श्री काकुलम् : चिकाकोल. आंध्र प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०९,६६६ (२००१). हे आंध्र प्रदेश राज्याच्या ईशान्य भागात, नागावली नदीच्या मुखाकडील प्रदेशात वसले आहे. मुसलमानी अंमलात (सोळावे शतक ) हे शहर तत्कालीन पाच ‘ नॉर्दर्न सिरकारां’पैकी ( नॉर्दर्न सरकार ) चिकाकोल सरकारच्या राजधानीचे ठिकाण होते. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नागावली  नदीमुखखाडीवरील हे बंदर पूर्वी मलमल, बोटींना लागणारे दोरखंड यांच्या निर्मितिउदयोगांसाठी प्रसिद्ध होते. भारतावर ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर अनेक वर्षे हे एक महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. १७९१ मधील दुष्काळात हे शहर निर्मनुष्य झाले होते. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. १८६६ व १८७७ मधील टंचाईग्रस्त काळात, तसेच १८७६ मधील अतितीव वादळामुळे शहराची प्रचंड हानी झाली होती. १६४१ मध्ये बांधण्यात आलेली येथील मशीद ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाची आहे. गोवळकोंडयाच्या कुत्बशाही घराण्यातील लष्करी गव्हर्नर शेर मुहम्मद खान याने एक हिंदू मंदिर पाडून त्याच्या अवशेषांचा वापर करून ही मशीद बांधली होती. शहराजवळील विष्णुमंदिर उल्लेखनीय असून येथे आंध्र विदयापिठाशी संलग्न असलेली दोन शासकीय महाविदयालये आहेत.

चौधरी, वसंत