श्रीनगर २ : भारतातील उत्तराखंड राज्याच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १९,८६१ (२००१). श्रीक्षेत्र या नावानेही ते ओळखले जाते. सिद्धपीठ म्हणून मानले गेलेले हे ठिकाण अलकनंदा नदीच्या डाव्या काठावर, पौडीच्या उत्तरेस सु. ५ किमी. व लॅन्सडाउन शहराच्या ईशान्येस सु. ४० किमी.वर वसलेले आहे. सस.पासून सु. ५१९ मी. उंचीवरील हे क्षेत्र बद्रीनाथला जाणाऱ्या मार्गावर असून ते आसमंतातील गहू, बार्ली, भात, मोहरी व काही गळिताची धान्ये इ. शेतमालाच्या व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
जुने श्रीनगर सतराव्या शतकात वसविण्यात आले होते व ते गढवालच्या राजाच्या राजधानीचे ठिकाण होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस याच्या वरच्या भागातील गोहना ( विरहीताल सरोवर ) सरोवराचा बंधारा फुटल्यामुळे जुने गाव १८९४ मध्ये वाहून गेले. त्यानंतर सध्याचे गाव जुन्या ठिकाणापासून १.५ किमी.वर वसविण्यात आले. पश्चिमेस ऋषिकेश, ईशान्येस रूद्रप्रयाग, पूर्वेस कर्णप्रयाग अशी तीर्थक्षेत्रे येथून काही अंतरावर आहेत. येथील कमलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध असून ते जुन्या गावाच्या भागात आहे. विष्णूने शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी वाहिलेल्या १,००० कमलपुष्पांची कथा या स्थानाशी संबंधित आहे. देवळाचे बांधकाम काळ्या व पांढऱ्या दगडांत केलेले आहे. सभामंडप उंच, चौकोनी असून त्यावर घुमटाकार शिखर आहे. गाभाऱ्यात शाळुंका-पिंडी आहे. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या काही प्रचलित आख्यायिका या स्थानाशी निगडित आहेत. वैकुंठ चतुर्दशीला ( कार्तिक शु. चतुर्दशी ) येथे मोठा मेळावा भरतो. जवळच सु. ४.५ किमी.वर शंकर मठ-बिल्वेकदार हे धार्मिक ठिकाण आहे. आदय शंकराचार्यांनी स्थापन केलेले, एका तामपटावरील ‘ श्रीयंत्र ’ हे येथे येणाऱ्या यात्रींचे एक आकर्षण असते. गावात श्रीनागेश्वर, हनुमान यांची मंदिरे असून तीर्थयात्रींसाठी काळी कमळीवाल्यांची धर्मशाळा आहे. माध्यमिक शाळा, संस्कृत पाठशाळा, हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विदयापीठ रूग्णालय इ. शैक्षणिक व अन्य सुविधा येथे आहेत. रेखीव-रूंद रस्ते, बांधीव पादचारी मार्ग, अलकनंदेवरील दोरखंडाचा पूल, चौकामध्ये कारंजे व त्याभोवती शोभिवंत फुलझाडे, गावाबाहेर बंगले ही येथील वैशिष्टये आहेत. येथे नगरपालिका आहे.
चौंडे, मा. ल.