्सा, पुणे, १९७७.

             ३. केतकर, श्रीधर व्यंकटेश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, प्रस्तावना खंड, विभाग दुसरा  वेदविदया, पुणे, १९२१.

             ४. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९२.

             ५. थिटे, गणेश, यज्ञ : आशय आणि आविष्कार, पुणे, १९७९.

काशीकर, चिं. ग.