शिवार्य : जैन शौरसेनीतील  आराधना ह्या मुनिधर्मविषयक ग्रंथाचा कर्ता. ह्याचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही तथापि त्याचा स्पष्ट उल्लेख आराधनेवर टीका लिहिणारा अपराजित सूरी किंवा श्रीविजयाचार्य (इ. स.चे आठवे शतक) आणि आदिपुराणकार ⇨ जिनसेन आचार्य (सु. नववे शतक) ह्यांनी केलेला असल्यामुळे तो तत्पूर्वी केव्हातरी होऊन गेला असावा. आराधनेत शिवार्याने स्वतःविषयी दिलेल्या माहितीवरून हा ‘पाणितलभोजी’ म्हणजे भोजनपात्रांचा त्याग केलेला आणि हातांच्या ओंजळीत अन्न घेऊन खाणारा मुनी असून, जीननंदी ⟶ सर्वगुप्त ⟶ मित्रनंदी अशी ह्याची गुरुपरंपरा आहे. जैनांचे श्वेतांबर-दिगंबरादी पंथभेद होण्यापूर्वीची मुनीधर्मविषयक परंपरा आराधनेत ग्रथित केलेली दिसते. पुढे दिगंबर संप्रदायात विलीन झालेल्या ‘यापनीय’ नावाच्या संप्रदायाचा हा आचार्य असावा, असे काही अभ्यासक मानतात. [⟶ जैनांचे धर्मपंथ].

 तगारे, ग. वा.