श्री निवासराव, श्रीरंगम् : (२ जानेवारी १९१० - ? १९८३). आधुनिक तेलुगू कवी. ‘ श्री श्री ’ या टोपणनावाने ते विशेष प्रसिद्ध आहेत. आंध प्रदेशातील विशाखापटनम् येथे जन्म. सुरूवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन मद्रास विदयापीठातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली (१९३१). एक वर्ष अध्यापन करून पुढे ते विशाखा विक्ली चे संपादक झाले (१९३४). नंतर त्यांनी आंधप्रभा या दैनिकात वृत्तसंपादक म्हणून काम केले (१९३९४२). मात्र पुढे त्यांनी सलग अशी एकही नोकरी केली नाही. काही काळ दिल्ली आकाशवाणीवर वृत्तनिवेदक (न्यूज रीडर) म्हणून काम केल्यावर त्यांनी १९५० पासून चित्रपटांची पटकथा-गाणी लिहिण्यास सुरूवात केली. त्यात ते अखेरपर्यंत व्यस्त होते. संस्कृत, तमिळ, इंग्रजी, फ्रेच इ. भाषाही त्यांनी आत्मसात केल्या होत्या. विदयार्थिदशेतच त्यांनी काही कविता रचिल्या होत्या. प्रभाव हा त्यांचा पहिला काव्यसंगह. स्वच्छंदतावादी निसर्गकविता व प्रेमकविता त्यात आहेत. पुढे ते नझरूल इस्लाम यांच्या प्रभावाखाली आले. ⇨शार्ल बोदलेअर, ⇨एडगर ॲलन पो, ⇨गी द मोपासां इ. पाश्चात्त्य साहित्यिकांचाही प्रभाव त्यांच्यावर पडला. देशभक्तिपर आदर्शवादाने प्रेरित झालेली ‘ जयभेरी ’ (१९३३) ही त्यांची कविता खूपच गाजली. या कवितेपासून त्यांना स्वत:चा खास सूर गवसला. ‘ ओका रात्री ’ ही कविता नावीन्यपूर्ण प्रतिमायोजनांमुळे आगळीवेगळी ठरली. त्यांच्या ‘ महाप्रस्थानम् ’ या गाजलेल्या कांतिकाव्यावर नझरूल इस्लामचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या पुरोगामी लिखाणातून मार्क्सवादी विचारसरणीचे प्रतिबिंब उमटले आहे. तेलुगू काव्यक्षेत्रातील समाजपरिवर्तनवादी व मानवतावादी अशा ‘अभ्युदय कवी ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संप्रदायाचे श्री श्री हे अग्रणी होते. नव्या पिढीचे प्रमुख कवी व कांतिकारक चळवळीचे अगदूत म्हणून श्री श्रींची १९४७ पूर्वीच ख्याती झाली होती. मात्र त्यांच्या लोकप्रिय कविता महाप्रस्थानम् या काव्यसंगहात १९५० मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या या काव्यसंगहात साम्यवादी युगारंभाचे आश्वासन आहे. १९४० च्या दशकात श्री श्री फ्रान्स व इंग्लंडमधील अतिवास्तववादी चळवळीकडे आकृष्ट झाले. ⇨आंद्रे बताँ च्या अतिवास्तववादी जाहीरनाम्याचे त्यांनी तेलुगूमध्ये भाषांतर केले (१९४५), तसेच ⇨पॉल एल्यूआर, ⇨गीयोम आपॉलिनेर, ⇨साल्वादोर दाली यांच्या काही कवितांचे त्यांनी अनुवाद केले. दरम्यान वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या मनावर तीव आघात झाला. त्यातून त्यांनी स्वतंत्र अतिवास्तववादी काव्याची निर्मिती केली. या आधुनिक, प्रयोगशील वळणाच्या कविता खड्ग सृष्टी (१९६६) या संग्रहात आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात श्री श्री यांना मोठीच कीर्ती लाभली. राजकीय क्षेत्रातही त्यांचा बोलबाला झाला. त्यांनी शांतता परिषदांमध्ये भाग घेतला, तसेच पुरोगामी लेखकसभांचे अध्यक्षस्थानही भूषविले. त्यांची विधान परिषदेवरही निवड झाली. १९४८ पासून त्यांनी चित्रपटगीते लिहिण्यास सुरूवात केली. त्यांनी महाप्रस्थानम् मधील काही कवितांचे इंग्रजी भाषांतर करून ते थी चीअर्स फॉर मॅन या नावाने प्रसिद्ध केले. याच सुमारास त्यांचा श्री श्री साहित्यमु हा काव्यसंगह प्रसिद्ध झाला (१९७१). त्यालाच पुढे साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. १९७० मध्ये ते ‘ विप्लव रचयितल संघम् ’ या संघटनेचे अध्यक्ष झाले. १९७७ मध्ये त्यांचा मारो प्रस्थानम् हा काव्यसंगह प्रसिद्ध झाला.
श्री श्री यांनी विपुल प्रमाणात गदयलेखनही केले. त्यात समीक्षा, नाटके, कथा इत्यादींचा अंतर्भाव होतो. प्रायोगिक वळणाची त्यांची काही नभोनाटये मारो प्रपंचम् या पुस्तकात आहेत. चरम रात्री हा त्यांचा कथासंग्रह. कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री श्री या संकलनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडांत त्यांचे काही परीक्षणलेख, मुलाखती, पत्रे इ. संग्रहीत केली आहेत. त्यातून त्यांच्या अष्टपैलू विव्दत्तेचे दर्शन घडते.
श्री श्री यांना अनेक मानसन्मान लाभले : ह्यांपैकी साहित्य अकादमी- व्यतिरिक्त सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक, राज्यलक्ष्मी प्रतिष्ठानचा पुरस्कार (१९७९) इ. महत्त्वाचे होत. त्यांनी चीन व रशिया या देशांचे दौरे केले. लंडनच्या कॉमनवेल्थ इन्स्टिट्यूटने त्यांचा गौरव केला.
तेलुगू साहित्यावर जवळजवळ अर्धशतकभर श्री श्रींचा प्रभाव होता. तेलुगू साहित्याला आधुनिकतेचे वळण देण्यात त्यांच्या निर्मितीचा मोठा वाटा आहे. मुख्यत्वे तेलुगू कथा-कादंबऱ्यांना नवे परिमाण देण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. कोडवटिगंटी कुटुंबराव, म राचकोंडा विश्वनाथशास्त्री इ. आधुनिक तेलुगू लेखकांवर त्यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो.
इनामदार, श्री. दे.