श्रावक : साधू , साध्वी, श्रावक व श्राविका अशा चार संघांत जैन धर्माचे अनुयायी विभागलेले असतात. साधू आणि साध्वी सर्वसंगपरित्याग केलेले असतात, तर श्रावक-श्राविका गृहस्थधर्म पाळणारे असतात. श्रावकांना साधुत्वाप्रत नेणे, हा श्रावकांसाठी सांगितलेल्या आचारधर्माचा हेतू असतो.

जैन श्रावक एखादया साधूकडे जाऊन जैन धर्मतत्त्वांवर आपली अढळ श्रद्धा असल्याचे सांगतो. त्यानंतर गृहस्थाश्रमी जैनांची बारा वते तो घेतो. ती अशी : पाच ⇨अणुवते म्हणजे खोटे न बोलणे, कायावाचामने अहिंसा पाळणे, चोरी न करणे, परस्त्रीशी समागम न करणे आणि उपभोग्य वस्तूंचा संग्रह मर्यादित ठेवणे. तीन गुणवते  पहिले दिग्वत म्हणजे आपल्या हिंडण्या-फिरण्यावर नियंत्रण ठेवणे आणि ठरविलेल्या मर्यादेबाहेर प्रवास न करणे. दुसरे उपभोग परिभोग परिमाण, म्हणजे उपभोग्य वस्तूंच्या  उपभोगावर मर्यादा घालून घेणे. तिसऱ्या गुणवताचे नाव अनर्थदंडविरती. विनाकारण कोणाला त्रास न देणे, हा ह्या वताचा सामान्य अर्थ. कोणावर राग धरून त्याचे वाईट न चिंतणे, दु:खी होऊन विचार न करणे, अकार्य करण्याविषयी कोणास प्रवृत्त न करणे इ. गोष्टी ह्यात येतात. त्यानंतर चार शिक्षापदे. एक, सामायिक म्हणजे दिवसातून काही वेळ तरी ध्यानस्थ राहणे व दुसऱ्याबद्दल दुष्टबुदद्धी न ठेवणे. दोन, देशावकाशिक म्हणजे देशाची मर्यादा ठरविणे. हे उपर्युक्त दिग्व्रतासारखेच आहे. तीन, पोषधवत. त्यात शुध्द व कृष्ण पक्षांतील अष्टमी, चतुर्दशी तसेच पौर्णिमा व अमावास्या ह्या सहा दिवशी दिवसरात्र उपवास करणे. चार, अतिथिसंविभागव्रत. म्हणजे जैन साधूंना अन्नदान, वस्त्रदान वगैरे करणे.

ह्या बारा वतांचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती स्वत:च्या घरात राहत असली, तरी यथावकाश सर्वसंगपरित्यागाच्या भावनेने भारून जाते. ह्यानंतर श्रावक अकरा प्रतिमांचे ( साधुत्वाकडे जाणाऱ्या अकरा पायऱ्या ) पालन करतो आणि मग साधूच होतो. थोडक्यात, निर्वाण ह्या अंतिम साध्यासाठी श्रावक आयुष्यभर झटत असतो. श्रावक धर्म हा साधुधर्माला पूरक तर असतोच पण तो साधुधर्माचा आधारही असतो.

संदर्भ : वैदय, प. ल. जैन धर्म आणि वाङ् ‌मय, नागपूर, १९४८.

कुलकर्णी, अ. र.