श्री रामदेवबाबा : (? १९६५ –   ). भारतातील एक विख्यात योगगुरू व योगविदयाप्रसारक. त्यांचे मूळ नाव रामकिशन यादव. त्यांचा जन्म कालवा, जि. नरनूल (हरयाणा राज्य) येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लक्ष्मण व भरत या नावाचे दोन भाऊ आहेत. लहानपणापासूनच रामदेवबाबांचा संन्यासी वृत्तीकडे श्री रामदेवबाबाकल होता. स्वयंप्रेरणेने वयाच्या सोळाव्या वर्षी संन्यासी होण्याच्या इच्छेने ते घराबाहेर पडले. पुढे स्वामी कृपालुदेवजी महाराज यांचे परमशिष्य श्री स्वामी शंकरदेवजी यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. विविध गुरूकुलांमध्ये प्राचीन गंथ, संस्कृत व्याकरण, वेदपुराणे, आयुर्वेद, ⇨पतंजली चा योगदर्शनावरील योगसूत्रे हा गंथ इत्यादींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. योगसाधनेचे त्यांचे अध्ययन कालवा येथील योगपंडित आचार्य बलदेवजी यांच्यापाशी झाले. पुढे हिमालयामध्ये जाऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ‘ रामदेव ’ हे नाव धारण केले. गंगोत्री येथील गुहेत राहून त्यांनी खडतर तपस्या व बह्माराधना केली. हरद्वार येथील गुरूकुल कांगी विश्वविदयालयामध्ये अष्टाध्यायी, महाभाष्य, दर्शनोपनिषद इ. गंथांवर त्यांनी अध्यापन केले. १९९१ पासून ते योगविद्येचा प्रचार करीत आहेत. रामदेवबाबा यांनी आचार्य कर्मवीरजी महाराज व आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या मदतीने हरयाणा राज्यातील कनखाल येथे ‘दिव्य योगमंदिर ट्रस्ट ’ची स्थापना केली (१९९५). या ट्रस्टच्या माध्यमातून योग, आरोग्य, आध्यात्मिक, शैक्षणिक व आयुर्वेद सेवा इ. प्रकल्पही त्यांनी सुरू केले. किशनगढ येथील वैदिक संस्कार व आधुनिक शिक्षणावर आधारलेले गुरूकुल व पतंजली योगविदयापीठ (२००८) यांची व्यवस्था दिव्य योगमंदिर ट्रस्ट पाहते. रामदेवबाबा यांनी २००२ पासून दूरदर्शनवर आसनांची प्रात्यक्षिके व प्राणायामांचे प्रकार सादर केले. सर्वसामान्यांना योगप्राणायामाची अनुभूती मिळवून देण्यासाठी या माध्यमाचा ते कौशल्यपूर्ण वापर करीत आहेत. गुगल या संकेतस्थळावर त्यांचा कार्यकम व यौगिक साधना यांना १७,५०० पृष्ठे दिलेली आहेत.

आरोग्यसंपन्न भारत, आध्यात्मिक भारत, राष्ट्रवादी भारत व स्वदेशी भारत या चतु:सूत्रीवर रामदेवबाबांचे कार्य आधारले आहे. संपूर्ण भारत योगसाधनेद्वारा रोगमुक्त करण्याचा रामदेवबाबा यांचा संकल्प आहे. देश-विदेशांत त्यांचे लक्षावधी अनुयायी आहेत. रामदेवबाबांची योगसाधना आणि योग चिकित्सा शिबिरे देश-विदेशांत सातत्याने होत असतात. त्यात एकावेळी काही हजार लोक सहभागी झालेले असूनही सर्व योगसाधना शिस्तबद्धपणे होत असते. सर्वसामान्य माणसांबरोबरच राजकीय नेते मंडळी, उच्च् पदाधिकारी, डॉक्टर्स, अभियंते इ. मान्यवरांचाही शिबिरामध्ये सहभाग असतो. भारतभर योगप्रसार करून विनामूल्य प्राणायाम व योगशिक्षण देणारे योगशिक्षक तयार करण्याची योजना रामदेवबाबांनी आखली आहे.

रामदेवबाबांच्या योगसाधना आणि योग चिकित्सा या शिबिराने योग केवळ शारीरिक व्यायाम आहे. हा भ्रम नाहीसा झाला आहे. त्यांनी योगाला शारीरिक आरोग्य, रोगनिवारण, मानसिक शांती, आत्मविकास, बौद्घिक चेतना, आध्यात्मिक उन्नती यांचा आधार बनविले आहे. नियमितपणे योगसाधना करणाऱ्या साधकांस याचा फायदा झाला आहे. पतंजलीप्रणीत अष्टांगयोगाचे शिक्षण-प्रशिक्षण शिबिरात दिले जाते. योगासने व प्राणायाम हे दोन्ही ते शिकवितात तथापि प्राणायामावर त्यांचा विशेष भर आहे. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, बाह्य प्राणायाम, भामरी, उद्‌गीथ आणि उज्जायी हे प्राणायामाचे सात प्रकार, काही निवडक आसने, सूक्ष्म व्यायाम, भजन इत्यादींचे प्रशिक्षण शिबिरामध्ये दिले जाते.

रामदेवबाबांचे पुढील गंथ दिव्य योगमंदिर ट्रस्टद्वारा प्रकाशित झाले आहेत : योगसाधना योगचिकित्सा रहस्य (प्रथमावृत्ती २००२, बारा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित), प्राणायाम रहस्य (हिंदी, इंग्रजी आणि गुजराती), दिव्यस्तवन (भजन), योगदर्शन, औषधदर्शन (हिंदी व इंग्रजी) संतदर्शन, आयुर्वेद सिद्धान्त रहस्य, आयुर्वेदिक जडी-बुटी रहस्य इत्यादी. यांशिवाय योगसंदेश (२००३) नावाची मासिक-पत्रिका बारा भारतीय भाषांतून निघत असून, तीमधून योग, आयुर्वेद, संस्कृती, संस्कार तसेच औषधीय वनस्पती इत्यादींबाबत माहिती मिळते. रामदेवबाबांच्या आवाजातील गायत्रीमंत्र व महामृत्युंजय मंत्राची ध्वनिफित आसने, प्राणायाम यांच्यासंबंधी दिव्य योगसाधना ही व्हीसीडी (दोन भागांत), यौगिक साहित्य व ऑडिओ-व्हिडिओ फिती इ. साहित्य साधकांसाठी उपलब्ध आहे. सांप्रत दिव्य योगमंदिर ट्नस्टची सर्व सामगी पंचेचाळीस कोटीच्या घरात गेली आहे. रामदेवबाबांनी योगाचे जनआंदोलन केले असून, त्याचा लाभ लक्षावधी लोक घेत आहेत.

पोळ, मनीषा