श्ट्रूव्हे, ओटो : (१२ ऑगस्ट १८९७ – ६ एप्रिल १९६३). रशियन – अमेरिकन ज्योतिषशास्त्रज्ञ. तारकीय वर्णपटविज्ञानात केलेल्या संशोधनाबद्दल ते प्रसिद्ध असून त्यावरून त्यांनी हायड्रोजन आणि इतर मूलद्रव्ये अवकाशात विस्तृतपणे विखुरलेली आहेत, हे शोधून काढले.
श्ट्रूव्हे यांचा जन्म खारकॉव्ह (रशिया) येथे झाला. ते विख्यात ज्योतिषशास्त्रज्ञांच्या श्ट्रूव्हे घराण्यातील चौथे आणि ⇨ फ्रीड्रिख गेओर्ख व्हिल्हेल्म फोन श्ट्रूव्हे यांचे पणतू होत. ओटो यांनी खारकॉव्ह विदयापीठात ज्योतिषशास्त्राचे अध्ययन केले आणि १९१४ साली पदवी संपादन केली. त्यांनी इंपीरियल रशियन आर्मी (१९१६-१८) आणि रशियन कांतीनंतर व्हाइट रशियन आर्मी (१९१९-२०) यांमध्ये लष्करी सेवा केली. त्यानंतर ते देश सोडून अमेरिकेला गेले आणि शिकागो विदयापीठाच्या यर्किझ वेधशाळेत साहाय्यक पदावर रूजू झाले. १९२३ मध्ये त्यांनी शिकागो विदयापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. ते १९२४ साली या विदयापीठाच्या वेधशाळेत अध्यापक व १९२७ साली अमेरिकेचे नागरिक झाले. ते शिकागो विदयापीठात (१९३२-४७) आणि बर्कली येथील कॅलिफोर्निया विदयापीठात (१९५०-५९) खगोल भौतिकीचे प्राध्यापक होते. ते शिकागो विदयापीठाच्या यर्किझ वेधशाळेचे संचालक (१९३२-४७) आणि अध्यक्ष व मानद संचालक (१९४७-५०) तसेच टेक्सस विदयापीठाच्या मॅक्डोनाल्ड वेधशाळा (१९३२-४७), कॅलिफोर्निया विदयापीठाच्या ल्यूश्चनर वेधशाळा (१९५०-५९) आणि ग्रीन बँक येथील नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी (१९५९-६३) या वेधशाळांचे संचालक होते. ⇨ सुबह्मण्यन् चंद्रशेखर, सी. टी. एल्व्ही, जे. एल्. गीनस्टाइन इत्यादींनी श्ट्रूव्हे यांच्याबरोबर संशोधन केले होते.
श्ट्रूव्हे यांनी यर्किझ वेधशाळेत १९२५ मध्ये ⇨ आंतरतारकीय द्रव्याचे संशोधन करताना ताऱ्यांच्या दरम्यानच्या मधल्या अवकाशात वायूचे अवाढव्य मेघ असल्याचे सिद्घ केले. डेल्टा ओरिऑनिस आणि इतर ताऱ्यांचे अध्ययन करताना त्यांना दूरच्या उष्ण ताऱ्यांपासून येणाऱ्या प्रकाशाच्या वर्णपटात काही वेळेस कॅल्शियमाशी जुळणारी एक रेखीव शोषणरेषा असल्याचे आढळले. तथापि ही शोषणरेषा ताऱ्याच्या वातावरणात असलेल्या कॅल्शियमामुळे निर्माण झाली नसल्याचे त्यांनी ओळखले. कारण ताऱ्यांच्या वातावरणात बदल होणाऱ्या शोषणरेषा निर्माण होत असतात. सूर्यापासून अंतर वाढत जाईल तसतशी आंतरतारकीय शोषणरेषांची तीव्रता वाढत जाते. यावरून त्यांनी कॅल्शियमाची स्थिर शोषणरेषा आकाशगंगेच्या प्रतलातील अवाढव्य मेघातील कॅल्शियमामुळे निर्माण झाल्याचे सिद्घ करून दाखविले. आंतरतारकीय वायूच्या मेघामध्ये तारे सर्व दिशांनी फिरत असतात परंतु वर्णपट प्रकार बी-३ असलेले उष्ण तारे [→ तारा] दूरवर असलेल्या मेघातील कॅल्शियम अणूंना उत्तेजित आणि आयनीभूत (विद्युत् भारित) करतात, असे त्यांनी सांगितले.
श्ट्रूव्हे यांनी आकाशगंगेच्या विविध भागांतील हायड्रोजनाच्या उत्सर्जन वर्णपटाची छायाचित्रे मिळविली. त्यांनी या आकाशगंगेच्या बाहेरील भागांचीही छायाचित्रे घेतली, परंतु त्यांत अत्यंत आवश्यक अशा हायड्रोजनाच्या उत्सर्जन रेषा आढळल्या नाहीत. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, आकाशगंगेच्या प्रतलात आणि त्याच्या जवळपास आंतरतारकीय अवकाशात हायड्रोजन वायू विखुरलेला आहे. या शोधाचे आधुनिक रेडिओ ज्योतिषशास्त्राच्या विकासात असलेले महत्त्व नंतर सिद्ध झाले.
श्ट्रूव्हे यांनी निळ्या महाताऱ्यांसारखे उच्च तापमानाचे तारे स्वतःच्या अक्षाभोवती जलदपणे फिरत असतात असे सिद्घ करून दाखविले. त्यांनी पिधानकारी युग्ममालासंबंधीचे अध्ययन केले आणि सूर्यकुलाच्या उत्पत्तीसंबंधीचा सिद्धांत विकसित केला. तसेच त्यांनी ताऱ्यांच्या उत्क्रांती विषयीच्या सिद्धांतातही बहुमोल कार्य केले.
श्ट्रूव्हे हे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे उपाध्यक्ष (१९४८-५२) आणि अध्यक्ष (१९५२-५५) होते. त्यांना १९४४ मध्ये ग्रेट ब्रिटनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक आणि १९४८ मध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ पॅसिफिक या संस्थेचे बूस पदक मिळाले. त्यांनी अनेक संस्थांत महत्त्वाची पदे भूषविली. शिवाय दहाहून अधिक विदयापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली होती. त्यांनी ७०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. तसेच अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांपैकी प्रमुख पुस्तके अशी : स्टेलर इव्होल्यूशन (१९५०), द युनिव्हर्स (१९६२) आणि व्हेल्टा झेबर्ग्ज यांच्याबरोबर ॲस्ट्रॉनॉमी ऑफ द ट्वेंटिथ सेंचरी (१९६२). ते ॲस्ट्रोफिजिकल जर्नलचे प्रमुख संपादक (१९३२४७) होते. तसेच त्यांनी ॲस्ट्रॉनॉमिकल न्यूजलेटर मधील लेखांचे अनेक वर्षे संपादन केले.
श्ट्रूव्हे बर्कली (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले.
सूर्यवंशी, वि. ल.