श्रीधर मेनन, वैलोप्पिळ्ळिल : (११ मे १९११ १९८५). मलयाळम् कवी. कलूर ( जि. एर्नाकुलम् केरळ ) येथे जन्म. शिक्षण बी.ए., बी.टी. १९३१ पासून शिक्षक व १९६६ मध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त. त्रिचूर येथे त्यांचे वास्तव्य होते. कन्निक्कोयथु (१९४७) हा १७ कवितांचा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे श्रीरेख (१९५०), कुडियोझिक्कल (१९५२), कुन्निमणिकळ (१९५४), वित्तुम् कैक्कोट्टुम् (१९५६), कडाल कक्काकळ (१९५८), कुरूविकळ् (१९६१), कैथवल्ल्रि (१९६३), विद (१९७०) आणि मकरक्कोयथु (१९७९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ऋश्यशृंगनुम् अलक्साष्टरूम् (१९५६) हे पौराणिक कथांवरील नाटक व हिमवान्टे पुनिकळ् (१९५४) हा कथासंग्रह हे त्यांचे अन्य साहित्य.
श्रीधर मेनन हे आधुनिक मलयाळम् साहित्यातील आघाडीचे कवी मानले जातात. माणसाची अदम्य जिजीवीषा हा त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा विषय असून, तो त्यांच्या काव्यातून वारंवार प्रकटला आहे. जीवनाची उंच फडफडणारी ध्वजा मृत्यू खाली खेचू शकत नाही, हे तत्त्वचिंतन त्यांच्या कन्निक्कोयथु या पहिल्याच काव्यसंग्रहातून व्यक्त झाले आहे. फाशीच्या दोराचे झुल्यामध्ये रूपांतर करण्यातच माणसाची जीत सामावलेली आहे, असे ते अन्य एके ठिकाणी म्हणतात. कुडियोझिक्कल या त्यांच्या दीर्घकाव्यात, उच्च् जीवनमूल्ये बाळगणारी मध्यमवर्गीय व्यक्ती व श्रमजीवी लोक आमनेसामने उभे ठाकल्यानंतर जाणवणाऱ्या शृंगापत्तीचे अप्रतिम चित्रण आहे. जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोण स्वीकारूनही त्यांचे काव्य केवळ कोरडे, बुद्धी वादी बनले नाही, तर त्यात भावनिक ओलावाही अबाधित राहिला. स्वच्छंदतावादी संवेदनशीलता आणि अभिजात शब्दकळा व रचनाकौशल्य यांचा अपूर्व संगम त्यांच्या काव्यात जाणवतो. त्यांच्या सरळ व प्रवाही अभिव्यक्तीमधून अर्थाचे अनेक पदर उलगडत जातात. कित्येकदा रूपकाश्रयी कथनही त्यांच्या काव्यात आढळते. उदा., चिनी आकमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेल्या गोसंरक्षणम् मध्ये वसिष्ठांची कामधेनू बळजबरीने हिरावून घेण्यात विश्वामित्राला जे अपयश आले, त्याचे चित्रण आहे. परकीय आकमणापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास भारतीय समर्थ आहेत, हा संदेश त्यातून सूचकतेने व्यक्त होतो. त्यांच्या काव्यातील आशावादी सूर अतिशय प्रेरक आहे.
श्रीधर मेनन यांना अनेक मानसन्मान लाभले : कोचीनच्या राजाकडून ‘साहित्यनिपुणन् ’ ही पदवी (१९३१), कुडियोझिक्कल या काव्यासाठी सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक (१९६९), केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), तसेच साहित्य अकादमी पुरस्कार (१९७२) इत्यादी.
भास्करन् , टी. (इं.), इनामदार, श्री. दे. (म.)