श्यामा : बुलबुलासारखा एक गाणारा पक्षी. शास्त्रीय नाव कॉप्सिकस मलबॅरीकस. तो प्रामुख्याने भारत, श्रीलंका, बांगलादेश व म्यानमार येथे आढळतो.
मसिकॅपिडी कुलाच्या टर्डिनी या उपकुलातील या पक्ष्याची शेपटी लांब (१५ सेंमी.) असते. डोके, मान, गळा, छाती, पाठ व शेपटी काळ्या रंगाची, पण शेपटीच्या मधली चार पिसे सोडून बाकीच्यांच्या टोकाकडचा बराच भाग पांढरा पोट तांबूस काळसर शेपटीच्या बुडाशी वरच्या बाजूवर मोठा पांढरा ठिपका. मादी नरासारखीच असते, पण नराचे जे भाग काळे असतात ते मादीमध्ये तपकिरी असतात. चोच काळी असते.
श्यामा पक्षी (मादी) लाजाळू व एकांतप्रिय असल्यामुळे व दाट अरण्यात राहत असल्यामुळे पुष्कळांच्या ती दृष्टिपथात येत नाही. पश्चिम घाटातील महाबळेश्वर व माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी बंगल्याभोवतालच्या झाडीत आणि रस्त्यांच्या आजूबाजूच्या दाट जंगलात हा पक्षी नेहमी दिसून येतो. या ठिकाणी माणसांच्या रहदारीची सवय झाल्याने तो बुजत नसावा. सर्वसाधारणपणे त्याच्या सवयी दयाळ पक्ष्याप्रमाणेच असतात. तो वृक्षवासी असला तरी भक्ष्य गोळा करण्याकरिता जमिनीवर उतरतो. कीटक, कृमी व पडलेली फळे हे त्याचे अन्न आहे. तो कधीकधी एखादा उडणारा कीडा हवेतच पकडून खातो. त्याचा आवाज मोठा व मधुर असतो. सकाळ संध्याकाळ तो गातो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो. काही लोक याला पिंजऱ्यात पाळतात.
याच्या प्रजोत्पादनाचा काळ एप्रिलपासून जुलैपर्यंत असतो. त्याचे घरटे उथळ वाटीसारखे असते व ते झाडाच्या ढोलीत किंवा बांबूच्या बेटात जमिनीपासून १-२ मी. उंचीवर असते. मादी ३-४ अंडी घालते, ही फिक्कट निळसर हिरव्या रंगाची असून त्यावर दाट तपकिरी किंवा तांबूस तपकिरी ठिपके असतात. घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर व मादी दोघेही करतात.
पहा : दयाळ.
कर्वे, ज. नी.
“