श्यामशास्त्री : (? १७६२ – ६ फेबुवारी १८२७). कर्नाटक संगीताच्या परंपरेतील एक थोर रचनाकार आणि गायक. ⇨त्यागराज, ⇨मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री या दाक्षिणात्य संगीतातील प्रख्यात त्रिमूर्तींपैकी एक. तमिळनाडू राज्यातील तिरूवारूर (जि. तंजावर) येथे जन्म. वडिलांचे नाव विश्वनाथ अय्यर आईचे वेंगलक्ष्मी. ह्यांचे पूर्वज कांची कामकोटी पीठात कामाक्षी देवीच्या मंदिरात पुजारी होते. श्यामशास्त्रींचे वडील व आजोबाही कामाक्षीची उपासना करीत. श्यामशास्त्रींचे पाळण्यातले नाव वेंकट सुबह्मण्य असे होते. आईवडील त्यांना लाडाने श्याम म्हणत. संस्कृत आणि तेलुगू भाषांचे त्यांचे उत्तम अध्ययन झाले होते तथापि त्यांना गायक आणि संगीतकार व्हायचे होते. संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी त्यांच्या मामांकडून घेतले. पुढे त्या विषयात ते पारंगत झाले. शुद्ध आचरण, सखोल अध्ययन व तीव्र बुद्धीमत्ता यांमुळे वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ते ‘श्यामशास्त्री ‘ या नावाने प्रसिद्ध झाले. धोकादायक राजकीय परिस्थितीमुळे कामाक्षीची सुवर्णमूर्ती तंजावर येथे आणून तिथे तिचे मंदिर बांधण्यात आले होते. श्यामशास्त्रींचे वडील देवीचे पुजारी होते. तंजावरला आलेल्या आणि संगीतस्वामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका थोर संगीतज्ज्ञांकडून श्यामशास्त्रींना संगीताचे सखोल ज्ञान प्राप्त झाले. तंजावरच्या दरबारातील श्रेष्ठ संगीतज्ज्ञ यचि मरियम अदियप्पया ह्यांच्याकडूनही श्यामशास्त्रींना संगीताचे विपुल ज्ञान मिळाले.

श्यामशास्त्रींच्या रचना मुख्यत: कृती, स्वरजाती आणि वर्ण ह्या प्रकारच्या असून त्या दुर्मिळ रागांत व गुंतागुंतीच्या तालांत आहेत. तालपद्धतीत त्यांनी विविधतापूर्ण प्रस्तरही तयार केले आहेत. त्यांत स्वराक्षर आणि स्वरस्थायी ह्यांचे प्राचुर्य आहे. संस्कृत, तमिळ आणि तेलुगू ह्या तीनही भाषांत मिळून त्यांनी देवीच्या स्तुतिपर सु. ३०० रचना केल्या असे म्हणतात पण त्यांतील फार थोड्या आज उपलब्ध आहेत. आपल्या रचनांत त्यांनी आपले नाव ‘ श्यामकृष्ण’ असे लावलेले आहे.

रंगाचारी, पद्मा (इं.) रानडे, अशोक दा. (म.) कुलकर्णी, अ. र.