शौरसेनी भाषा : मध्ययुगीन भारतीय आर्य (म.भा.आ.) कालातील ⇨शूरसेन देशाची (मथुरेच्या आसमंतातील) एक बोली. हिच्यावर संस्कृत भाषेचा पुष्कळ प्रभाव आहे. संस्कृत व प्राकृत नाटकांतील गद्य या भाषेत असे. हिचे प्राचीनतम स्वरूप संस्कृत नाटककार ⇨ अश्वघोष याच्या नाटकांत आढळते (इ. स. पहिले शतक). दिगंबर जैनांनी दक्षिण भारतात विकसित झालेल्या शौरसेनीत आपले धर्मगंथ लिहिल्यामुळे तिला ‘ जैन शौरसेनी ’किंवा ‘ दिगंबरी शौरसेनी ’असेही म्हटले आहे. प्राकृत व्याकरणकारांच्या मते ‘ आवंती ’, ‘ आभीरी ’ इ. शौरसेनीच्या पोटभाषा आहेत.

हेमचंद्रादी प्राकृत व्याकरणकारांनी ⇨ माहाराष्ट्री भाषेला प्रमुख प्राकृत भाषा मानून तिच्यापेक्षा भिन्न असणारे पुढील विशेष शौरसेनीची लक्षणे म्हणून मानले –

वर्णप्रकिया : (१) संस्कृतमधील द्विस्वरान्तर्गत म्हणजे दोन स्वरांमध्ये येणाऱ्या असंयुक्त म्हणजे जोडाक्षरयुक्त नसलेल्या त् व थ् यांचा शौरसेनीत अनुकमे द् व ध् होतो. उदा., सं. पति &gt शौ. पदि, सं. इति &gt शौ. इदि, तसेच भवति &gt भोदि, कथम् &gt कधं, तथा &gt तधा इत्यादी. परंतु सं. त् &gt शौ. द् ही उच्चार-प्रवृत्ती फार प्रबळ असल्यामुळे इतर स्थानांतही सं. त् चे शौ. द् होत असे. उदा., सं. तावत् &gt शौ. दाव, ताव सं. अन्त: पुरम् &gt शौ. अन्दे उरं सं. महान्त: &gt शौ. महंदो इत्यादी.

(२) जैन शौरसेनीमध्ये माहाराष्ट्रीप्रमाणे द्विस्वरान्तर्गत, असंयुक्त क् , ग् , च् , ज् , त् , द् आणि प् यांचा विकल्पाने लोप होतो व लुप्त व्यंजनाऐवजी य् (यश्रूती) आढळते. उदा., सं. श्रूतकेवलिन् &gt शौ. सुयकेवली सं. वचनै: &gt शौ. वयणेहिं सं. बहुभेदा &gt शौ. बहुभेया सं. पदार्थ &gt शौ. पयत्थ.

(३) जैन शौरसेनीत व जुन्या नाटकांतील शौरसेनीत माहाराष्ट्नी- प्रमाणे द्विस्वरान्तर्गत, असंयुक्त ख् , घ् , थ् इ. महापाण-स्पर्शवर्णांचा विकल्पाने ह् होतो. उदा., सुख &gt सुह मेघ &gt मेह लभति &gt लहदि अनुभूत &gt अणुहूद.

(४) संस्कृतमधील संयुक्त वर्णांचे शौरसेनीत पुढे दिल्याप्रमाणे बदल होतात :

(अ) सं. र्य् &gt शौ. य्य् , ज्ज् सं. कार्य &gt शौ. कय्य, कज्ज सं. सूर्य &gt शौ. सुय्य, सुज्ज आणि याच उच्चार-प्रवृत्तीमुळे सं. द्य् &gt शौ. य्य्. उदा., उद्यान &gt उय्याण.

(आ) सं. क्ष् &gt शौ. क्ख्. उदा., सं. चक्षु &gt शौ. चक्खु सं. इक्षु &gt शौ. इक्खु.

(इ) सं. ण्य् , न्य् , ज्ञ् &gt शौ. ञ्ञ् , ण्ण्. उदा., सं. बाह्मण्य &gt शौ. बम्हञ्ञ, बम्हण सं. यज्ञ &gt शौ. जञ्ञ, जण्ण सं. विज्ञ &gt शौ. विञ्ञ, विण्ण सं. कन्या &gt शौ. कञ्ञा, कण्णा. यांपैकी ण्य् , न्य् इत्यादींचे ण्ण् हे उच्चरण माहाराष्ट्नीतही आढळते.

प्रत्ययप्रकिया : (१) सं. त् &gt शौ. द् या उच्चार-प्रवृत्तीमुळे अकारान्त पुल्लिंगी नामाचे पंचमी एकवचनाचे प्रत्यय आदो, आदु आणि वर्तमान तृतीय पुरूषी एकवचनाचे दि, दे हे प्रत्यय आढळतात. उदा., सं. वीरात् &gt शौ. वीरादो, वीरादु सं. हसति &gt शौ. हसदि, हसदे सं. जायते &gt शौ. जायदे.

हेमचंद्राने भविष्यकाळाचे विकरण ‘ स्सि ’मानले असले, तरी शौरसेनी वाङ्‌मयात ‘ स्स ’विकरणाची रूपे आढळतात. उदा., सं. भणिष्यति &gt शौ. भणिस्सिदि सं. करिष्यति &gt शौ. करिस्सदि.

(२) अकारान्त पुल्लिंगी नामांचे सप्तमी एकवचन एकारान्त असते. माहाराष्ट्रीप्रमाणे म्मि प्रत्ययान्त नसते. उदा., सं. मुखे &gt शौ. मुहे सं. हस्ते &gt शौ. हत्थे.

(३) कर्मणी प्रयोगाचे विकरण ईअ आहे. उदा., सं. पृच्छते &gt शौ. पुच्छीअदि- ‘ विचारले जाते ’ सं. गम्यते &gt शौ. गच्छीअदि.

(४) ऊन प्रत्ययान्त अव्यये इय, दूण व त्ता (&lt सं. त्वा) हे प्रत्यय घेतात. उदा., सं. भूत्वा &gt शौ. हविय, भविय भोदूण, होदूण भोत्ता, होत्ता. सं. कृत्वा &gt शौ. करित्ता, तसेच करिय पण ‘ कडुअ ’हे विशेष रूप आहे. तसेच सं. गत्वा &gt शौ. गडुअ.

इतर विशेष : (१) पुल्लिंगी अन्नन्त नामांचे संबोधन अनुस्वारान्त असते पण इन्नन्त नामांच्या संबोधनाचा प्रत्यय आकारान्त असतो. उदा., सं. भो राजन् &gt शौ. भो रायं सं. विजयवर्मन् &gt शौ. विअयवम्मं सं. हे कञ्चुकिन् &gt शौ. हे कंचुइआ सं. सुखिन् &gt शौ. सुखिआ.

(२) काही संस्कृत धातूंचे पुढे दिल्याप्रमाणे धात्वादेश होतात :

√ कृ &gt √ कर, √ स्था &gt चिट्ठ, √ स्मृ &gt √ सुमर, √ दृश् &gt √ पेक्ख, √ अस् &gt √ अच्छ.

(३) काही उद्‌गारवाचक अव्यये :

हीमाणहे-‘ आश्चर्य ’, ‘ दु:ख’ दर्शक.

 

अम्महे-

} ‘आनंद’ दर्शक.

हीही-

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून शौरसेनी भाषाविकास पाहता हेमचंद्रादी प्राकृत व्याकरणकारांचे नियम शेवटची अवस्था दाखवितात व हेमचंद्राने जैन शौरसेनीच्या भाषिक विशेषांना साहित्यिक शौरसेनीच्या विशेषांबरोबरच स्थान दिल्याचे आढळते.

तगारे, ग. वा.